गाणाऱ्यांना आवाजाप्रति जागरूकता निर्माण होण एक महत्वाची गोष्ट आहे. त्या विषयाचा अभ्यास प्रत्येक गायकाने करावा, आणि आपल्या आवाजाचं आरोग्य उत्तम ठेवावं ह्या हेतुने लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
आवाज बिघडण्याला अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. एखादी किरकोळ चुकीची गोष्ट आवाजावर परिणाम करते. अशा चुकीमुळे आवाजाच्या साध्या तकरारी सुरू होतात. आवाजातले बदल किरकोळ असल्यामुळे जागरण, प्रवास, दगदग सारख्या गोष्टींवर खापर फोडले जाते किंवा सपशेल दुर्लक्ष केले जाते. हे बदल सुधारेनासे झाले की मग आवाज बिघडण्याची कारणं शोधली जातात. अशा वेळी मुळ चुक सुधारल्याशिवाय इतर कुठल्याही उपचाराने आवाज सुधारत नाही. मुळ चुक लक्षात येत नाही आणि चुकीच्या पुनरावृत्तिमुळे आवाज बिघडत जातो.
असे होऊ नये म्हणुन मुळातच आपण कुठल्या चुकीच्या गोष्ठी करत नाही ह्याची दक्षता घ्यायला हवी.
किरकोळ वाटणाऱ्या पण सतत केल्यामुळे आवाजावर परिणाम करणाऱ्या गोष्टी आपण बघु.
१. चुकीची बैठक
अनेक वेळा ठराविक बैठक घेतल्याशिवाय मनासारखं गाता येत नाही पण ती बैठक उत्तम आवाज निर्मितीसाठी योग्य आहे का ह्याचा विचार केला जात नाही.
वास्तविक उभं राहुन गायची पद्धत सर्वोत्तम मानली गेली आहे कारण उभं असताना पाठीचा कणा सरळ असतो, खांदे सहजासहजी वाकत नाहीत, हात नैसर्गिक अवस्थेत असतात आणि शरीराच्या वरच्या भागात कुठल्याही प्रकारचा ताण नसतो. ह्या पद्धतीमधे जास्तीत जास्त श्वास सहजरित्या घेता येतो.
असे असले तरी शास्त्रीय संगीत बसून गायची पद्धत प्रचलित आहे. त्यामुळे बसलेल्या स्थितीत उत्तम आवाज येण्यासाठी, योग्य ती काळजी आपण घ्यायला हवी. बसताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. अनेक वेळा नकळत पाठीत बाक काढून बसायची सवय असते. तो ताठ पण शिथिल राहिल्यास श्वास उत्तम प्रकारे घेता येतो. गाताना हात शरीरालगत आणि तळवे मांडीवर आकाशाच्या दिशेनी असावेत. तळवे उलटे ठेवल्यास मांडीवर दाबले जायची शक्यता निर्माण होते, आणि कुठल्याही स्नायुंवर ताण आला की तो आवाजामधून दिसतो.
गाताना मान सरळ असावी. अनेक वेळा खालचे स्वर म्हणताना मान खाली आणि वरचे स्वर म्हणताना मान वर करायची सवय असते.
स्वर यंत्र हा गळ्याच्या मध्यभागी पुढील बाजूस स्थित अवयव आहे. Hyoid bone म्हणजेच जिव्हास्थिला तो टांगलेल्या अवस्थेत असतो. मान खाली किंवा वर केल्यास तो दाबला किंवा ओढला जातो व नैसर्गिक आवाज येण्यास अडथळा निर्माण होतो.
वरील माहिती सर्वपरिचित असली तरी ती अमलात आणताना त्याचा विसर पडतो आणि आपल्या सोयीप्रमाणे बैठकीत नकळत बदल होतो. जागरूक राहुन एकदा योग्य त्या पद्धतिची सवय करुन घेतल्यास, पुढे विनासायास ती आमलात आणता येते आणि आवाज नैसर्गिक आणि उत्तम येण्यास मदत होते.
योग्य बैठकीची ही सर्व लक्षणं तुमच्यात तपासुन पहा आणि आवाज अधिकाधिक उत्तम आणि नैसर्गिक करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रतिक्रिया, अडचणी आणि सल्ले कळवल्यास, सखोल अभ्यास होण्यास नक्कीच मदत होईल.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in
No comments:
Post a Comment