गाणाऱ्यांसाठी त्यांचा आवाज अत्यंत प्रिय आणि सगळ्यात महत्वाचा असूनसुद्धा त्याबाबत जागरूकता दिसत नाही. आवाज ह्या विषयाचा अभ्यास करुन त्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
मनासारखं न गाता येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातलं एक कारण म्हणजे Mental blocks. मनासारखं गाता येत असलं तरी मनात एखाद्या गोष्टीची भिती बसते आणि कायमच गाताना, डोक्यावर भूत असल्यासारखी ती भिती समोर येऊन ठाकते.
गायकांच्या मनात अशी भिती अनेक प्रकारे असू शकते.
सूर लागायची भिती
गायला सुरवात करताना पहिल्या पाच मिनीटांची भिती
खर्जाची किंवा तार सप्तकाची भिती
विशिष्ट स्वराची भिती
मांडणीची भिती
विशिष्ट रागाची भिती
ऐकणाऱ्यांची भिती
Image ची भिती
सहगायकांची भिती वगेरे..
अशा प्रत्येक भितीची सुरवात कुठल्यातरी प्रतिकूल अनुभवातून होते व अज्ञानामुळे ही चूक वारंवार घोटली जाते. एखाद्या मैफिलित कधीतरी एखादी गोष्ट जमत नाही. पुढच्यावेळी तीच गोष्ट परत करताना मनात एक भिती निर्माण होते. स्वतःकडे पूर्णपणे त्रयस्थपणे पहायला जोपर्यंत तो गायक शिकत नाही तोपर्यंत ह्या प्रतिकूल प्रतिक्रियेचं त्याच्या मनात एक प्रकारे दडपण तयार होऊन ह्याच दडपणाचं न्युनगंडामधे रूपांतर होतं. अशा न्यूनगंडामुळे उर्मीचा नाश होतो व हा न्यूनगंड त्याच्या गाण्याचा एक घटक होऊन बसतो. स्वतःला एखाद्या गोष्टीची वाटणारी अशी भिती नको वाटते आणि तरी टाळता येत नाही, आणि ह्या केविलवाण्या अवस्थेवर उपायही सापडत नाही.
घराण्याच्या तत्वांचं चुकीचं केलेलं अनुकलन, श्रोत्यांच्या चुकीच्या समजुती, गुरुचे अनुकरण, वस्तुसापेक्ष दृष्टिकोनाचा अभाव आणि अशा अनेक कारणांमुळे गवयाच्या मनात न्युनगंड तयार होऊ शकतो आणि तो तयार झाला की त्या प्रत्येक वेळेला त्याला अडखळायला होतं.
प्रत्येक गायकाचा अनुभव लक्षात घेऊन, त्याची कारणमिमांसा केल्यावर, त्यावर उपाय शोधता येतो. उदाहरणार्थ
- खर्जाची भिती असेल तर मध्यम ग्रामात खर्जाचा रियाज करुन ती भिती घालवता येते.
- एखाद्या विशिष्ट स्वराची भिती असेल तर पट्टी बदलुन गायल्यास त्या स्वराचं स्थान बदलतं. पूर्वीचा असलेला षडजं, धैवत किंवा निषाद म्हणुन सहज गाता येतो आणि त्या स्वरामागची मानसिक अवस्था कालांतराने बदलता येते.
थोडक्यात एखाद्या गोष्टीची भिती असल्यास त्याची वस्तुनिष्टतेने शास्त्रीय चौकशी करुन, किंवा मुळ गोष्टीला वेगळं स्वरूप देऊन सुधारणा करता येते.
असे होऊ नये म्हणुन स्वतःचे गाणे त्रयस्थपणे ऐकण्याची सवय करायला हवी व तसे न जमल्यास आवाज तज्ञाचे मत विचारात घेऊन आवाजात सुधारणा करायला हवी.
मनावर झालेले आघात सहज पुसता येत नाहीत व त्यांची जाणीव, तर्कशुद्ध रीतीने सुधारता येत नाही आणि म्हणुनच जाणीव असूनही अनेक गोष्टींमुळे आवाजतले दोष निघत नाहीत. असे न्युनगंड अनेक प्रकारानी तयार होतात. त्यातील काही अनाकलनिय असतात व काही समजून ही सुधारता येत नाहीत. पण हे काल्पनिक नसून अनुभवावर आधारित असतात आणि हे गायकाला वस्तुस्थितिपासून दूर नेतात हे मात्र नक्की. असे न्युनगंड तयार होतानाच सुधारणा केल्यास कमीत कमी वेळेत हे मानसिक अडथळे दूर होण्यास मदत होईल.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in