Sunday, 29 September 2019

प्रिय.... झाडांनो,


प्रिय.... झाडांनो,

मला अनेक गोष्टींची आवड आहे, पण एक गोष्ट मला कधीच विशेष जमली नाही ती म्हणजे 'बागकाम’.
जुन्या घरी बंगल्याबाहेर मोठी बाग होती. क्वचित कधी तरी बागेला पाणी घालायचं काम माझ्याकडे यायचं. तेवढाच काय तो तुमचा संबंध. 

नवीन घरी आल्यावर मात्र ही आवड नव्याने जोपासायची असं मनाशी पक्क ठरवलं. स्वतः Nursery मधे जाऊन तुमचे आवडलेले २/४ प्रकार आणले. तुम्हाला साजेश्या सुंदर कुंड्या आणल्या. 
एक मात्र खरं, फुलांनी बहरलेल्या तुमच्या अस्तित्वानी घराला खरं घरपण आलं. तुमचं रूप बघुन डोळ्याचं पारणं फिटायचं. तुमची फुलं मात्र थोडेच दिवस टिकायची आणि परत यायचं नाव ही काढायची नाहीत, तरी तुमचे सगळे लाड मी पुरवत होते. TV जवळ तुम्ही खुलून दिसता म्हणुन तिथे तुमचा ठिया. थोडा वेळ ऊन दाखवायला हवं म्हणून दुपारी तुमची रवानगी खिडकी जवळ. रोजचं पाणी घालणे, कधीतरी खत ! 
साग्रसंगीत असे तुमचे सगळे लाड केले, पण तुम्ही मात्र महीना दोन महिन्यात मान टाकायचात. माझा हा उस्ना उत्साह टिकायची लक्षणं अवघडच दिसत होती. तरी मी हार मानली नाही !!
तुमचे नवीन नवीन प्रकार आणून प्रयत्नशील राहिले. 

ह्या सगळ्यामधे एकदा गावाला जायचं ठरलं. रोज काळजी घेऊन सुद्धा तुम्ही मान टाकणारे, ८ दिवस तुमचं काय होणार म्हणुन तुम्हाला घराबाहेर ठेवायचं ठरलं. बाईंना तुम्हाला पाणी घालयची जवाबदारी दिली आणि आम्ही निश्चिंतपणे जाऊन आलो. 
आल्यावर तुमची परिस्थिति कशी असेल ह्याबद्दल शंका होती पण आश्चर्याचा धक्काच बसला. तुम्ही अधिक टवटवीत होऊन बहरला होतात. ऊन, खत सारखे कुठलेच लाड तुम्हाला नको होते. 
आता मात्र माझा उत्साह पूर्ण गळून गेला आणि तुमची रवानगी कायमसाठी घराबाहेर गेली.

ह्या अनुभवाला काही दिवस गेले आणि विचार केला, प्रेमानी तुमची खातीरदारी करत असून काही तरी होतं जे तुम्हाला खटकत होतं. मनापासून केलेलं काम आणि वर वर केलेलं काम ह्यातला तो फरक असावा बहुधा. 
Positive negative vibes म्हणतात त्या ह्याच का ?


Sorry :(

1 comment:

  1. 🌳🌴🌲 शो ची झाडे जाऊदेत 🌶 मिरच्या लावून बघ लगेच येते आणि आपण केलेल्या कष्टाचे फळ मिळते सॉरी मिरच्या मिळतात😁

    ReplyDelete