गाणाऱ्यांसाठी त्यांचा आवाज अत्यंत प्रिय आणि सगळ्यात महत्वाचा असूनसुद्धा त्याबाबत जागरूकता दिसत नाही. आवाज ह्या विषयाचा अभ्यास करुन त्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
मुल जन्माला येतं ते सहसा उत्तम आवाज घेऊन. पुढे चुकीच्या सवयींमुळे, चुकीच्या पद्धतींमुळे आवाज बदलत जातो आणि असंख्य कारणांमुळे तो बिघडतही जातो. आपण करत असलेल्या गोष्टी आवाजासाठी घातक आहेत हे माहीत नसतं आणि सांगणारंही कुणी नसतं. किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी आवाजावर परिणाम करत असतात. तरुण वयात जशी कुठलीही गोष्ट सहज झेपते तसे आवाजाचेही होते. आपण करत असलेल्या चुकीच्या गोष्टी, आवाज निभावून नेतो पण वय वाढायला लागल्यावर त्याचे पडसाद आवाजावर दिसू लागतात. त्या वेळी तो जागेवर आणणं अवघड होऊन बसतं कारण वर्षानुवर्षाच्या सवयी सुटत नाहीत म्हणुनच लहान वयात आवाजाचा अभ्यास व्हायला हवा.
आपण करत असलेल्या अशा काही प्रमुख चुकीच्या गोष्टी.
१. Shallow / Thoracic breathing, म्हणजेच पुरेसा श्वास न घेणे. श्वास घेताना पोटाची हालचाल न होता खांदे वर जाणे.
२. खालचे स्वर म्हणताना खाली आणि वरचे स्वर म्हणताना वर बघणे.
३. गाताना अवघडून बसणे.
४. गाताना चेहऱ्यावर त्रासिक भाव असणे.
५. गाताना हनुवटीच्या खालची पोकळी टणक होणे.
६. आवाजाची दिशा आतल्या बाजुला असणे.
७. आ’ म्हणत असताना जबडा घट्ट करणे.
८. तिन्ही सप्तकात वेगळा आवाज काढणे.
९. श्रम करुन जोरकस गाणे.
१०. गाताना धक्के देऊन गाणे.
११. ऊर्जेचा कमी किंवा जास्त वापर करणे.
१२. गमकेमधे गोंगाटाचे प्रमाण अधिक करणे. शास्त्रीय संगीतात नाद वृद्धि ऐवेजी, आवाजात गोंगाट मिसळला जातो. कधी शास्त्राच्या तर कधी गमक, मींड या नावाखाली आवाजात रुक्षपणा येतो.
या सर्व चुकीच्या सवयींमुळे आवाजावर परिणाम होत असतो. त्या जाणीवपूर्वक टाळता आल्या तर आवाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
आपलाही आवाज उत्तम असावा, तो जास्त काळ टिकावा आणि तो बिघडत असल्यास वेळीच लक्षात यावं ह्यासाठी आवाजाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे त्यासाठी तो पूर्ण बिघडण्याची वाट पाहु नये..!
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in
उत्तम !
ReplyDeleteखुप ऊपयुक्त माहिती... धन्यवाद....
ReplyDelete