गाणाऱ्यांना आवाजाप्रति जागरूकता निर्माण होण एक महत्वाची गोष्ट आहे. त्या विषयाचा अभ्यास प्रत्येक गायकाने करावा, आणि आपल्या आवाजाचं आरोग्य उत्तम ठेवावं ह्या हेतुने लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
जन्मत: मिळालेला आवाज मुळात नैसर्गिक असतो. त्यात उत्तम आवजातले सर्व गुण असतात, आणि तो स्वाभाविक, अकृत्रिम आणि सहज असतो. अशा आवाजातले ६ गुण आपण बाघितले.
१. आवाज ताब्यात असतो
२. आवाजाचा पोत उत्तम असतो
३. श्वास उत्तम असतो
४. उच्चारण स्पष्ट असतं
५. आवाजाची जाडी योग्य असते
६. गानप्रकाराला साजेसा आवाज
या पुढील लक्षणं ..
७. सातत्य
वरच्या सर्व गुणांबरोबर आवाजात सातत्य असणं एक महत्वाचा गुण आहे. सातत्य असणं म्हणजे आवाजाची गुणवत्ता सर्व सप्तकात आणि गाताना प्रत्येक वेळी टिकुन राहणं. आवाज तिन्ही सप्तकात एकसारखा येणं म्हणजे आवाजाची जाडी, जात, पोत, श्वास, गोडवा वगेरे सर्व एक सारखा ऐकु येणं. आवाजाची गुणवत्ता सप्तक बदलल्यावर बदलत असेल तर एकुण परिणाम साधला जात नाही.
हे सातत्य मिळवण्यासाठी आवाज निर्मिती तिन्ही सप्तकात एकसारखी असायला हवी. त्यात कुठलेच शारीरिक किंवा मानसिक बदल होता कामा नयेत. आवाज निर्मितित सहजता ही रियाजाने येते. रियाजात सातत्य असेल तर आवाज निर्मितीसाठी लागणारे स्नायु नियमित वापरामुळे योग्य कार्य करतात.
८. भाव
सर्व वाद्यांमधे मानवी आवाज हा सर्वात भावपूर्ण आहे, पण आवाजातून भाव प्रगट झाला नाही तर गाणं तेवढंच कंटाळवाणं ही वाटु शकतं. असं गाणं कितीही शास्त्रशुद्ध आणि सुरेल असलं तरी हृदयाला भिडत नाही, कारण त्यात भावाची कमतरता असते. अपेक्षित असलेला भाव आवाजातून दिसण्यासाठी सुराबरोबर आवाजाचा पोत, त्याची जाडी, श्वासाचा उपयोग, पट्टी, उच्चारण ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास असणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी हव्या तिथे वापरता आल्या तरच त्यात भाव दिसतो नाहीतर गाणं केवळ तांत्रिक होतं.
९. अष्टपैलुत्व
आवाजात वर उल्लेख केलेले बदल करता आले तर आवाजाचा पोत बदलता येतो. हे सर्व बदल गायकाच्या इच्छेप्रमाणे योग्य तिथे जाणीवपूर्वक केले जातात आणि ते नकळत होत नसतात. शिवाय, हे सर्व आवाज खरे असतात, खोटे काढलेले नसतात. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, नाट्यगीत, चित्रपट गीत गाताना असे वेगवेगळे पोत वापरून गाणं अधिक परिणामकारक होतं. असं न केल्यास शास्त्रीय संगीत गाताना सुगम संगीताचा भास होतो, किंवा सुगम संगीत असून ते शास्त्रीय वाटतं वगेरे.
अशा आवाजात कुठला ही गीत प्रकार अधिक खुलून दिसतो आणि असे गायक अष्टपैलु गायक असतात.
१०. सहजता
ज्या गायकांचे आवाज नैसर्गिक असतात, त्यांच्या आवाजात सहजता असते. गात असताना त्यांना कुठल्याही प्रकारचे शारीरिक किंवा मानसिक त्रास होत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही त्रासिक भाव नसतात किंबहुना असे गायक प्रसन्न चेहऱ्याने स्मित हास्य ठेवुन गात असतात. गाण्याची क्रिया अत्यंत सहज होत आहे असे त्यांच्या गाण्यातून दिसून येते.
नैसर्गिक आवाजात वर दिलेली सर्व लक्षणं असतात. आवाज नैसर्गिक असल्यास त्यात दोष उद्भवत नाहीत आणि अनेक वर्ष उत्तम टिकुन राहतो.
आवाजाची ही सर्व लक्षणं तुमच्या आवाजात तपासुन पहा आणि आवाज अधिकाधिक उत्तम आणि नैसर्गिक करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रतिक्रिया, अडचणी आणि सल्ले कळवल्यास, सखोल अभ्यास होण्यास नक्कीच मदत होईल.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in