गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
आवाज, हा कंठ संगीताच्या साधकांचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. गानप्रकार कुठला ही असो चांगला आवाज कधीही कानाला सुखदच वाटतो.
पूर्वी असा समज होता कि सुगम संगीत गाणाऱ्यांचे आवाज गोड आणि चांगले असायला हवे पण शास्त्रीय संगीताला चांगला आवाज नसला तरी चालतो कारण शास्त्रीय संगीत ऐकणारे लोकं सांगीतिक विचार ऐकतात, राग ऐकतात, मांडणी ऐकतात, रचनात्मक सौंदर्य पाहतात. याच कारणामुळे खास आवाज नसलेली सुद्धा अनेक गायक मंडळी यशस्वी मानली गेली. ते काही प्रमाणात बरोबर ही होते पण काळानुरूप हे बदलंल आहे हे मात्र नक्की. चांगला आवाज नसलेल्या गायकाचा आजच्या जगात टिकाव लागणं अवघड आहे. गेल्या अनेक वर्षात सुगम संगीत, चित्रपट संगीत, नाट्य संगीत गायकांनी नाद मधुरतेचा उपयोग करुन स्वतःच्या गाण्यात योग्य ते बदल केले पण शास्त्रीय गायकांचं त्याकडे पुरेसं लक्ष नाही. रचानात्मक सौंदर्य बघण्यात नाद मधुरतेकडे कायम दुर्लक्ष होत गेलं.
गोड, सहज आणि चांगला आवाज बहुतेक सगळ्याच स्त्री पुरुषांना परमेश्वरानी जन्मजातच दिला आहे. पण तो आवाज तसाच टिकवुन ठेवणं ही मात्र आपली जवाबदारी आहे.
गाणाऱ्यांना माझं हे विधान जरा धाडसी वाटु शकेल पण असा अभ्यास आहे कि गाणं हे सर्वस्व असून सुद्धा ९९% गायकांचा, आवाज हा विषय दुर्लक्षित आहे आणि आवाजाबद्दल अनेक चुकीच्या समजुती ते बाळगुन आहेत. आहे तो आवाज जास्तीत जास्त काळ चांगला कसा राहिल याबद्दल कलाकार अनभिज्ञ आहेत. आवाज थोडा खराब असेल तरी थोडा निष्काळजीपणा आहे आणि तो बिघडत असेल तरी खूप प्रमाणात दुर्लक्ष आहे.
लक्ष्मी नारायण गर्ग यांच्या, ‘आवाज सुरीली कैसे करें’ या पुस्तकात त्यांनी लिहीलं आहे, कि १०० पैकी फक्त १० लोक आपल्या आवाजाबद्दल समाधानी असतात म्हणुनच कि काय जवळ जवळ प्रत्येक गायक मैफिलीच्या आधी आपल्या आवाजाबद्दल सहवादकांजवळ तक्रार करत असतो, गोळ्या-औषधं घेऊन स्वत:ची समजूत काढत असतो आणि आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या सांगितिक कारकिर्दीच्या अयशस्वीतेचं खापर आपल्या आवाजावर फोडत असतो.
आवाज उत्तम असेल तर मैफल अधिक यशस्वी होईल. सर्वसामान्य श्रोत्यांना शास्त्रीय संगीताकडे आणि वैयक्तिक स्वतःकडे अधिक आकृष्ट करता येईल. ह्याचा परिणाम शास्त्रीय संगीताचा अधिकाधिक प्रसार होण्यास मदत होईल हे नक्की.
या सगळ्यासाठी आवाज या विषयाचा अभ्यास गरजेचा आहे. किंबहुना गाण्याच्याबरोबरीने आवाजाचा अभ्यास व्हायला हवा. परदेशात आवाज हा विषय स्वतंत्रपणे शिकवला जातो आणि आपल्याकडे जिथे शास्त्रीय संगीताची इतकी मोठी परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे तिथे आवाज हा विषय दुर्लक्षित आहे.
गायक म्हणून यशस्वी असून ही भविष्यात आवाजाचा त्रास होण्याची शक्यता टाळता येत नाही कारण आवाज या विषयाबद्दल जागरुकता नाही, शिवाय कारकिर्दिच्या कुठल्याही टप्प्यात आवाजाचा त्रास होऊ शकतो हे लक्षात ठेवायला हवे.
ह्याच काराणामुळे आवाजाचा अभ्यास प्रत्येक गायकानी करणे अपरिहार्य आहे आणि तो पुढच्या पिढीत पोचवणं प्रत्येकाची जवाबदारी आहे. प्रत्येक गायकाचा आवाज चांगला व्हावा, चांगला रहावा, तसाच टिकावा यासाठी तो आधी बिघडणण्याची गरज नाही.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in
No comments:
Post a Comment