Sunday, 10 June 2018

चाल

चाल

" चालणं हा सर्वोत्तम उपाय ", पण तो चालतो का कुणाला ? वेळ फार जातो न त्यात ! व्यायामासाठी जिम आहे, club आहेत, चालायला वेळ कुठे कुणाला ? जरा कोपऱ्यावर जायचं तर गाडी आहेच. सगळं कसं झटपट हवं..!! मग व्यायामाची कायम चालढकल !

आमचे वडील फार कडक. लहानपणी कायम त्यांचंच चालायच. ते आम्हाला चालायला डोंगरावर पाठवायचे. तीच सवय आजपर्यंत चाललीए.

सकाळी गडबडीची वेळ ! कुणाचे डबे, कुणाची चहाची घाई, कुणाची अंघोळीची गडबड, कुणाची पहाटेची अभ्यासाची वेळ. ह्या सगळ्यातून पळ काढून मी सरळ चालत सुटते.
कुणाला चालो अथवा ना चालो मी माझं चालणं रोजच्या रोज ठेवलय. चालताना walkman लावायचा कानात आणि चालत सुटायचं रस्ता दिसेल तिथे. कानात गाणं चालू असलं कि चालायला कसा जोश येतो पण काय ती आजकालची गाणी आणि त्याच्या चाली. न धड शब्द न चाल. पण उत्तम चालतात असली गाणी..! लहान लहान मुलांची तर तोंड पाठ असतात. तुम्ही म्हणाल चालतातच न गाणी..? आपली आवड निवड जमत नाही म्हणायचं आणि द्यायचं सोडून !
काय त्या पुरवीच्या चाली ! इतकी वर्ष झाली तरी अजुन मनात घर करून आहेत ! आजकालच्या चालींना त्याची सर कुठून येणार ? असो !!

आजकाल हे व्यायामाचं खूळ जरा जास्तच वाढलंय. पूर्वी कुठला आला व्यायाम आणि कुठलं काय. पूर्वीच्या चाली रिती सांभाळता सांभाळता जन्म निघून जायचा बायकांचा. आमच्या घरात हे नाही चालत आणि ते नाही चालत..! सगळ्यांच्या चाली सांभाळायच्या घरच्या बाईनी !
आजकालच्या सुना घेतील का चालवून ? आमचं जमत नाही म्हणून, थाटातील वेगळं बिऱ्हाड. तुम्ही बसाल हे चालत नाही ते चालत नाही करत !

पूर्वी बायका घर आणि मुलं सांभाळायच्या. घराबाहेर पडायचं कारणच नाही. कोण चालवून घेणार त्यांचं बाहेर पडणं ?
हळू हळू का होईना ह्या रूढी बदलल्या. बायका बाहेर पडल्या आणि तेव्हापासून चलताएत पुढे पुढे !
आज त्या घर सांभाळून इतर गोष्टी करतात. ऑफिसस चालवतात, हॉटेल्स चालवतात, business चालवतात, दुकान चालवतात. पुरूषांच्या बरोबरीनी खांद्याला खांदा देऊन चालतात.

आमच्या घरातही आम्ही दोघं अगदी बरोबरीनी चालतो. अर्थात मी चालवून घेतलं म्हणूनच ! नाहीतर तुम्हाला म्हणुन सांगते, ह्यांची अगदी कसवाचीच चाल. आमच्या ह्यांच्या चालीनी संसार केला असता तर काही खरं नव्हतं. घरात तसं चालतं माझंच !

घर चालवायचं म्हणजे काही सोपं काम नाही. कामवाल्या बायकांचं चालवून घ्यायचं म्हणजे फार बाई धीराचं काम. जरा त्यांच्या मनाविरुद्ध झालं कि चालत्या होतात ! कितीही मनासारखे पगार दिले तरी चालतं त्यांचंच.



घरातल्या सगळ्याच्या मरज्या सांभाळत आणि सगळ्याचं चालवून घेत आता कंटाळा आला. ५० वर्ष संसार झाला. आता चालून चालून खूप दमलीए. असं वाटतं लवकर एक सून यावी आणि तिनी चालवावा संसाराचा गाडा. तिच्या हातात सगळं देऊन आपण निवृत्त व्हावं. तसा मोह सुटायला हवा म्हणा ! पण ठरवलंय तर तसंच वागायचं. म्हणतात नं..बोले तैसा चाले !