Wednesday, 14 November 2018

Voice blog 5 आवाजाचे प्रकार ... भाग तीन .. भोंगळ आवाज



गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांमधे आवाजाशी निगडित अनेक गैरसमज दिसून येतात. त्यातला एक समज असा की गाणं परिणामकारक होण्यासाठी आवाज भारदस्त असावा, किंवा,  हलका आणि सहज काढलेला आवाज शास्त्रीय संगीतासाठी योग्य नसतो.
आवाजाला वजन असणं, आवाज भारदस्त असणं, आवाजाला जाडी असणं आणि आवाज परिणामकारक असणं या चार भिन्न गोष्टी आहेत परंतु गायक आणि वादाकांमधे याबाबत फारशी बौधिक स्पष्टता दिसत नाही. विचारांच्या ह्या गोंधळामुळे आवाज मुद्दाम मोठा काढणं, भारदस्त वाटावा म्हणून खर्जात गाणं किंवा तार सप्तकात जोर लावून ओरडणं, आवाजाला कडक करणं, पट्टी खाली वर ठेवण इत्यादि भ्रामक आणि चुकीच्या गोष्टी, गैरसमजूत किंवा अज्ञानातून केल्या जातात.

वर नमूद केलेले चार प्रकार आपण आधी समजून घेऊ.
१. वादकांमधे हाताला वजन असणं किंवा गाणऱ्यांमधे आवाजाला वजन असणं, ह्याचा अर्थ जाडी किंवा बोझा, किंवा अधिक ऊर्जा वापरणं असा नसतो. कलेच्या क्षेत्रात हे वजन म्हणजे कमी ऊर्जा (energy) वापरुन जास्तीत जास्त कलात्मक परिणामकारकता साधणं अशा अर्थानी आहे. अधिकाधिक रियाजाने असा कलात्मक परिणाम साधता येतो.
२. आवाजाची जाडी त्याच्या volume शी निगडीत आहे. जाडी असलेला आवाज परिणामकारक असेल असं नाही.
३. आवाजात भारदस्तपणा अनेक गोष्टींमुळे येऊ शकतो. त्यातलं एक कारण volume आहे. घुमाऱ्यामुळे आवाज भारदस्त येऊ शकतो. चुकिच्या भोंगळ उच्चारणामुळे आवाज भारदस्त वाटु शकतो. या सर्व गोष्टींच्या संयोजनामधूनही (combination) आवाज भारदस्त वाटु शकतो.
४. ऊर्जा (energy) कमी वापरून अधिक काटेकोर सुरेल आवाजाला, अधिक आसयुक्त आवाजाला, अधिक घुमारा निर्माण होऊन या सर्वातून जास्तीत जास्त कलात्मक परिणाम साधणाऱ्या आवाजाला परिणामकारक आवाज म्हणता येईल. असा गुणवान आवाज वजनदार आणि प्रभावी असतो. अशा आवाजाच्या सांगीतिक परिणामामधे आवाजाची मधुरता, ऐकणाऱ्याचे लक्ष वेधून घेण्याची आकर्षकता, नादसम्मोहन करण्याची क्षमता असते. असा वजनदार आवाज सशक्त असतो परिणामकारक असतो आणि संगीतोपयोग असतो. स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी ह्यांच्या आवाजात हा वजनदारपणा ओतप्रोत भरलेला दिसतो. हे नीट समजले नाही तर उगाच बोजड अवाज काढून, अति शक्ति लावून किंवा शीरा ताणून, चेहरे वेडे वाकडे करुन अति कष्ट करुन गाणं, हे दिसून येत.

आता आपण भोंगळ आवाजाची निर्मिती कशामुळे होते ह्याचा विचार करु.

भोंगळ आवाज मुळात अपरिणामकारक असतो. परिणाम शून्यता ही अनेक गोष्टींमुळे येते. हा आवाज सुराला चिकटत नाही कारण ह्याला अपेक्षित उंची नसते. नादाच्या अपेक्षित विशिष्ट उंचीच्या आसपास हा आवाज असतो त्यामुळे सुरेलपणाचा परिणाम अशा आवाजात निर्माण होत नाही. तो आसपास असल्यामुळे तो बेसुर आहे असे ही जाणवत नाही आणि त्याचवेळी ह्या आवाजाला पोकळपणा असतो. भरीव जाडी नसते.
खऱ्या मोठया आवाजाच्या ऐवेजी हा पोकळ वासा बड्या घराचा आभास निर्माण करायचा प्रयत्न करतो.
भोंगळ आवाजाची जी गुणवत्ता असते ती घुमाऱ्यामुळे निर्माण न होता म्हणजेच प्रत्यक्ष सहनादांच्या निर्मितीतून न होता, चुकीच्या आणि अस्पष्ट वर्णोच्चरणामुळे ( अ आ ई )होते.
आवाज भारदस्त वाटण्यासाठी अनेक गायक मंडळी विशेष करुन पुरुष गायक, असा आवाज काढायचा प्रयत्न करतात. असे करुन भारदस्तपणा येत नसून पोकळ आणि फुसका आवाज येतो. असे आवाज परिणाम साधत नाहीत. असा आवाज गोड असेलच असे नाही.

खऱ्या जाडीसाठी आवाजाला मोठा amplitude असतो. अशा ध्वनीची आंदोलन किंवा लाटा ( sound waves ) ह्या खूप जास्त उंचीच्या आणि खोलीच्या असतात. भोंगळ आवाजात तसे नसते.

असे भोगळ अावाज बहुत करुन गुरुच्या किंवा कुणाच्या तरी आवाजाचे अनुकरण करून काढले जातात. गुरुच्या भारदस्त आवाजाची नक्कल केली जाते पण तो आवाज कशामुळे भारदस्त येतो ह्याचा अभ्यास नसतो. उच्चरणात स्पष्टता आली की आवाजातला भोंगळपणा निघुन जायला मदत होते. म्हणून गायकाने स्पष्ट उच्चारणा कडे लक्ष द्यावे. Volume पेक्षा स्वच्छ उच्चार केले तर आवाजातला भोंगळपणा निघुन जाईल.

आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in



Monday, 22 October 2018

Voice blog 4 आवाजाचे प्रकार ... भाग दोन .. चपटा आवाज




गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

आवाजाच्या वेगवेगळ्या परिमीतींचा आपण मागच्या भागात विचार केला. 
Frequency, amplitude आणि resonance या तीन गोष्टींच्या फरकांनी आवाज वेगवेगळे ऐकु येतात. प्रत्येक आवाजात शरीर धर्माप्रमाणे ह्या तीन्ही गोष्टी वेग-वेगळया क्षमतेच्या असतात. ह्या फरकामुळे प्रत्येकाचा आवाज वेगळा ऐकु येतो.
कोणताही अावाज हा ऐकणाऱ्यावरही अवलंबून असतो. प्रत्येकाला तो वेगळा ऐकु येतो. प्रत्येकाच्या मनातले आराखडे, आवडी निवडी, अनुभव ह्यावर तो अवलंबून असतो. उदाहरणार्थ पोवाडा ऐकणाऱ्याला सांगीतिक आरडा ओरडा, जोरकसपणा, खुलेपणा, मोकळा आवाज जास्त भावतो. सुर थोडा कमी जास्त झाला तरी त्याला ते खूप खटकत नाही

उंची (frequency) ,जाडी ( amplitude) आणि गुण विशेष (timbre) ह्या तिन्ही गोष्टींच्या फरकामुळे निर्माण होणारे वेग-वेगळे भरकटलेले आवाज आता आपण बघु.
यातला आवाजाचा पहिला प्रकार: चपटा आवाज.

हा आवाज ऐकु येताना आवाज बंद असल्याचा भास होतो. हा बद्दपणा किंवा मोकळेपणाचा अभाव, हा अनेक गोष्टींमुळे निर्माण होऊ शकतो. चुकीच्या वांग्मयीन शब्दोच्चारणामुळे हा येऊ शकतो. हा अवाज असलेली लोकं उच्चार करताना भोंगळ उच्चार करतात.
अ, आ, ई सारखे स्वर घशात निर्माण होत असले तरी घशापासून आवाज बाहेर येईपर्यंत, तिथे किंवा पुढील मार्गात कुठेतरी अकुंचन ( constriction ) होते, बंदपणा किंवा दाब निर्माण होतो. ह्याला अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. जीभ अति मागे केल्यामुळे किंवा, जिभेच्या चुकीची हालचालीमुळे, जबड्याच्या अकुंचनामुळे, गालाच्या किंवा चेहऱ्याच्या स्नायुंमधल्या अकुंचनामुळे वगेरे हे होते.

स्वर वर्ण घशात योग्य प्रकारे निर्माण होऊन सुद्धा तोंड किंवा जबडा पुरेसा न उघडल्यानेही आवाज चपटा ऐकु येतो. असे गायल्यामुळे चेहऱ्याच्या स्नायुंवर ताण येतो आणि आवाज कृतीम वाटतो. ह्या आवाजामधे volume कमी होत नाही तर resonance बदलतो, तो दाबला जातो. एखाद्या पाण्याच्या नळीचं तोंड दाबल्यास त्याचा जोर कमी होत नाही तर चिळकांडी उडते, तसा प्रकार ह्या चपट्या आवाजाच्या बाबतीत होतो. हे अवाज धारदार वाटु शकतात पण ते मोकळे किंवा खुले नसतात.

आवाजातील हा दोष काढण्यासाठी दोष नक्की कुठे आहे ह्याचा अभ्यास करायला हवा. आपण स्वर वर्ण कुठे उच्चारले, कुठे अकुंचन झाले, जबडा किती उघडला, जीभ कुठे ठेवली की आवाज योग्य वाटतो हे ऐकुन ठरवायला हवे. उच्चरणात सुधारणा करायला हवी. स्वर वर्ण उच्चारण घशात होत आहे ह्याची खात्री करुन, तोंड पुरेसं उघडल्यास, आणि कुठे अकुंचन होत नाही ह्याची खात्री केल्यास सुधारणा जाणवेल. तसेच जबड्याचे joints ताणून उघडझाप केल्यास आवाजात मोकळेपणा येईल. चेहऱ्यावर ताण निर्माण न झाल्याने आवाज नैसर्गिक यायला मदत होईल. ‘सुध मुद्रा सुध बानी’ ही उक्ति लक्षात ठेवून गायल्यास उपयोग होईल. आवाज दाबून काढल्याऐवेजी मोकळा सोडल्यास खुला ऐकु येईल. तो हलका काढल्यास नैसर्गिक ऐकु येईल. हा हलकेपणा त्याच्या सहजतेशी निगडीत आहे volumeशी नाही हे लक्षात असावे.

चपटे आवाज, गायकास अज्ञानामुळे जोरकस वाटतात. ते खरे बंद असतात आणि त्यात सांगीतिक माधुर्य नसते हे गाणाऱ्यानी समजून घेतले पाहिजे.

आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in

Sunday, 30 September 2018

Voice Blog 3 आवाजाचे प्रकार ... भाग एक




गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

बहुतेक सर्व स्त्री पुरुषांना निसर्गत: चांगले आवाज परमेश्वरानी जन्मजात दिलेले असतात. उत्तम गायकांचे स्वरयंत्र ही सर्वसामान्य मनुष्याप्रमाणेच असते. सर्वांमधे आवाज निर्मीती ही सारखी असली तरी प्रत्याकाचा आवाज वेगळा असतो व वेगळा ऐकु येतो. गोड आवाज, भसाडा आवाज, कर्कश आवाज, किरटा आवाज, husky आवाज, नाकातला आवाज, चपटा आवाज वगेरे प्रकार आपण सहज ओळखतो. हे सर्व अवाज वेगवेगळे ऐकु येतात. आवाजाच्या तीन परिमिती ( dimensions) असतात. उंची (frequency) , जाडी( amplitude) आणि गुण विशेष (timbre) जो resonance मुळे ठरतो. या तीन गोष्टींच्या फरकामुळे आपल्याला आवाज वेगवेगळे ऐकु येतात.

आवाजाची उंची ही दर सेकंदाला होणाऱ्या कंपन संख्येवर अवलंबून असते. प्रत्येक आवाजाला कंपनंसंख्या असतात. जितकी कंपनं जास्त तितकी आवाजाची उंची जास्त आणि जितकी कंपनं कमी तितकी आवाजाची उंची कमी. उदा: सा या स्वराची एका सेकंदाची कंपनं २४० मानली, तर पंचमाची कंपनं संख्या ३६० येईल व तार षड्जाची कंपनसंख्या ४८० येईल. उंच स्वर हा लांबवर ऐकु जातो तर खालचा स्वर फार लांबवर ऐकु जात नाही. ह्याचाच अर्थ स्वराच्या उंचीवर त्याची श्रवण शक्ति अवलंबुन आहे.

Amplitude म्हणजे आवाजाचा volume म्हणजेच आवाजाची घनता किंवा जाडी. कंपनसंख्या न बदलता आवाज वेगळा ऐकु येतो तो आवाजाच्या वेगळ्या घनतेमुळेही. सा हा स्वर जोरात किंवा हळु म्हणला तर त्याची कंपनसंख्या बदलत नाही तर त्याच्या घनतेमुळे तो हळु किंवा जोरात, ऐकु येतो. मोठया घनतेचा आवाज दूर पर्यंत ऐकु जातो तर लहान घनतेचा आवाज फार लांब पर्यंत जाऊ शकत नाही.

आवाजातला तीसरा गुणधर्म म्हणजे आवाजाचा resonance म्हणजेच घुमारा. मुळ आवाज, स्वरतंतुंच्या स्पंदनांमुळे घशात  उत्पन्न होतो आणि तोंडावाटे बाहेर पडतो. 
तानपुऱ्याच्या तारांप्रमाणे, स्वर पट्टयांवरील विविध पातळ स्नायुंमुळे, मुळ स्वराबारोबर अनेक स्वरांश निर्माण होतात. आवाज उत्पन्न झाल्यावर शरीरातील विविध adjustable आणि non adjustible पोकळ्यांमुळे तो समृद्ध होऊन ऐकु येतो. घुमारा उत्पन्न करणाऱ्या अनेक पोकळ्या आपल्या शरीरात आहेत. तोंडाची पोकळी, जीभेच्या मागची घशाची पोकळी, टाळूची पोकळी, नाकातली पोकळी, डोळ्यांच्या भोवती sinus ची पोकळी आणि स्वर यंत्राच्या खाली श्वास नलिकांमधली पोकळी. ह्या विविध पोकळ्याचा वेगवेगळ्या वापरांमुळे आवाजाचा घुमारा बदलतो. ह्या घुमाऱ्यामुळे आवाज अधिक कर्णमधुर वाटतात.

प्रत्येक आवाजातून स्वयंभू स्वरांश निघत असतात. ह्यालाच upper partials, harmonics किंवा overtones असे म्हणतात. हे स्वरांश प्रत्येक आवाजातून समान निघत नाहीत. कुणाच्या आवाजात ते अधिक खुलून वर येतात तर कुणाच्या आवाजात ते दबले जातात. ह्यामुळे प्रत्येक व्यक्तिचा आवाज एकमेकांपासून वेगळा येतो. ह्या गुणविशेषाला timbre असे म्हणतात. ह्या सर्व पोकळ्यांचा छान वापर झाला की आवाज गोड आणि अधिक घुमारदार येतो.

ह्या तीन गोष्टींच्या फरकामुळे आवाज वेगवेगळे ऐकु येतात. आवाजाच्या विविध प्रकारांवर पुढच्या भागात सविस्तर विचार केला जाईल.

वरील सर्व आवाज निर्माण होताना आवाज निर्मितिचे इतर सर्व स्नायु योग्य कार्य करत आहेत हे गृहीत आहे, कारण कुठला ही स्नायु अकार्यक्षम असल्यास आवाज निर्मितीमधे बदल अपेक्षित आहे.


आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in

Saturday, 1 September 2018

Voice blog 2 चांगला आवाज.. काळाची गरज !







गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

आवाज, हा कंठ संगीताच्या साधकांचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. गानप्रकार कुठला ही असो चांगला आवाज कधीही कानाला सुखदच वाटतो.

पूर्वी असा समज होता कि सुगम संगीत गाणाऱ्यांचे आवाज गोड आणि चांगले असायला हवे पण शास्त्रीय संगीताला चांगला आवाज नसला तरी चालतो कारण शास्त्रीय संगीत ऐकणारे लोकं सांगीतिक विचार ऐकतात, राग ऐकतात, मांडणी ऐकतात, रचनात्मक सौंदर्य पाहतात. याच कारणामुळे खास आवाज नसलेली सुद्धा अनेक गायक मंडळी यशस्वी मानली गेली. ते काही प्रमाणात बरोबर ही होते पण काळानुरूप हे बदलंल आहे हे मात्र नक्की. चांगला आवाज नसलेल्या गायकाचा आजच्या जगात टिकाव लागणं अवघड आहे. गेल्या अनेक वर्षात सुगम संगीत, चित्रपट संगीत, नाट्य संगीत गायकांनी नाद मधुरतेचा उपयोग करुन स्वतःच्या गाण्यात योग्य ते बदल केले पण शास्त्रीय गायकांचं त्याकडे पुरेसं लक्ष नाही. रचानात्मक सौंदर्य बघण्यात नाद मधुरतेकडे कायम दुर्लक्ष होत गेलं.

गोड, सहज आणि चांगला आवाज बहुतेक सगळ्याच स्त्री पुरुषांना परमेश्वरानी जन्मजातच दिला आहे. पण तो आवाज तसाच टिकवुन ठेवणं ही मात्र आपली जवाबदारी आहे.

गाणाऱ्यांना माझं हे विधान जरा धाडसी वाटु शकेल पण असा अभ्यास आहे कि गाणं हे सर्वस्व असून सुद्धा ९९% गायकांचा, आवाज हा विषय दुर्लक्षित आहे आणि आवाजाबद्दल अनेक चुकीच्या समजुती ते बाळगुन आहेत. आहे तो आवाज जास्तीत जास्त काळ चांगला कसा राहिल याबद्दल कलाकार अनभिज्ञ आहेत. आवाज थोडा खराब असेल तरी थोडा निष्काळजीपणा आहे आणि तो बिघडत असेल तरी खूप प्रमाणात दुर्लक्ष आहे. 

लक्ष्मी नारायण गर्ग यांच्या, ‘आवाज सुरीली कैसे करें’ या पुस्तकात त्यांनी लिहीलं आहे, कि १०० पैकी फक्त १० लोक आपल्या आवाजाबद्दल समाधानी असतात म्हणुनच कि काय जवळ जवळ प्रत्येक गायक मैफिलीच्या आधी आपल्या आवाजाबद्दल सहवादकांजवळ तक्रार करत असतो, गोळ्या-औषधं घेऊन स्वत:ची समजूत काढत असतो आणि आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या सांगितिक कारकिर्दीच्या अयशस्वीतेचं खापर आपल्या आवाजावर फोडत असतो.

आवाज उत्तम असेल तर मैफल अधिक यशस्वी होईल. सर्वसामान्य श्रोत्यांना शास्त्रीय संगीताकडे आणि वैयक्तिक स्वतःकडे अधिक आकृष्ट करता येईल. ह्याचा परिणाम शास्त्रीय संगीताचा अधिकाधिक प्रसार होण्यास मदत होईल हे नक्की.

या सगळ्यासाठी आवाज या विषयाचा अभ्यास गरजेचा आहे. किंबहुना गाण्याच्याबरोबरीने आवाजाचा अभ्यास व्हायला हवा. परदेशात आवाज हा विषय स्वतंत्रपणे शिकवला जातो आणि आपल्याकडे जिथे शास्त्रीय संगीताची इतकी मोठी परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे तिथे आवाज हा विषय दुर्लक्षित आहे.

गायक म्हणून यशस्वी असून ही भविष्यात आवाजाचा त्रास होण्याची शक्यता टाळता येत नाही कारण आवाज या विषयाबद्दल जागरुकता नाही, शिवाय कारकिर्दिच्या कुठल्याही टप्प्यात आवाजाचा त्रास होऊ शकतो हे लक्षात ठेवायला हवे.
ह्याच काराणामुळे आवाजाचा अभ्यास प्रत्येक गायकानी करणे अपरिहार्य आहे आणि तो पुढच्या पिढीत पोचवणं प्रत्येकाची जवाबदारी आहे. प्रत्येक गायकाचा आवाज चांगला व्हावा, चांगला रहावा, तसाच टिकावा यासाठी तो आधी बिघडणण्याची गरज नाही.



आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in

Monday, 13 August 2018

श्रावण



जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल .... हे इंग्रजी महीने मनात आणि डोक्यात इतके पक्के बसलेत, की चैत्र वैशाख ज्येष्ठ....हे महीने कधी सुरु होतात आणि संपतात कळत ही नाहीत आमच्या पिढीला. लहानपणी आईनी मराठी महीने पाठ करुन घेतले तेवढाच काय तो संबंध. असं असताना तो श्रावण कधी येऊन जातो ह्याचा पत्ता तरी कसा लागणार ? आणि ज्या महिन्याचा येण्याचाच पत्ता लागत नाही त्या महिन्याचं कोड कौतुक तरी आम्ही कसे करणार ?

लहानपणी आईकडून श्रावणाचं खूप महत्व ऐकलं होतं. तिला पूजा-अर्चा करताना बघितलं होतं. दान धर्म करताना पाहिलं होतं. श्रावाणात आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा हमखास व्हायची. एखाद्या शुक्रवारी मावशी जेवायला यायची आणि एका शुक्रवारी, आम्ही सगळे आजीकडे जायचो जेवायला. मेनू मात्र ठरलेला..पुरण पोळी.. धमाल असायची. श्रावाणातल्या अशा अनेक आठवणी मनात घर करुन आहेत.

आता श्रावण म्हणला की स्वैपाकाच्या बाईंच्या हातची पुरण पोळी होते, सगळ्यांच्या वेळा जमल्याच तर सत्यनारायण पूजाही होते, पण पूर्वीचा धार्मिक भाव मात्र निश्चित कमी झाला. अजून १०- १५ वर्ष हे असंच चालेल ही बहुधा पण त्यानंतर कोण पाळणार श्रावण, कोण जपणार परंपरा ..? 

जुन्या रुढी, पूर्वी पासून चालत आलेल्या परंपरा, बुरसटलेल्या आहेत आणि सध्याच्या काळात त्या जपणं निव्वळ अशक्य आहे, असं मानणारी आमची पीढी या पुढे श्रावणातले सण, चाली रीती सांभाळेल ही अपेक्षा जरा जास्त होते..नाही का?

जुन्या परंपरा जपत त्याचा कोडकौतुक करायला आम्हाला वेळ ही नाही आणि इच्छाही. ह्या पद्धति आम्हाला बांधून किंवा अडकवून ठेऊ शकत नाहीत. घर सांभाळून व्यवसाय-नोकरी संभाळणाऱ्या आम्ही मुली ह्या चाली रीतींसाठी वेळ ही देऊ शकत नाही.
न सुट्टी घेऊन नागोबाची पूजा करायला किंवा दूध द्यायला आम्हाला वेळ आहे, न झोके खेळत बसायची आम्हाला इच्छा आहे, न मेंदी काढत जागत बसण्याची आम्हाला क्रेज ! 
वर्षानुवर्षे आपल्या आया सासवा करताएत म्हणून ह्यात अडकण, प्रैक्टिकली शक्य नाही आम्हा मुलींना....

अगदी काल परवा पर्यंत ह्याच मताशी मी ही सहमत होते. पण सहज विचार केला आणि लक्षात आलं की ह्या सगळ्या पद्धति बायकांना बांधून ठेवण्यासाठी नसून त्यांना मोकळं करण्यासाठीच असाव्यात. रोजचं कंटाळवाणं, धकाधकीचा रूटीन, बाजूला सारून मोकळा श्वास घेण्याची संधी देणाऱ्याच असाव्यात..! त्या दृष्टिनी आपण कधी बघतच नाही ..एवढंच!!

पूर्वी फक्त चूल आणि मुल करत घरात बसणारी बाई श्रावणात घराबाहेर पडत असेल, निसंकोचपणे. जंगलातून रानातून फिरुन, विहार करत असेल, मोकळेपणाने. मैत्रिणींमधे मिसळून झोके खेळत असेल, स्वैरपणे. सासरचा सगळा व्याप विसरून, सगळी बंधनं झुगारून, सगळा जाच सोडून माहेरपणासाठी जात असेल, स्वच्छंदपणे..
रात्री सगळ्या मैत्रिणी जागून मेंदी काढत असतील, गप्पांची मैफल रंगत असेल रात्रभर, चेष्टा मस्करीने पहाट उजाडत असेल. नागाची पूजा करायची म्हणून सगळ्या जणी ठेवणीतल्या साड्या काढत असतील. लग्नातले दागिने परत एकदा घालून मिरवत असतील. नटुन थटून ,सगळ्याजणी मिळून, नागराजाचं दर्शन होतए का, हे बघायला शेतात माळ रानात मनसोक्त फिरत असतील. जंगलातल्या रानमेव्याचा आनंद लुटत असतील. घरी जाऊन आईच्या हातच्या स्वैपाकाचा मनमुराद आनंद घेऊन मनसोक्त झोपत असतील.

आज सगळं बदललं असलं तरी, सततच्या ताणावाखाली जगणाऱ्या बायकांची, मोकळं होण्याची गरज अजुनही तशीच आहे. केवळ ह्या सगळ्या परंपरा जुन्या, बुरसटलेल्या म्हणून त्याच्याकडे बघु नका.
मोकळं होण्याची संधी समजून ह्या सगळ्या गोष्टी गंमत म्हणून एकदा करून बघा.


खरच घरासमोर एखादा झोका बांधून मैत्रिणींबरोबर खेळून बघा, बाजारातून अावर्जुन सगळा रानमेवा आणून, जाणीवपूर्वक त्याची गोडी चाखून बघा, ऑफिसला चक्क सुट्टी टाकून रात्रभर गप्पा मारत बसा, एकमेकांच्या सुख दुःखाची चौकशी करत प्रेमाचा आधार देऊन बघा, पार्लरमधे न जाता स्वतः एकमेकींना मेंदी काढत बसा, खरंच एखादा साप दिसतोय का हे बघायला, मैत्रिणी मिळून लांब डोंगरावर पिकनिक ला जा, सगळ्या बहिणी ठरवून, भावाकडे दिवसभर माहेरपणाला जा आणि मग तुम्हाला जाणवेल ह्या सगळ्या सणांमागचा खरा उद्देश, त्यातून मिळणारा आनंद, समाधान इतक्या वर्षांनंतर अजूनही तसंच टिकून आहे ..!

Saturday, 28 July 2018

Voice blog 1 आवाज .. गाणाऱ्यांचं माध्यम



गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

शास्त्रीय संगीताला अनेक वर्षांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. गायकी, तंत्र, विद्या, शास्त्र, कला, घराणी या अनेक स्तरांवर तज्ञांनी सखोल अभ्यास केलेला आहे, पण काही अपवाद वगळता गाणाऱ्यांचं माध्यम, आवाज ह्या विषयाकडे मात्र दुर्लक्ष झालेलं दिसतं.

कुठलं ही वाद्य शिकणाऱ्याला त्या वाद्याची सखोल माहिती असावी लागते. त्याच्या tone चं, sound चं, बिघाडाचं, दुरुस्तीचं ज्ञान असावं लागतं तसंच गाणाऱ्यांना ही अापल्या माध्यमाचा अभ्यास असणं अत्यंत महत्वाचं आहे. खूप वर्ष ज्ञान घेऊन, रियाज करुन, मेहनत घेऊन आवाजानी साथ दिली नाही तर सगळं वाया गेल्यासारखंच आहे ह्याची जागरुकता गाणाऱ्यांमधे येणं गरजेचं आहे.

बहुतेक गायकांना या विषयावर कुणी शिकवलेले नाहीत. स्वानुभवावर त्यांनी स्वतःचे आवाज सांभाळले पण त्यांच्या अनुभवावर आपल्या आवाजाचा दर्जा टिकु शकत नाही हे प्रत्येक गायकानी लक्षात घ्यायला हवं कारण प्रत्येकाच्या आवाजाचा गुणधर्म, प्रत्येकाच्या प्रेरणा आणि प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी आहे. एवढेच नव्हे तर बिघडलेले आवाज सुधारण्याची प्रक्रियाही प्रत्येकाची वेगळी असते.

परदेशात या विषयावर खूप अभ्यास केलेला दिसतो पण आपल्याकडे आजही नवीन गाणं शिकणाऱ्याला पहिल्या दिवसापासून राग संगीत शिकवले जाते. शिकवण्याचा भर केवळ स्वर रचना, चिजा, ख्याल, रागातील मांडणी यावर असतो, आवाजावर नाही.
प्राध्यापक बी॰आर० देवधर, या विषयावर अभ्यास करणारे पहिले भारतीय होते पण त्याचं महत्व आणि त्यांचा अभ्यास दुर्दैवाने गाणाऱ्यांपर्यंत पोचलेला दिसत नाही. या उलट त्या काळात त्यांची थट्टा झाली.

Voice culture या विषयावर पाश्चात्य लोकांनी खूप अभ्यास केला आणि त्याच्या सखोल अभ्यास आपल्या काही मंडळींनी केला पण तो आहे तसा शास्त्रीय संगीताला लागू होऊ शकत नाही कारण आपल्या आणि पाश्चात्य संगीतात खूप फरक आहे. त्यांची भाषा, उच्चार, आवाज लावायची पद्धत, त्यांचा आकार, त्यांचा ठहराव आपल्या संगीतापेक्षा वेगळा आहे हे विसरुन चालणार नाही. 

सोन्याचा अलंकार घडवताना दागिन्याच्या कलाकुसरीवर भर असावा पण तेवढेच लक्ष त्याच्या शुद्धतेकडे असावे. आपलं गाणं सर्व बाजुनी परिपक्व होण्यासाठी आपल्या माध्यमाचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. आपला आवाज अनेक वर्ष आपल्या मनाप्रमाणे वापरता यावा, तो बिघडत असल्यास वेळीच समजावे आणि त्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी आवाजाचा अभ्यास अपरिहार्य आहे. हा अभ्यास आपल्या मार्फत पुढच्या पिढीपर्यंत पोचावा ही आपली जवाबदारी आहे. प्रत्येक गायकाचा संगीताबरोबर माध्यमाचा अभ्यास झाल्यास सांगीतिक वाटचाल अधिक यशस्वी होईल हे गायकांनी लक्षात घ्ययला हवे !


आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in




Thursday, 5 July 2018

Sound Wave Art

SOUND WAVE ART


लहानपणापासून microphone ची ओळख झाली होती पण studio मधे गायची माझी ती पहिलीच वेळ काचेच्या या बाजूला मी आणि पलीकडे रेकोर्डिस्टमी गायला लागले आणि  पलीकडून recordist गाणं ऐकत आणि बघत होताहो बघत होता, soundwave च्या स्वरूपातगाणं संपवून माझा आवाज ऐकायची आणि बघायची मलाही तितकीच उत्सुकता होती.
गाणं record झालंमी माझा आवाज पहिल्यांदाच दृश्य स्वरूपात बघत होतेकाय सुंदर होता तो graph. कुठे लहान कुठेमोठाकुठे बारीककुठे जाडकधीतरी तुटक तरीही प्रवाहीनादाच्या त्या दृश्य स्वरूपाच्या मी प्रेमात होतेह्या स्वरलहरींवर काम करणाऱ्या तमाम रेकोर्डिस्ट लोकांचा मला हेवा वाटत होताकुठे आवाज चिरकलाकुठे फाटला हे सगळं ह्या रेकोर्डिस्ट लोकांच्या नजरेतून सुटत नव्हतं. Ideal soundwave कशी हवी, कुठे बारीक, कुठे जाड ह्याचा त्यांचा बारीक अभ्यास होताआवाजाची आस कशी टिकली किंवा टिकली नाही हे sound wave दाखवत होतीएकुण आहे तसा शुद्धनिर्लेप आवाज माझ्या समोर होता

                                       

गाणं final झालं तरी ती sound wave माझ्या नजरेसमोरुन जाईनाएखाद्या constructor ला आपण केलेला रस्ता सुंदर दिसतो किंवा एका दुकानदाराला फळ्यावर  छान मांडून ठेवलेलं सामान सुंदर दिसतं तसं मला ती sound wave खूप सुंदर दिसत होतीदिसायला आकर्षक असणारी ही गाण्याची soundwave आपल्याकडे असावी असं माझ्या मनानी घेतलंनिदान त्यातला एखादा तुकडा तरी माझ्या नजरे समोर असवा असं वाटायला लागलं

ह्या प्रसंगाला अनेक वर्ष झाली. Sound wave प्रत्यक्षात काही उतरली नाहीपण विषय मात्र डोक्याच्या कोपऱ्यात कुठेतरी होताचमैत्रिणी बरोबर नेहमीच्या creative गप्पा मIरताना परत एकदा तोच विषय निघाला आणि ह्या हट्टाला आम्ही साकारायला लागलोआवाजाचेरागांचेकागदांचे आणि रंगांचे अनेक experiments करत आम्हाला आमची final sound wave मिळाली.
                                   



Soundwave 
नजरे समोर होतीआवडत्या रागांमधे होती तरी अजून काहीतरी राहतय असंच वाटत होतंएक गाणारी म्हणून मला त्या sound wave चं महत्व होतं. इतर गाणाऱ्यांनारेकोर्डिस्टना ती जवळची वाटेल पण सर्वसामान्य लोकांचं काय ज्यांनी हा प्रकार कधी बघितलाच नव्हता ?! त्यांच्यासाठी ह्या दृश्यस्वरूपा बरोबर ती ऐकु येणं ही तितकंच गरजेचं होतंआमचे पुढचे प्रयत्न सुरू झाले आणि परत एकदा खूप experiments नंतर technology च्या सहाय्यानी आवाज ऊमटु लागलाआता ही soundwave परिपूर्ण होतीएक कलाकार किंवा एक रसिक म्हणून ती आपल्या भिंतीवर असण्याचं माझं स्वप्न पूर्णत्वाला गेलं होतं..! 
त्या सुंदर स्वप्नाचं नाव आहे Framing Raagas....by Saee-ly.
ते स्वप्न ज्या मैत्रिणी बरोबर बघितलं ती माझी मैत्रिणएक उत्तम गायिका आणि एक सर्जनशील कलाकार Saee Tembhekar.
आमच्या पसंतीचे पहिले चार राग, जे भिंतीवर सजले ते आहेत Ahir BhairavBrindavani SarangBhimapalasi आणि Bhoopali.