दाजी.. म्हणजे ताईचा नवरा असतो, अशी नुकतीच माझ्या ज्ञानात भर पडली , नाहीतर मला वाटलं आमच्याकडे बागकाम करणाऱ्या दादांनाच दाजी म्हणतात.
दाजी, म्हणजे आमच्या area मधलं एक interesting व्यक्तिमत्व होतं. म्हणाल त्या घरी पडेल ते काम करुन, मिळतील ते पैसे घेऊन समाधानात रहणारे असे हे दाजी मला मात्र विशेष आवडत.
खरं पाहता त्यांच्या वागण्यातली कुठलीच गोष्ट सभ्यतेला धरून नव्हती, तरी दाजींमधे एक सच्चा माणुस होता. त्यांना पोटापाण्यासाठी विशेष कधी काही करताना मी तरी कधी पाहिलं नाही. घर चालवणं ही आपली जवाबदारी आहे, अशी त्यांना कधी शंकाच आली नसावी, इतके उडाणटप्पु ते होते. त्यांचं असं वागणं बघुन त्यांच्या बायकोने ही तशी कधी अपेक्षा केली नसावी. आमच्या driver नी कधी चेष्टा करत, “चला येता का दाजी बेळगावला ? “ असं विचारलं तर दाजी क्षणाचा ही विलंब न करता गाडीकडे धाव घेत. मग ती गाडी दुचाकी असो किंवा चारचाकी ! दाजींचं त्या वेळचं ध्येय फक्त बेळगाव असे ! दाजी जगनमित्र होते. रसत्यावर येणाऱ्या प्रत्येकाची दाजी प्रेमानी विचारपूस करत मग ती लहान मुलं असोत, ताई माई असोत किंवा काका मंडळी. सगळ्यांशी गप्पा मारत आलेला दिवस आनंदात घालवणे एवढंच ते करत.
आडाणी लोकांच्या घरी बहुतांश वेळी, बायको चार घरची कामं करुन घर चालवत असते आणि नवरे काही काम न करता दारू पीत आयुष्य निवांत घालवत असतात. आमचे दाजी ही फार वेगळे नव्हते. बायकोनी कामासाठी घरातून हाकललंच तर दाजी काम करत. त्यांनी कधी चार पैसेही घरात दिले नसतील. दाजी अजून एका कारणानी मनापासुन काम करत.. त्यांना दारू प्यायची हुक्की आली तर!
प्रेमळ बायको, दोन हुशार मुलं, गरजेपुरतं छोटं घर सगळं छान होतं. दाजीही वाईट नव्हते फक्त दारूच्या व्यसनानी त्यांना घेरलं होतं. दारू, हे त्यांच्या आयुष्यातलं अंतिम ध्येय होतं. त्यासाठी पडेल ते काम ते मनापासुन करत. त्या कामासाठी किती ही पैसे दिले तरी दाजी खुश असायचे. चार पैसे मिळता क्षणी दारुचा गुत्ता गाठत. एक थोडा थोडका वेळ तिथे घालवला की दाजींना स्वर्गसुख मिळत.
दारू प्यायली की दाजी प्रचलित अप्रचलित अशा सगळ्या प्रकारच्या शिव्या देत, कॉलनीभर फिरत. माझा शिव्यांचा शब्द संग्रह वाढवायचं श्रेय त्यांनाचं द्यायला हवं. ह्या टल्ली अवस्थेत, शिव्यांचा भडीमार चालू असतानाही दाजींचा gentlemen approch कधी बदलला नाही. शिव्यांचा कार्यक्रम चालू असताना कुणी समोर आलं तर दाजी अदबिनी वाकुन नमस्कार करत. विचारपूस करत. एवढंच नव्हे तर त्याच वेळी कुणी घरी परतत असेल तर दाजी बंगल्याचं दार उघडुन सलामही ठोकत. त्यांच्या त्या अवस्थेतही त्यांची भिती कुणाला वाटली नसेल.
दाजींना अजून एका गोष्टीचं वेड होतं. ते म्हणजे राजकरणाचं. दारू ढोसली की दाजी जोर जोरात राजकरणावर बोलत. तास दोन तास, देश, मराठी माणुस, गरीब जनता, सुधारणा, आर्थिक स्थिति, व्यवहार, रस्ते, लोकशाही, election, मतांसाठी appeal, राष्ट्र, परराष्ट्र वगेरेंसारख्या विषयांवर ते अखंड बोलत फिरत. त्यांच्या एका ही वाक्याचा न कधी अर्थ लागत, न कधी शब्द संपदा तोकडी पडत आणि न कधी विषय संपत. भाषणात कितीही आवेग असला, body language कितीही confident असली तरी ओळखीचा माणुस भेटल्यावर तिच अदब आणि तिच नम्रता पुढे येत.
दारूची हुक्की आली आणि पैसे नसले की मग मात्र दाजींची अवस्था वाईट होई. अशा परिस्थितित ही सभ्यतेची कास सुटत नसे. दाजी पहिल्यांदा काम देण्यासाठी आग्रह करत. काम नसेल तर मुलगी आजारी आहे, गावाला जायचए, अडचण आहे, पैसे हवेत, मुलगा पडला, औषध आणायचंए सारखी कारणं सांगत आणि ते ही चाललं नाही की, ”आईसाहेब मदत करा, तुमचा मुलगा अडचणीत आहे, तुम्हीच मदत कराल माहितए मला” वगेरे.. सारखे dialogue मारत. त्यांचा हा हट्ट एखाद्या लहान मुलाला लाजवेल असाच असे. पैसे दिले की दिवस दारूच्या अड्डयावर जाणार हे माहित असूनही कुणीतरी त्या प्रेमळ हट्टाला बळी पडे !
दाजींचं वागणं चुकीचं असेल, समाजात त्यांना मान नसेल पण माणुस म्हणुन ते साधे सरळ होते, खरे होते, पारदर्शक होते, त्यांच्या वागण्यात सच्चेपणा होता. जवळ काही नसताना आयुष्यात समाधानी होते. आनंदात होते.
आता घर बदललं तसे दाजी भेटत नाहीत. जुन्या घराच्या, तिथल्या लोकांच्या अनेक आठवणी येत असतात आणि त्यातली एक महत्वाची आठवण असते, ती दाजींची...आमचे दारुडे सभ्य दाजी !!