प्रिय calendar,
परवा तुमची पानं चाळता-चाळता सहज मागच्या पानांवर नजर गेली आणि सगळ्या तारखा डोळ्यांसमोर फिरू लागल्या. काही तारखा सुखद होत्या, काहींनी खोल आठवणी जागृत केल्या आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. काही तारखानकोश्या होत्या, काही होत्या प्रेमाच्या, काही पोटभर हसवणाऱ्या तर काही परक्या वाटणाऱ्या. काहींमधे मनं दुरावली तरकाहींनी आपलंस केलं.
काही तारखांवर मन रेंगाळत राहिलं, आणि काही तारखा हव्याहव्याश्या वाटल्या.
कितीतरी वेगवेगळ्या भावना दडल्या होत्या तुमच्या तारखांमधे.
बघता बघता अजून एक वर्ष संपेल, अनुभवाची शिदोरी अजून बळकट करत मला शहाणपण शिकवेल.
आता तुमच्या पानांवरचे थोडेच दिवस राहिले आणि किती तरी ठरवलेल्या गोष्टी राहून गेल्या. दर वर्षी
काही तरी निसटतच हातातुन.
आयुष्याची एक-एक वर्ष पालटून जातात आणि वर्षाच्या शेवटी मागे वळून बघताना
मनात एक वेगळीच हुरहूर राहते. मनात एक कुतूहल निर्माण होतं, आता येणारं वर्ष तरी ठरवल्यासारखं जाईल ?
कधीतरी वाटतं, सगळ्यांनाच वाटत असेल का अशी हुरहुर ? का आपणच खंत करत बसतो ?
पण एक मात्र खरं तुमच्या पहिल्या तारखेची 'मी’ आणि शेवटच्या तारखेची 'मी’ ह्यात नक्कीच फरक असतो.
त्या दोन्ही तारखा बघुन माझ्या प्रगतिचा आलेख मला स्पष्ट दिसतो आणि बरं वाटतं, 'चला हे वर्ष खूप काही देऊन गेलं’ !
आता लवकरच तुमच्या नवीन वर्षाचं नवीन रूप येईल, आयुष्याच्या वेगळ्या तारखा घेऊन. नवीन उत्साह, नवीन उमेद, आणि नवीन आशा घेऊन. या वर्षी राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करायला नवीन तारखा मिळतील आणि खुणावत राहतीलमाझं ध्येय. तुमच्या तारखा संपताना राहिलेल्या गोष्टी आयुष्याच्या तारखा संपायच्याआत जमायला हव्या... बास !!
तुझी मैत्रिण..