Monday, 9 March 2020

रंग माझा वेगळा


लहानपणी आपण अनेक अशा गोष्टी करत असतो ज्याची मोठेपणी खूप गंमत वाटते. अशी मी करत असलेली एक गोष्ट म्हणजे मित्र मैत्रिणींच्या slam books भरणे. त्या वयात त्याचं काय ते अप्रूप असे म्हणुन आमच्या वेळी प्रत्येकाकडे एक slam बुक असायचीच. आवडता hero, छंद, best friends, मोठेपणी काय व्हायचए वेगेरे सारखे अनेक प्रश्न त्यात असायचे. त्यातला निम्म्या प्रश्नांचं उत्तर कळायचं वय नव्हतं आणि निम्म्या प्रश्नांची उत्तरं नसायची. त्यातल्या एका प्रश्नाची मात्र मला कायम गंमत वाटते. आवडता रंग ? .. आणि त्यावर सगळ्यांचं ठरलेलं उत्तर असायचं.. all colours of life .. ! या उत्तराचा अर्थ मला तेव्हा तरी नक्कीच उमगलेला नव्हता. बहुतेक आपण खूप मोठे झालो असं वाटून किंवा मग आपल्या लिखाणात जरा साहित्याचा स्पर्श असावा असं समजून अशी उत्तरं लिहित असू.. !

रंग म्हणलं की आपल्यासमोर येतं ते रंगाचं pallet, रंगीत खडु, water colours, pastel colours, crayons आणि रंगाचे अनेकानेक विविध प्रकार, पण आयुष्यातले रंग या pallet मधले नसतातच मुळी. प्रत्यक्ष आयुष्यात रंग हाताळले नसले तरी प्रत्येकानी हे रंग मात्र जवळून अनुभवलेले असतात. या रंगांचा उल्लेख झाला तरी कुठलाच विशिष्ठ रंग डोळ्यासमोर येत नाही पण तरी त्या रंगाचा अर्थ मात्र कळतो.

लहानपणी मैत्रिणींबरोबर भातुकलीचा खेळ रंगतो. वयात आल्यावर प्रेमाचा रंग कळायला लागतो. अनेक लोकं आयुष्यात येतात आणि जातात तसे नवीन रंग भरत जातात आणि उतरतातही.. !
अनेक रंगी बेरंगी माणसं भेटतात, कुणी आनंद देतं कुणी दुःख, कुणी फसवतं तर कुणी भरभरुन प्रेम देतं. कुणाच्या सहवासात स्वतः रंगुन जातो तर कुणाला स्वतःच्या रंगांनी रंगवतो. भेटलेल्या प्रत्येकाचा रंग मात्र वेगळा असतो, अर्थात या सगळ्यांमुळे आयुष्य मात्र रंगीत होत जातं.

पुढे लग्न होतं. आयुष्याचे नवीन रंग उलगडतात, अनेक रात्री रंगतात. नवऱ्याच्या बरोबरीनी नवीन लोकं जोडली जातात. सासरचे नवीन रंग ढंग कळतात आणि त्यांच्या व्यापामधे स्वतः कधी रंगतो कळतच नाही.

इतके वेगवेगळे रंग आणि रंग संगती प्रत्येकाच्या आयुष्यात असल्यावर कुणाचं आयुष्य बेरंग असू शकेल ? All colours of life तेव्हा कळत नसले तरी आता मात्र स्पष्ट दिसतात आणि आयुष्य सुंदर करुन टाकतात.. !

1 comment:

  1. सायली, खूप सुंदर आणि प्रत्येकाच्या मनातलं लिहिलं आहेस..

    ReplyDelete