गाणाऱ्यांना आवाजाप्रति जागरूकता निर्माण होण एक महत्वाची गोष्ट आहे. त्या विषयाचा अभ्यास प्रत्येक गायकाने करावा, आणि आपल्या आवाजाचं आरोग्य उत्तम ठेवावं ह्या हेतुने लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
नैसर्गिक आवाजाची चार लक्षणं आपण बघितली. पुढचं लक्षण आहे
५. आवाजाची घनता किंवा जाडी ( volume )
कंपनसंख्या न बदलता आवाज वेगळा ऐकु येतो ह्याच एक कारण आवाजाची घनता. सा हा स्वर जोरात किंवा हळु म्हणला तर त्याची कंपनसंख्या बदलत नाही तर त्याच्या घनतेमुळे तो हळु किंवा जोरात, ऐकु येतो.
शास्त्रीय संगीत जोरकस आणि भारदस्त आवाजात गायला पाहिजे असा गैरसमज गाणाऱ्यांमधे दिसून येतो. ह्याच गैरसमजामुळे शास्त्रीय गायक जोर देऊन गातात. असे आवाज परिणाम साधतात पण आवाजाला हानि पोचवतात.
वस्तुत: आवाजाच्या घनतेचा गानप्रकाराशी फारसा संबंध नाही. चांगल्या किंवा नैसर्गिक आवाजात आवाजाची घनता योग्य किंवा माफक प्रमाणात असते. आवाज अति लहान असल्यास अशक्त आणि बारीक ऐकु येतो. या उलट आवाजाची घनता जास्त असल्यास त्यात जडत्व असते.
आवाजाची घनता योग्य प्रमाणात असण्यासाठी श्वासाचं प्रमाण योग्य असावं लागतं.
* श्वास कमी असल्यास खूप कमी हवा तोंडावाटे बाहेर पडते.
* हवा कमी असल्यामुळे स्वर वाक्य संपायच्याआत आवाज बंद होतो.
* कमी श्वासात गायल्यास स्वर कमी लागायची शक्यता निर्माण होते.
* श्वास संपत असताना आवाज काढल्यामुळे आवाजात खर उत्पन्न होते.
* आवाज लवकर दमतो.
* कमी श्वासात आवाज काढायच्या खटाटोपात मान, खांदे, चेहरा या सगळ्यावर ताण निर्माण होतो.
या उलट घेतलेला श्वास अति जोराने आवाज करत बाहेर फेकल्यास आवाजाची जाडी किंवा घनता वाढते. अशा आवाजाची range कमी असते आणि असे आवाज बिघडण्याची शक्यताही जास्त असते. ह्या आवाजामधे सहजता दिसून येत नाही. उलट आवाज निर्मितीमधे अति कष्ट घ्यावे लागतात. हळु हळु ह्या आवाज निर्मितीची सवय होते आणि तेच नैसर्गिक वाटु लागतं.
आवाज निर्मितीच्या वेळी स्वर तंतु एकमेकांजवळ ही एक महत्वाची क्रिया आहे. श्वास नलीकेतून खूप जोरात हवा बाहेर आल्यास, हवेच्या जोरामुळे स्वर तंतु एकमेकांपासून विलग होण्याचा प्रयत्न करतात. एकावेळी दोन विरुद्ध प्रकारच्या क्रिया होत असल्यामुळे स्वर तंतुंमधे घर्षण निर्माण होते आणि स्वर तंतुंना इजा होते. ह्याच कारणामुळे अति जोर लावून काढलेले आवाज वारंवार बसतात.
आवाज जितका हल्का तितका तो सहज वर जाऊ शकतो. जड भारदस्त आवाज सहजतेने वर जात नाहीत हे अनेक उदाहरणांवरून लक्षात येते.
६. गानप्रकाराला साजेसा आवाज
आवाज योग्य आणि माफक प्रमाणात असला की त्यात voice modulation करता येते. आवाज सहज जाड बारीक करता आला की वेगवेगळे गानप्रकार परिणामकारक गाता येतात. चांगल्या आणि नैसर्गिक आवाजाचे हे अजून एक लक्षण आहे. असे आवाज वेगवेगळ्या गानप्रकारांप्रमाणे वेगवेगळे वापरता येतात, त्याचं aaplication बदलता येतं. शास्त्रीय संगीताला वापरला जाणारा आवाज ठुमरी गाताना वेगळा वापरला जातो. तोच आवाज सुगम संगीतात वेगळा वापरला जातो. असं voice application बदलता येणारे आवाज नैसर्गिक आणि चांगले आवाज आहेत असं मानायला हरकत नाही. ह्या वेगवेगळ्या आवाजामधे श्वास, घनता, जात आणि resonances चा फरक असतो. ह्यामधले कुठलेच आवाज खोटे किंवा कृत्रीम मात्र नसतात.
आवाजाची ही लक्षणं तुमच्या आवाजात तपासुन पहा आणि आवाज अधिकाधिक उत्तम आणि नैसर्गिक करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रतिक्रिया, अडचणी आणि सल्ले कळवल्यास, सखोल अभ्यास होण्यास नक्कीच मदत होईल.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in
No comments:
Post a Comment