Monday, 5 February 2018

Double duty

DOUBLE DUTY



"सहाचा ठोका पडला कि या बायका खांद्याला पर्स लावून office च्या बाहेर पडायला मोकळ्या. 5 वाजल्या पासून घड्याळाकडे नजर लावूनच बसलेल्या असतात, कधी वेळ होणार आणि कधी इथून पळ काढणार..!! " office मधे काम करणाऱ्या बायकांबद्दल कायमच अशी टिका कानावर येते.

हो ..! निघतोच आम्ही वेळेवर कारण 6 ला एक duty संपत असली तरी आमची दुसरी duty सुरु होते office आणि घर अशा दोन जवाबदाऱ्या आम्ही यशस्वीरीत्या पार पाडत असतो. तुमच्या सारखं बिनधास्त cigarate फुंकत , रमत गमत , हात हलवत , relax होत घरी येणं आम्हाला मेलं जमतच नाही! office सोडलं रे सोडलं कि घर डोळ्यासमोर ऊभं राहतं.जाता जाता मुलांना ground वरून वेळेत पिक अप करुन, उद्याची भाजी ,किराणा सामान, दुध , दही छप्पन गोष्टींची यादी मनात घोळायालाच लागते.

आम्हाला office मध्ये ,न अचानक थांबावं लागतं, न महत्वाचा कॉल येतो,  न traffic लागतं, आणि एखादवेळी असं झालंच तर पुढची सगळी व्यवस्था लावल्या शिवाय गत्यंतर राहत नाही कारण आमच्या एका छोट्याश्या change मुळे सगळं घर कोलमडायची शक्यता असते.
घरी पोचता क्षणी office मधे काम करणाऱ्या रुबाबदार स्त्रीची क्षणात घर सांभाळणारी कर्तबगार महिला होते. कंप्युटर पेक्षा थोडा लवकर विचार करत ,घरी पोचायच्याआत ,आता गेल्यावर स्वैपाक काय करायचा ह्याचा प्रोग्राम डोक्यात तडक तयार होतो. त्यासाठी लागणारी एखादी गोष्ट घरात नसेल तर ती आत्ता कुठे मिळेल ती दुकानं डोळ्यासमोर नचायला लागतात.

पोचल्यावर स्वैपाक करून मुलांना गरम गरम वाढायचा असतं. दिवस भर कामाच्या लोडनी आमचं डोकं ही कद्धीच दुखत नाही ,न आम्ही कधी दमतो न कंटाळतो!

मैत्रिणींबरोबर गप्पा मारत येणं आम्हाला कधी जमतच नाही. मुलं घरी पोचायच्या आत मी पोचले तर मुलांना बरं वाटेल हे ठाऊक असतं. बायकांना जगता येतच नाही पुरुषांसारखं.. बिनधास्त..! कारण तुम्हाला माहीत असतं मी नसलो तरी बायको सगळं सांभाळेल , पण तशी खात्री तुमच्यापैकी किती जणची देता येईल ?

नोकरी न करणाऱ्या बायकांची अजूनच वेगळी तऱ्हा. घरात राहुनच full time duty. नोकरीच्या निमित्तानी का होईना, स्वैपाक आणि घर हा विषय थोडावेळासाठी तरी बाजूला राहतो, पण ह्या घरी असणाऱ्या बायका मात्र २४ तास राम रगाड्यात पार अडकून जातात. शिवाय ,"तु काय घरीच असतेस ,नंतर आरामात कर" , "तुला काय दिवसभर वेळ असेल", "housewife अाहेस मग काय घरीच.. निवांत" ,हे असले रिकामटेकडे असल्यासारखे टोमणे ऐकणं म्हणजे तोंड दाबून बुक्यांचाच मार ! त्यापेक्षा आहे ती नोकरी उत्तम..!


ह्या नोकरीच्या व्यापात इतकं अडकायला होतं कि मैत्रिणींबरोबर sunday ला lunch ला जावं ,एखादा movie बघावा किंवा जुन्या शाळेतल्या मैत्रिणींना आवर्जून भेटावं असं वाटतंच नाही कारण एक दिवस मिळतो तो तरी मुलांबरोबर घालवावा असं वटायला लागतं..तुम्ही कसे ठरवून भेटून मोकळे ही होता ! मनात आलं की चप्पल सरकवून कट्ट्यावर जावून येता..
खरं म्हणजे तुम्ही गेलात की आम्हालाही मोकळं मोकळं वाटायला हवं ,पण तसं होत नाही कारण तुम्हाला वाटलं की तुम्ही जाता आमच्या सोयीप्रमाणे नाही !
एखाद्या कामामुळे रात्री यायला उशीर झाला तर मुलं झोपायच्या आत घरी यायचा आमचा कोण खटाटोप ! मुलं न भेटता झोपून गेली असं व्हायला नको. तसं झालं तर उगाचच न भेटल्याची खंत लागून राहते रात्रभर. होत असेल का बाबांना असं कधीतरी?

कामामुळे जागरण झालं ,एखाद दिवशी कंटाळा आला म्हणून उशीरा उठणं वगेरे आमच्या नशिबी कुठे कारण दमायचा कोटा फक्त बाबांचा !
गावाला जायची वेळ आली तर मग तर विचारायलाच नको! मुलांची सगळी सोय करून त्यांना 10-10 वेळा सगळं समजावुन, ' लवकर जाऊन येते हं 'आणि येताना गम्मत आणायचं promise देऊन मगच बाहेर जायचा विचार होतो. पुरुषांसारखा आज ठरलं आणि उद्या निघाले इतकं सोपं नसतं बायकांना घर सोडणं.

बायका ज्या हुशारीनी घर सांभाळताएत त्याच हुशारीनी प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खाद्याला खांदा देऊन यशस्वीरित्या काम ही करताएत...आईचं कोमल हृदयही ही आमच्याकडे आहे आणि बापाची कडक शिश्तही... आदि शक्तिची माया ही आम्ही जपतो आणि महिषासुर मर्दिनीची कठोरताही...म्हणूनच निघतो आम्ही सहाच्या ठोक्याला कारण आम्हला असते double duty आणि आम्हीच करू जाणो ती..यशस्वीरित्या !!