प्रिय पुस्तक,
कधी कधी मला आश्चर्य वाटतं की आपली मैत्री व्हायला एवढा वेळ कसा लागला..!..? लहानपणी आई फार वेळा तुझं महत्व पटवून द्यायची. 'हेच आपले खरे मित्र असतात, वेळ प्रसंगी कुणी नसलं, तरी हे आपली साथ कधी सोडत नाहीत’ वगेरे .... कितीतरी वेळा स्वतः पुढाकार घेऊन माझ्या हातात तुला द्यायची, अनेक वेळा स्वतः वाचून दाखवायची पण मला त्या वयात काही केल्या तुझी गोडी लागली नाही.
नाही म्हणायला, आईचा एखाद दुसरा हट्ट मी पुरवला असावा, पण म्हणावी तेवढी मजा आल्याचं मला काही आठवत नाही.
पण एकदाचं आईला यश आलंच !
तुझ्याबद्दल प्रेम वाटायला कॉलेजचे दिवस उजाडले, ते वयंच प्रेमात पडायचं असतं म्हणुन असावं बहुधा. दिवस रात्र तुला जवळ घेऊन मी तुझ्यात बुडलेली असायचे. डोळे उघडले की तु समोर, इतपत ते वाढलं. आई ओरडायची, तरी तहान भूक हरपून मी मात्र तुझ्याच मागे. समोर TV चालू असो, हातात जेवणाचं ताट असो, आईचा रियाज चालू असो किंवा इतर कुठलेही खंडीभर आवाज असोत, कशानीही आपल्यात दुरावा आला नाही.
ते वय ही असंच असतं, मनात येईल ते करता येण्यासारखं...
हळु हळु व्याप वाढत गेले आणि तुझा सहवास कमी कमी होत गेला, पण तरी तुझ्याबद्दल तीच ओढ अजूनही वाटते. अजूनही वाटतं, तुला हातात घेतलेलं की संपेपर्यंत खाली ठेवुच नये.. पण तसं होत मात्र नाही. आपलं जमलेलं tunning मधेच तुटतं आणि मग अनेक दिवस जातात परत वेळ मिळायला.
खरं सांगु .. ! एकांत.., डोळ्यासमोर तु आणि हातात कॉफीचा मग ह्यासारखं दुसरं सुख नाही. कितीही e-books येवो, online material मिळोपण तुझी सर मात्र कशातच नाही.
तुझी अनेक रूपं पहिली, अनेक अनुभव घेतले, कायम आनंदच दिलास.... पण आता मात्र थोडी भिती वाटते. ह्या socialmedia च्या जगात तुझं अस्तित्व हळु हळु कमी होतए. जो आनंद तु आम्हाला दिलास तो पुढची पिढी गमावणार का काय ? तुझं महत्व पटवून द्यायला आम्ही कमी पडणार का काय ? जे आईला जमलं ते मला जमेल की नाही ?
आपण मिळवलेला आनंद आपल्या मुलांना नको का मिळायला ?
ह्यावर आता तुच काहीतरी मार्ग काढ रे बाबा !
चिंतेत असलेली तुझी मैत्रिण..
खूप छान लिहीलंय.
ReplyDelete