Thursday, 7 March 2019

आम्ही गाणाऱ्या मुली


गाणं हे कुणाचं career असू शकतं ह्यावर आताशी कुठे मान्यता मिळायला सुरवात झाली आहे, नाहीतर अगदी आत्ता आत्ता पर्यंत लोकं विचारत होते,  "गाता ते ठीके पण बाकी काय करता.."? ह्यावर माझं मात्र ठरलेलं उत्तर असायाचं.. ' मला तेवढ़च येतं '.

खूप लहानपणापासुन गायला सुरवात केली आणि कधी गाणं माझं career होऊन गेलं कळलंच नाही. दुसरं काही करावं असं वाटलं ही नाही आणि दुसरं काही केलं, म्हणून काही जमलं असतं असं ही नाही.
माझ्यासारख्याच अनेक मुली संगीत career म्हणून निवडतात, लोकं कौतुक करतात, वेळेला प्रोत्साहन ही देतात पण ही कला जोपासणं तितकं ही सोपं नसतं प्रत्येक मुलीला. 
गाणाऱ्या मुलींच्या career चा हा एक छोटासा आढावा !

लग्नाआधी सगळ्याच गोष्टींचं कौतुक होत असतं, तसं ह्या ताज्या होऊ घातलेल्या career चं ही होतं ! आमच्या मुलीला अनेक कार्यक्रम असतात, लोकांना तिचं गाणं आवडतं, कौतुक होतं, लहान वयात कमवायला ही लागली.. , सगळंच कसं कौतुकास्पद.! 
आजुबाजूला चांगले काळजी घेणारे मित्र असतात, रात्री अपरात्री उशिर झाला तर घरी येऊन सोडणार, ज्यांचं घरच्यांना ही कौतुक असतं. क्वचित शेजारपाजारच्यांना, नातेवाइक लोकांना काहीतरी खटकतं पण घरचे त्यांना उत्तरं द्यायला खंबिर असतात.

आणि अशात ठरतं लग्न ! सुरळीत चाललेलं सगळं बदलतं आणि नव्यानी सगळा डाव मांडावा लागतो जो कधीतरी पुनः जमतो आणि कधीतरी साफ बुडतो.

सुनबाई गातात ह्याचं थोडे दिवस कौतुक होतं . 
कार्यक्रम लांबून बघायला बरे वाटतात पण खरी पंचाइत होते गाणारी सुन घरात आली की ! 
रियाज म्हणजे काही नोकरी नाही,  हवा तेव्हा सोयीने करता येतो असा लोकांचा गैरसमज असतो, पण नोकरीपेक्षाही चिकटिनी आणि नियमितपणे करता येतो त्यालाच रियाज म्हणायला हवं खरं तर. हा सगळा प्रकार घरच्यांना नवीन असतो आणि नवीन घरात त्याचं तंत्र जमावणं सुनेलाही अवघडंच ! घरच्यांना, कलाकार सांभाळण सोपं नसतं आणि नव्या घरात बस्तान बसवणं सुनेला सोपं नसतं  !
कार्यक्रमाला जातानाची मानसिकता, कार्यक्रमाची पूर्व तयारी, डोक्यात आणि मनात कार्यक्रमापूर्वीच सुरु असलेलं गाणं, त्याचा चाललेला विचार, हे सगळं सासरच्या लोकांना कसं बरं समजावं ?
कार्यक्रमाआधी कसं जेवण जात नाही, उशिरा जेवून कशी acidity होते, जागरणामुळे काय काय त्रास होतात, कार्यक्रम झाल्यावरही वाढलेल्या anxiety मुळे कशी झोप लागत नाही, सकाळी डोळा का उघडत नाही ह्याबद्दल सुन तरी काय खुलासा देणार ?

रात्रीबेरात्री कार्यक्रमानंतर कुणीतरी परकं आपल्या सुनेला घरी सोडयला येतं हे न आवडणं ही सहजिकंच आहे पण ह्यावर तोडगा काय ? बरं नवऱ्यानी बरोबर जावं तर सुनेबरोबर त्याचं ही routine डिस्टर्ब. रोज मरे त्याला कोण रडे ?

एकदा थोडं glamour आलं, लोकं ओळखु लागले आणि सासरच्यांना सुनेचा अभिमान वाटू लागला तर आनंदच आहे, पण निवृत्त व्हायच्या वयात आपली ओळखंच सुनेमुळे होऊ लागली तर कुणाला आवडेल ? ५० वर्ष ज्या घरात आपण राहतोए ते घर ही आता अमुक अमुक गाणारीचं घर म्हणून लोक ओलखायला लागले, तर थोडा त्रास होणारच की !

नवीन सुनेनी सणांना घरी असावं ही माफक अपेक्षा सुनबाई कशी पूर्ण करणार ? कार्यक्रम तर दिवाळी-गणपतीत असणार मग ऐन सणात आपल्यामुळे घर सुनं आहे आणि तरी आपल्याशिवाय सगळे सण पार पडतात ह्याची खंत सून तरी कुठे व्यक्त करणार ?

अशा सारख्या असंख्य छोट्या मोठ्या अडचणी पार करत आणि adjustments करत कुठलीही गाणारी मुलगी आपलं career घडवत असते. कलाकारांचं glamour दिसतं पण त्यामागचे त्यांचे कष्ट लोकांसमोर येत नाहीत, आणि हे कष्ट सुकर होण्यासाठी माहेराबरोबर सासरचा खंबीर पाठिंबा असेल तर यशाकडे जाण्याचा मार्ग अधिक सुकर होतो आणि एक कलाकार पूर्णपणे खुलतो हे मात्र नक्की.


मुलाबाळांसाठी career मधे ब्रेक घेणं, सगळं सोडून कार्यक्रमासाठी परदेशी जाणं, आजीनी नातवंडाना आईसारखं सांभाळणं, अशा हजारो adjustments करत माझ्यासरख्या असंख्य मुली आज संगीत क्षेत्रात यशस्वीरित्या काम करत आहेत ते केवळ घरच्यांच्या पाठींब्यामुळेच. त्या अनेकांचा आदर्श आहेत आणि समाजात मानाचं स्थान मिळवत आहेत. अशा सर्व स्त्री कलाकारांना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या त्यांच्या घरच्यांना माझा मानाचा मुजरा !! 

4 comments:

  1. वा सायली, खूप छान मांडलं आहेस. स्त्री कलाकाराची तळमळ, तगमग, ओढाताण अचूक मांडली आहेस. या सगळ्या जगरहाटीच्या पलिकडे जाउन तुझी कला, गाणं बहरू दे यासाठी महिला दिनानिमित्त मनापासून शुभाशिर्वाद ...

    ReplyDelete
  2. Hi Sayali.. So truely you have penned the reality of female singers.. But it's really the support of the understanding family members may it be parents, inlaws or husband because of whose support we are able to pursue our dream..

    All d best to u and keep singing

    ReplyDelete