गाणाऱ्यांना आवाजाप्रति जागरूकता निर्माण होण एक महत्वाची गोष्ट आहे. त्या विषयाचा अभ्यास प्रत्येक गायकाने करावा, आणि आपल्या आवाजाचं आरोग्य उत्तम ठेवावं ह्या हेतुने लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
आपल्या प्रत्येकाची एक ठराविक शारीरिक उंची असते. ठराविक वयात व्यायामाने किंवा इतर कुठल्या उपायाने ती थोडीफार वाढवता येऊ शकते पण त्यात अमुलाग्र बदल होत नाही. तसेच आवाजाचे असते. ठराविक वयात मेहनत केल्यास आवाजाची रेंज थोडीफार वाढू शकते पण त्या पलिकडे त्यात फार फरक पडत नाही. त्या रेंजच्या बाहेर वारंवार गायचा प्रयत्न केल्यास आवाज बिघडण्यास सुरवात होते.
३. मर्यादित रेंज
प्रत्येक आवाजातून त्याची रेंज लक्षात येते. गाणं शिकलेल्या गायकाची रेंज कायमच न शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त असते कारण त्यांचे आवाज निर्मितीचे स्नायु वापरामुळे शीथिल झालेले असतात. असे असले तरी नैसर्गिक मिळालेल्या रेंजमधे समाधानी असलेले गायक विरळाच. आहे त्या रेंजच्या बाहेर गाण्याच्या प्रयत्नात गायक हमखास जोर लावून गायचा प्रयत्न करताना दिसतात किंवा आवाज चोरून लावताना दिसतात. जास्त आणि जोरकस उच्छ्वासाने ते स्वर गाता येतात असा मोठा गैरसमज गायकांमधे दिसून येतो. असे करताना हमखास आवाज फाटतो आणि आवाजाला हानी पोहोचते. थोड्या अवधित त्याचे परिणाम दिसत नसले तरी दिर्घ काळात त्याचे पडसाद आवाजावर उमटायला लागतात.
स्वर पट्टया जेवढ्या जाड तेवढी आवाजाची जाडी जास्त. पुरुषाच्या स्वरतंतुची जाडी १७ ते २५ मि.मि असते तर बायकांच्या स्वर तंतुंची जाडी १२.५ ते १७.५ मि.मि असते. याच कारणामुळे पुरुषांचे आवाज बायकांपेक्षा जाड असतात. पुरुष आणि बायका दोघांमधे खालचे स्वर म्हणताना स्वर पट्टया जाड होतात आणि त्यांची लांबी कमी असते. या उलटवरचे स्वर म्हणताना स्वर पट्टयांची लांबी वाढते आणि त्या बारीक होतात. खालचे स्वर म्हणताना श्वास नलिकेतून जोरात हवा बाहेर आली तरी स्वर तंतु जाड असल्यामुळे सहज विलग होत नाहीत. या उलट वरचे स्वर म्हणताना स्वर तंतु बारीक आणि लांब होतात. श्वास नलिकेतून हवेचा जोर आल्यास त्या सहज विलग होतात आणि आवाज फाटतो. याच कारणामुळे वरचे स्वर गायचे असल्यास आवाज हल्का आणि बारीक असणं गरजेचं आहे तरच वरचे स्वर सहज लावता येण्याची शक्यता निर्माण होते. असे गायल्यास आवाज फाटणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा त्रासही होणार नाही. आवाज हल्का आणि बारीक याचा अर्थ त्याचा volume कमी असतो पण नैसर्गिक असतो. कुठल्याही प्रकारे तो खोटा आवाज नसतो.
वरचे स्वर चोरून गाताना आवाज बारीक केला जातो पण आवाज निर्मीतीच्या स्नायुंमधे कडकपणा असतो. त्यांच्या नैसर्गिक स्थितीत बदल होतो आणि आवाज खोटा ऐकु येतो.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in