प्रिय सा,
3 वर्षाची होते जेव्हा आईने तुझी पहिल्यांदा ओळख करून दिली. अगदी तेव्हापासून आपली मैत्री. पण खरं सांगू ? वर्षानुवर्ष जशी मैत्री घट्ट होत चाललीए तसा तसा तू अजून अजून लांब आहेस असं वाटतं कधी कधी. तसा तू जाम हट्टी आहेस हं ! तुला प्रेमानी कुरवाळलं, तुझी आर्जवे केली , तुझ्यामध्ये सर्वस्व ओतलं, तरी तू ..तुझी इच्छा नसेल तर मुळीच येत नाहीस जवळ. कायम तुझ्यासमोर शरणागती हवीच!
पण त्या शरणागतीत आनंद आहे. कुणाला तरी शरण जावंच ! त्यांनी आपला भार हलका होतो म्हणे !
आयुष्यात अनेक लोक आली, गेली. रुसवे फुगवे, हेवे, दावे, मत्सर सगळं अनुभवलं, पण तू कधी सोडून गेला नाहीस. माझ्या आनंदात माझ्या दुःखात सदैव पाठीशी उभा राहिलास, ओळख झाल्यापासून ! एखादी वस्तू किवा व्यक्ती सतत जवळ असल्यावर जसा तिचा लळा लागतो तसा तुझा लळा लागलाय. तुझी माझी ओळख माझ्या जन्मापासून असली तरी तू आमच्या घरातला खूप जुना सदस्य आहेस. माझ्या आईचा, आजीचा खूप जवळचा स्नेही !! म्हणूनच आपली पण मैत्री झाली, सहज, आणि गट्टी जमली, ती आयुष्याभाराचीच !!
तू आलास की तुझे सहा जोडीदारही आले. त्या सगळ्या स्वरांमधे देखिल तू आहेसच. सगळ्या सप्तकात स्वैर संचार करणं म्हणजे जग फिरण्याचा आनंद आणि फिरुन आल्यावर सा वर परत येणं म्हणजे जणू माहेरी आल्याचा भाव. तोच आनंद, तिच शांतता, तेच समाधान, तिच तृप्ति.
सगळ्या सप्तकाचा तु राजा. सहा स्वरांना जन्म देणारा तू..तू आणि तुला जन्म देणारा तो, तुमच्यात खूप साम्य दिसतं मला.. परमेश्वराचा अंशच तू ! अगदी त्याच्यासारखा. तुझ्या जवळ येता आला तर परमेश्वराच्या जवळ गेल्याचा आनंद होतो. तुझ्या सहवासात सगळं विसरतं. तल्लीन होता येतं. अवर्णनीय आनंदाची अनुभूती होते.
रियाजात कधीतरी भेटतोस. समोर उभा असतोस विठ्ठलासारखा कमरेवर हात ठेवून, कधीतरी हुलकावणी देऊन पळून जातोस लबाड बालकृष्णासारखा !
तुझ्यामुळे खूप आनंद मिळाला कायम. अनेक लोकं जोडली गेली, अनेक गुरु भेटले, खूप मित्र, काही हितशत्रू, काही निंदक आणि काही न पटणारी लोकं सुद्धा. अनेकांचं प्रेम मिळालं, आशीर्वाद मिळाले. खूप आदर सन्मान मिळाला. खरं म्हणजे माझ्या आनंदासाठी मी तुला कायम धरून ठेवलं. मनापासून प्रेम केलं तुझ्यावर. त्या बदल्यात कुणी माझं कौतुक करावं, मला आदर द्यावा असं नव्हतंच मुळी पण परिसाच्या स्पर्शानी आयुष्याचं सोनं व्हायचं रहात नाही !
तू खूप दिलंस, खूप शिकवलस. जमिनीला घट्ट धरून ठेवण्याचा आदर्श दिलास. अजूनही खूप देत राहशील आयुष्यभर. माझी साथ मात्र सोडू नकोस कध्धीच..
तुझी कृतज्ञता शब्दात व्यक्त करणं अवघड आहे.
असंच तुझं प्रेम कायम मिळत राहो.
तुझीच मैत्रीण ...