गाणाऱ्यांसाठी त्यांचा आवाज अत्यंत प्रिय आणि सगळ्यात महत्वाचा असूनसुद्धा त्याबाबत जागरूकता दिसत नाही. आवाज ह्या विषयाचा अभ्यास करुन त्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
प्रत्येकजण चांगला आणि वाईट आवाज ओळखु शकतो. एखाद्या नवशिक्या गायकाचं गाणं ऐकुन आपल्या लक्षात येतं की ह्या आवाजात आपल्याला आकर्षित करण्याची ताकद नाही. पण नेमकं काय कमी आहे हे मात्र सांगता येत नाही. आकर्षित करणाऱ्या आवाजांमधे आपल्याला नक्की काय आकर्षित करतं त्याचा हा अभ्यास आहे.
अशा आवाजांची तीन लक्षणं आपण या आधीच्या blogs मधे बघितली. नैसर्गिक उत्तम आवाजाचं पुढचं लक्षण..
४. उत्तम श्वास
आवाज ज्या मुख्य घटकांवर अवलंबुन असतो त्यापैकी श्वास एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. सर्वसामान्यपणे आपण सर्वजण केवळ गरजेपुर्ता श्वास घेत असतो. हा श्वास जिवंत राहण्यासाठी पुरेसा आहे पण उत्तम गाण्यासाठी ह्यापेक्षा अधिक प्रमाणात श्वास घेणं अपेक्षित आहे, म्हणुनच गाण्याच्या विद्यार्थ्यांना सुरवातीच्या काळात श्वास घेण्याची क्रिया शिकवणं अत्यंत महत्वाचं आहे.
आपण सर्वजण छातीच्या वरच्या भागात श्वास घेत असतो. ह्याला chest breathing किंवा shallow breathing असे म्हणतात. आपली फुफुसं (lungs) खाली मोठी आणि वर निमुळती आहेत. वरच्या भागात श्वास घेतल्याने कमी श्वास मिळतो. असे झाल्यास
खांदे आणि मानेवर ताण निर्माण होतो,
आवाज अशक्त ऐकु येतो,
गाताना श्वास कमी पडतो,
स्वर कमी लागायची शक्यता निर्माण होते,
आवाज फाटतो (crack),
आवाज लवकर दमतो,
आवाजाचा tone, volume बदलतो आणि
कालांतरानी आवाज बिघडतो.
ह्या उलट फुफुसांच्या खालच्या भागात श्वास घेतल्यास, तो आकाराने मोठा असल्यामुळे श्वास अधिक घेतला जातो. श्वासामुळे फुफुसांचा आकार वाढतो आणि फुफुसाखाली असलेला स्नायु ज्याला श्वासपटल (diaphragm) असे म्हणतात तो खाली ढकलला जातो. श्वासपटल खाली आल्याने पोट बाहेर ढकलले जाते आणि पुरेपुर श्वास घ्यायला जागा निर्माण होते. असा श्वास घेतल्याने मान किंवा खांदे अशा कुठल्याही भागावर ताण येत नाही व छातीच्या वरचे स्नायु शिथिल राहतात. म्हणुन श्वास घेताना पोटाची हालचाल होणे महत्वाचे आहे. श्वास घेतल्याने आवाजात ताकद येते आणि आवाज दमत नाही. या क्रियेला diaphragmatic breathing असे म्हणतात. अनेक वेळा गायकाची अंगकाठी बारीक असून आवाज जोरदार असतात त्याचे एकमेव कारण diaphragmatic breathing हेच आहे. ह्यालाच आपल्याकडे नाभीचा श्वास किंवा पोटातून श्वास घेणे असे म्हणतात. जास्तीत जास्त श्वास भरण्यासाठी पोट बाहेर काढून तोंडानी श्वास घेतल्यास श्वास पटल खाली जाते आणि कमीत कमी वेळात जास्त श्वास घेता येतो. असा श्वास घेतल्यास स्वर अर्थातच जास्त वेळ टिकतो.
नियमित शंखनाद केल्याने श्वासपटलाची हालचाल होते आणि जास्त श्वास घ्यायची सवय होते.
अशा प्रकारचा श्वास घेतल्यास तब्येतही उत्तम राहण्यास मदत होते. लहानपणी प्रत्येकजण अशाचप्रकारे श्वास घेत असतो पण कालांतराने चुकीची सवय लागते. ती सवय बदलली कि आवाजात सुधारणा जाणवेल.
आवाजाची ही लक्षणं तुमच्या आवाजात तपासुन पहा आणि आवाज अधिकाधिक उत्तम आणि नैसर्गिक करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रतिक्रिया, अडचणी आणि सल्ले कळवल्यास, सखोल अभ्यास होण्यास नक्कीच मदत होईल.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in
Very much useful information
ReplyDelete