गाणाऱ्यांना आवाजाप्रति जागरूकता निर्माण होण एक महत्वाची गोष्ट आहे. त्या विषयाचा अभ्यास प्रत्येक गायकाने करावा, आणि आपल्या आवाजाचं आरोग्य उत्तम ठेवावं ह्या हेतुने लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
आवाज योग्य येण्यामधे श्वासाचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे, म्हणुनच गाणं शिकवण्याच्याही आधी योग्य श्वास घ्यायला शिकवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा चुकिचा किंवा कमी अधिक प्रमाणात श्वास घेतल्याने आवाजात बदल दिसून येतो. आवाज बिघडण्याच्या अनेक कारणांमधे हे एक महत्वाचं कारण आहे.
२. कमी अधिक श्वास
आपण नाकाने घेतलेला श्वास, घशावाटे फुफुसात जातो आणि आवाज निर्मिती न झाल्यास आल्यामार्गे परत बाहेर पडतो. ह्या स्थितीत स्वर पट्टया एकमेकांपासून लांब असतात. आवाज निर्मिती होते तेव्हा, स्वर पट्टया जवळ येतात आणि तोंडावाटे हवा बाहेर जायचा मार्ग बंद करतात. ह्या बंद स्थितीत खालून येणाऱ्या हवेचा जोर वाढतो, स्वर पट्टया कंप पावतात आणि फुफुसातून बाहेर येणारी हवा स्वर पट्टयांमधून, तोंडावाटे बाहेर पडते. स्वर पट्टयांचं योग्य प्रमाणात कंपन होण्यासाठी योग्य प्रमाणात श्वास घेणं गरजेचं आहे.
श्वास कमी असल्यास स्वर पट्टयांचं पुरेसं कंपन होत नाही आणि आवाज खूप बारीक आणि हळु येतो. ह्या आवाजाचा पाहिजे तसा प्रभाव पडत नाही.
या उलट गरजेपेक्षा अधिक श्वास घेतल्यास, फुफुसाकडुन अधिक प्रमाणात हवा बाहेर फेकली जाते. आवाज निर्मितीसाठी स्वर पट्टया जवळ यायचा प्रयत्न करतात पण उच्छ्वासाच्या जोरामुळे स्वरपट्टया लांब केल्या जातात. एकावेळी दोन उलट क्रिया होत असल्याने आवाज फाटतो. ह्या क्रियेमुळे स्वर पट्टयांच्या कडा घासल्या जातात व घर्षणामुळे त्या खडबडीत होतात. ह्याने आवाजावर परिणाम होतो आणि आवाज बिघडत जातो.
हे टाळण्यासाठी नैसर्गिक श्वास घ्यावा. जास्त वेळ गाता यावं यासाठी जास्ती श्वासाचा हव्यास टाळावा. जास्त श्वास घेण्यासाठी अनेक वेळा खांदे वर उचलले जातात, मानेच्या शिरा ताणल्या जातात. असे केल्यास श्वास तर वाढत नाहीच शिवाय मानेवर व खांद्यावर ताण आल्याने आवाजावर परिणाम होतो. श्वास घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्राणायामचा उपयोग होतो. आपले बुजुर्ग कायम ' पोटातून गा’ असं सांगत आले आहेत. ह्याचाच अर्थ श्वास छातीत न घेतात पोटात घेणं. Voice blog 14 मधे आपण diaphragmatic breathing चा अभ्यास केला आहे. तसा घेतलेला श्वास नैसर्गिक असतो आणि त्याने आवाज नैसर्गिक येण्यास मदत होते.
श्वास घेणे’ ही अत्यंत नैसर्गिक क्रिया असली तरी बहुतांश लोकं वरवर श्वास घेतात. गाताना मात्र असा श्वास घेणे योग्य नाही. जागरूक राहुन आपल्या श्वासाकडे लक्ष दिल्यास आवाज सुधारण्यास नक्की मदत होईल.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in