Monday, 11 February 2019

कुणी मित्र देता का मित्र ?


लग्न ठरलं की प्रत्येक जण आपापल्या परिनी नव्या जोडप्याला सल्ले देत असतो. मिळणाऱ्या सल्ल्यांमधला, एक सल्ला मला नेहमी आठवतो. ‘लग्नाला दहा बारा वर्ष झाली की दोघांमधे बोलण्यासारखं काsही उरत नसतं. काय गप्पा मारायच्या आहेत त्या पहिल्या दहा वर्षात मारून घ्या.’ प्रत्येकाला वाटतं, ”आमचं नाही बाबा होणार तसं ! आमची क्षेत्र वेगळी, अनुभव वेगळे, आम्हाला एकत्र मिळणारा वेळ ही कमीच, मग बोलायला काही नसेल असं कसं ?”

पहिली दहा वर्ष छान जातात, ती जाणार असतातच. एकमेकांना वेळ देणं, एकमेकांना सगळं सांगणं, भरपूर गप्पा, sharing सल्ले मसलत.... आणि ..आणि मग अचानक सुरु होतात फक्त मित्रांच्या / मैत्रिणींच्या trips आणि ठरतात individual plans. मग जमतो वेगळा trekking चा ग्रूप, morningwalk चा group, Gym चा ग्रूप, शाळेतला ग्रूप, कॉलेज चा group आणि असे अनेक ग्रूप जिथे खूप जणं असतात फक्त नवरा आणि बायको सोडून ! आणि लक्षात येतं, इथेच खूप मज्जा येतीए. दोघांमधलं प्रेम तसुभरही कमी झालेलं नसतं पण आता जरा स्पेस हवी असते. नवीन कुणी तरी हवं असतं चौकशी करणारं, विचारपूस करणारं, दोन घटका गप्पा मारणारं, सल्ले देणारं. 

ऑफिस मधल्या कामाच्या व्यापामधुनसुद्धा दिवसातून सहज म्हणून केलेला एखादा फोन कधी थांबतो कळतंच नाही. आता सहज फोन आला तर वाटतं ठीके न सगळं, किंवा मग, आज काहीच काम दिसत नाही म्हणून आठवण झालेली दिसतीए !

Birthdays, Anniversarys चे surprise गिफ्ट कधीच थांबलेले असतात. खूप आहे काय देणार म्हणून, किंवा ‘online पाहिजे ते सारखंच तर आणत असतेस अजून काय वेगळं आणायचं मी ?’, ‘तु सांग, हवं ते घ्यायला जाऊ ! ‘ पण ह्यात, गिफ्ट मिळायची मजा नाहीच मुळी.! अशा दिवशी कुठे दोघंच बाहेर जेवायला जावं म्हणलं, तरी काय बोलायचं बरं एकमेकांशी ? नवीन जोडपी कशी अखंड गुलू गुलू करत असतात, तसं कसं बरं जमावं आता ? हां, त्याजागी एखादा मित्र असेल तर मात्र जमेल. कसं कुणास ठाऊक बुआ !!

जरा विचार केला आणि वाटलं असं होणं स्वाभाविकच आहे की, अति परिचय आणि अति सहवासातून दुसरं काय होणार ?  माणसाला ना सतत नाविन्याचा ध्यास असतो. आपल्याला फक्तं त्याच गोष्टीबद्दल कुतूहल आणि आकर्षण वाटत असतं, ज्या बद्दल माहीत नसतं आणि नवरा तर दहा वर्षांमधे कोळून प्यायलेला असतो. मग अशा वेळी मित्रंच तर कामी येणार ना ? गप्पा मारायची जागा एखाद्या मित्रानी घेतली तर काय बिघडलं ? उगाच कंटाळून, मारून मुटकुन, आणि पर्याय नाही म्हणून एकमेकांना सगळं सांगायला हवं असं कुणी सांगितलं ? मन मोकळं होणं महत्वाचं, मग ते नवऱ्याकडे असेल किंवा मित्राकडे, नवरा बायको मधे प्रेम टिकुन राहिलं म्हणजे बास !


त्या मैत्रीमधे आणि मैत्री पलिकडच्या नात्यामधे एक बारीकशी रेश असते, त्याचं भान असलं म्हणजे झालं !! ते भान ठेवुन मैत्री जमली तर खुशाल करावी मैत्री आणि खुशाल करावं मन मोकळं, उगाच नवऱ्यावर तरी कीती जवाबदाऱ्या टाकाव्या ? 

No comments:

Post a Comment