Tuesday, 6 March 2018

आपण दोघी




सकाळी उठल्यावर आरशात बघितलं आणि सहज लक्ष गेलं. डोक्यावर एक पांढरा केस खुणावत होता. वय वढल्याची जाणीव झाली. इच्छा नसली तरी वाढतं वय कुणाला चुकलंए, असो ! .. थोडक्यात, मेंदी लावायची वेळ झाली. या रविवारी पहिलं काम हेच !
वय वाढलं तरी एक बरं असतं, त्या त्या वयात वाटतं ,आत्ताचंच वय उत्तम आहे. म्हणलं तर चार पवासाळ्यांचा अनुभव आहे, नवीन काहीतरी करायची उर्मी आहे, अंगात ताकद आहे, जिद्द आहे, वेळ आहे, योग्य अयोग्यची समज आहे, गमावल्याचं दुखः नाही आणि नवीन कशाची हाव नाही. समाधान कशाला म्हणतात, ते या वयात निश्चित आहे. पुढच्या वर्षीचं देवाला ठाऊक..!

असो, वयाबद्दल तक्रार नसली तरी पांढऱ्या केसाबद्दल नक्की होती. मेंदी लवायची हे ठरलं. दहा वेळा स्वतःला बजावूनसुद्धा कामाच्या व्यापात शनिवारी मेंदी भिजवायची विसरली आणि रविवार उजाडला.  " असूदे, कोण मला इथे जाब विचारायला बसलंय ..?..! आज नाही तर पुढचा रविवार, चार पाढरे केस एवढे काही लक्षात येत नाहीत कुणाच्या " , मग वाटलं जाऊदे मरुदे !! पुढच्या महिन्यात एका लग्नाला जायचंय तेव्हाच लावावी.

रविवार...., कितीही घाई केली तरी निवांतच असतो. सावकाश उठायचं सावकाश आवारायचं. कुणालाच कसली लगबग नाही. बाकी काही नाही तरी स्वयपाक उरकावा म्हणुन freeze उघडला तर एक ही भाजी नाही ! कितीही नेटानी संसार केला तरी काहीतरी राहतंच, आणि राहिलं तरी माझ्याशिवाय कुणाचं काय अडणार..? असो पटकन कोपऱ्यावर  जाऊन भाजी आणावी म्हणलं, पण अशा घरातल्या कपड्यांवर जायचं कसं ? कपडे बदलणं आलं, तोंड आवरणं आलं आणि या सगळ्यात, पुढची दहा मिनीटं सहज जाणार. नको बाई !! भाजी आणणं जास्त महत्वाचं आहे. कपडे बदलणार कधी, भाजी आणणार कधी आणि स्वयपाक होणार कधी..!? शिवाय सकाळी सकाळी आपले कपडे बघायला वेळ कुणाला आहे ? जावं तसंच ! आरसा न बघता भाजी मंडई गाठली आणि तरीसुद्धा उत्तम भाजी मिळाली.

सोमवारी office मधे दुप्पट काम होतं. सकाळ laptop मधे डोकं घातलं ते संध्याकाळीच वर आलं. खरं म्हणजे आमच्या दिनक्रमात, एक चक्कर ladies room ला असते. जरा आरशात बघुन, एकमेकींच्या साड्यांचं, ड्रेसचं, purse चं कौतुक करायचं, साडी सावरायची, तोंड आवरायच की परत काम सुरु. त्या आरशात बघण्यात आणि स्वतःचं अावरण्यात सगळा शीण कुठल्या कुठे निघुन जातो.
सोमवारी जस्तीच्या कामात दिवस कुठल्याकुठे संपला कळलं ही नाही. दिवसभर न आरशात बघायला वेळ झाला न साडी सावरायला.

संध्याकाळी मुलींबरोबर एका बर्थडे पार्टीला जायचं होतं.  त्यातल्या त्यात, एक सकाळीच ठरवून ठेवलेली साडी काढली, पटापट आवरून आमची स्वारी वाढदिवसाला पोचली. लहान मुली बरोबर असताना कितीही काळजी घेतली तरी सांडा-सांडी हमखास ठरलेलीच. घास भरवत असताना एकच सर्रकन हात लगला आणि भाजीच्या वाटीतला एक तेलाचा थेंब पदरावर उडालाच ! चांगल्या साडीचा सत्यानाश आणि शिवाय आत्ता सगळ्यांसमोर साडीवर डाग..! जरा कसंतरीच झालं. लोकांना वाटेल किती ही वेंधळी बाई. खरं कारण कुणाकुणाला सांगणार ? मग मनाला समजावलं, एवढ्या लोकात कुणाचं मेलं लक्ष जातंय आपल्याकडे ! पटकन जेवण ऊरकून पळ काढु.

रात्री झोपायच्या आधी पुन्हा एकदा आरशासमोर उभी राहिले तर तोच हसला माझ्याकडे बघून..म्हणाला, " दिवसभर कोण बघतंय असं म्हणून स्वतःकडे दुर्लक्ष केलंस पण माझ्या नजरेतून काही सुटत नाह बरका. तुझं वाढत चाललेलं वय, तु स्वतःला गृहीत धरणं, स्वतःकडे दुर्लक्ष करणं सगळं मी बरोबर टिपलंए. कुठे गेली तुझ्यातली टिप टाॅप रहणारी, स्वतःची छाप पाडणारी, सगळं जग जिंकु पाहणारी मुलगी ? कुठे गेली ती जगण्यातली झिंग ? कुठे गेलं ते स्वतःवरचं प्रेम ?

असू दे गं ! वय वाढण्यातही मजा आहे, दुसऱ्यासाठी करण्यात सुख आहे, समाधान आहे. तसंच वेंधळेपणातही गंमत आहे. आपल्याकडे कुणी बघतंय का, चांगलं म्हणतंय का ? हा विचारच नसतो. बिनधास्त जगणं असतं ते. अगदी मनाप्रमाणे. खरंखुरं !!
दुसऱ्यासाठी किती वर्ष जगणार ? ठराविक वयानंतर सवैराचार हवाच की !
पण सारखी नको हं असली गंमत ! इतर कुणासाठी नसलं तरी माझ्यासाठी स्वतःकडे लक्ष दे. स्वतःसाठी वेळ काढ. स्वतःवर प्रेम कर. स्वतःचा आत्मविश्वास टिकव. आपल्या दोघींशिवाय एकमेकींकडे बघायला कुणाकडे वेळ नसला, तरी आपण घ्यायची काळजी एकमेकींची..आयुष्यभर .. अगदी कुणी बघत नसलं तरी !! "