प्रिय गोविंद,
लहानपणापासून आईकडून तुझ्या अनेक गोष्टी ऐकल्या, अनेक वेळा देवळात तुझी मूर्ति बाघितली, TV वर बाघितलं, पण तुझा, आणि तुझ्या सखी द्रौपदीचा विचार केला की हमखास तुमचा हेवा वाटतो. तिच्याशी मन मोकळ्या गप्पा मारायला, चेष्टामस्करी करायला, वेळ प्रसंगी सल्ले द्यायला, मदतीला, आधार द्यायला कायम तु होतास. एकदा केलेली मैत्री तु आयुष्यमभर निभावलीस. त्यात गैरसमज नव्हते, संकोच नव्हता, शंका नव्हत्या, होता फक्त एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम.
महाभाराताची ती गोष्ट बघताना असं वाटायचं, तुझ्या सारखा एक तरी सखा आयुष्यात असायला हवा. तो आयुष्यभर सोबत करेल, योग्य अयोग्य मार्ग दाखवेल, सल्ले देईल, समजून घेईल, माझं ऐकुन घेईल आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास असेल.
व्यक्तिरूपात अजून तु समोर आला नसलास तरी अप्रत्यक्षपणे तु माझ्या बरोबर असतोस हे माहिती आहे मला. कधी कुठे अडखळले तर सल्ला देतोस, कधी कुठली अडचण आली तर मार्ग दाखवतोस. तुझं अस्तित्व कायम जाणवतं मला आजुबाजूला पण समोर मात्र येत नाहीस.
आयुष्यात अनेक मित्र भेटले, मनासारखा जोडीदार भेटला पण त्या 'गोविंद’ ची जागा अजूनही रिकामीच आहे. कधीतरीवाटतं तु माझ्या जवळपासच असशील आणि मलाच ओळखता येत नसेल. कुणावर असा मोकळेपणानी विश्वास ठेवायला मला तरी कुठे जमतय..! आणि शिवाय मला जशी तुझ्या भेटीची ओढ लागली आहे, तसं तु मला भेटायला, माझीपण तर पात्रता हवी..!!
तुझी वाट पाहणारी,
तुझी सखी..
No comments:
Post a Comment