Tuesday, 3 September 2019

Voice blog 15 नैसर्गिक आवाजाची लक्षणे भाग ३


गाणाऱ्यांसाठी त्यांचा आवाज अत्यंत प्रिय आणि सगळ्यात महत्वाचा असूनसुद्धा त्याबाबत जागरूकता दिसत नाही. आवाज ह्या विषयाचा अभ्यास करुन त्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

जन्मत: मिळालेला आवाज मुळात नैसर्गिक असतो. त्यात उत्तम आवजातले सर्व गुण असतात. आपल्या चुकीच्या सवयींमुळे आणि आवाजावर झालेल्या बाह्य संस्कारांमुळे त्यातली नैसर्गिकता हळु हळु कमी होत जाते. बदललेला आवाज सवयीचा होतो, त्यातले दोषही स्वीकारले जातात. हे सगळं इतकं बेमालूमपणे होत असतं की आपला आवाज अनैसर्गिकतेकडे झुकतो आहे अशी शंका ही येत नाही. 

आपल्या आवाजात कोणते बदल झाले आहेत हे तपासून पाहण्याकरता हा लेख प्रपंच. नैसर्गिक आवाजाची दोन लक्षणं आपण मागच्या लेखात बघितली. नैसर्गिक आवाजाचे तीसरे लक्षण..

३. उच्चारण

चांगल्या आवाजातला एक महत्वाचा घटक, स्पष्ट उच्चार. ‘सुध मुद्रा सुध बानी’ ह्याचं महत्व अनेक गायक सांगत आले आहेत. सुध बानी म्हणजेच स्पष्ट उच्चार, आवाज उत्तम ठेवण्यास मदत करतात. किंबहुना स्पष्ट उच्चार गाणं अधिक रंजक करतात आणि त्यात सहजता असते ह्यात शंका नाही.

भाषा कुठली ही असो, त्यात स्वर ( अ,आ,इ,ई,उ,ऊ) आणि व्यंजने ( क,च,त,प,य,श) असतात. कुठला ही उच्चार करताना, त्यातले व्यंजनाचे उच्चारण क्षणार्धात संपते आणि स्वर लांबवला जातो. व्यंजनं ही दंतव्य, ओष्ठव्य, टाळव्य वगेरे असतात पण स्वरांचं उच्चारण घशात होत असतं. किंबहुना हे स्वर जेवढे घशात ( स्वर यंत्रा जवळ) उच्चारले जातात, तेवढे ते स्पष्ट ऐकु येतात. (Vowel formation at the tip of the tongue) ह्याचाच अर्थ असा की तोंड, गाल, ओठ किंवा जबडा फारसा न हालवता स्वर सहज म्हणता येतात. असे झाल्यास आवाज अधिक घुमारदार येतो. 
प्रोफ. बी.आर.देवधर ह्यांनी त्यांच्या पुस्तकात ह्याविषयी सविस्तर लिहिले आहे.
योग्य ठिकाणी स्वरांचं उच्चारण न झाल्यास, जीभेचे, गालाचे, तोंडाचे, जबड्याचे नको असलेले स्नायु कार्यान्वित होतात आणि त्यांच्यावर ताण येतो. स्वर यंत्रातले स्नायु आणि स्वर यंत्र वर ओढले जाते. असे झाल्यास आवाजाचा पोत बदलतो आणि आवाज अनैसर्गिक येतो.
उच्चारण योग्य ठिकाणी झाल्यास, घुमारायुक्त आवाज निर्माण होतो.

गात असताना असा ताण निर्माण होत आहे का हे पाहण्यासाठी, हनुवटीच्या हाडाच्या मागे आंगठा हलकेच दाबावं व तिन्ही सप्तकात गाऊन बघावं. ती जागा टणक लागल्यास जीभ ताणली गेली आहे असे समजावे. असे न होणे इष्ट. अजून एक महत्वाचा दोष म्हणजे गाताना जबड्याचे स्नायु आखडणे. जबडा आखडला गेला की आवाज खुला व मोकळा येत नाही. असे होत आहे का हे पाहण्यासाठी आकार म्हणताना, जबडा लहान मोठा करुन बघावा. तसे सहज न करता आल्यास जबड्यावर ताण आहे असे समजावे.

आपल्या शास्त्रीय संगीतात रेंगाळलेले, भोंगळ उच्चार करायची चुकीची पद्धत, अनेक पिढ्या चालत आलेली आहे. घुमारायुक्त आवाज काढण्यासाठी असे उच्चार होत असावेत. असे आवाज जाड असले तरी परिणाम साधत नाहीत. पोकळ ऐकु येतात.
अनेक गायकांमधे आकार, अकाराकडे किंवा एकाराकडे झुकतो. तसाच ईकार एकाराकडे झुकतो आणि ऊकार ओकार होतो. अशा उच्चारणामधे स्पष्टता नसते. सांगितिकता कमी होते. उच्चारणात संकोच (hesitation) आणि विलंब (delay) जाणवतो. ह्याच कारणासाठी ध्रुपद गायक उस्ताद  सयीदउद्दिन डागरजी सांगत व्यंजनांचा रियाज करताना केवळ आकार, ऊकार आणि इकाराचा करावा. अकार ओकार आणि एकार अनावधानाने होत असतात. 
स्पष्ट उच्चार असतील तर गाणं प्रभावी होण्यास मदत होते. चांगले उच्चार केवळ आवाजाचा दर्जा नाही तर गाण्याचाही दर्जा वाढवतात. 

आवाजाची ही लक्षणं तुमच्या आवाजात तपासुन पहा आणि आवाज अधिकाधिक उत्तम आणि नैसर्गिक करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रतिक्रिया, अडचणी आणि सल्ले कळवल्यास, सखोल अभ्यास होण्यास नक्कीच मदत होईल.

आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in





3 comments:

  1. खूप छान. महत्त्वपूर्ण माहिती

    ReplyDelete

  2. This article is very helpful to me regarding

    Voice Call Services Delhi Thanks

    ReplyDelete