प्रिय landline फोन,
कसा रे बघता बघता नाहीसा झालास आमच्यामधून ? सगळ्या घरातल्या लोकांचा जीव की प्राण होतास तू. तू वाजलास की सगळे कसे धावत यायचे. तु वाजयच्या वेळा पण ठरलेल्या आसायच्या. सकाळच्या गडबडीत वाजलास की हमखास बाबांचा कामाचे फोन, दुपारी दादाचे कॉलेजचे, जेवणं झाल्यावर निवांत वेळी आईच्या मैत्रिणी किंवा बाहिणीं. माझ्यासाठी मात्र तू कधीही वाजायचास.
तुझ्या माध्यमातुन झालेली संभाषणं आपली वाटायची. गप्पा कुणाच्याही असोत, ऐकत बसण्यात भारी मज्जा यायची. आमच्या आजीचा तर हा एक आवडीचा छंद होता. दुसऱ्यांच्या गप्पा ऐकायच्या आणि मग त्यावर स्वतः तासभर गप्पा मारायच्या. तिला ऐकु जाऊ नये म्हणुन दादा तुला तास न् तास कोपऱ्यात घेऊन बसायचा आणि आजीला काही ऐकु न येता बोलणं झालं की जग जिंकल्याचा आनंद व्हायचा त्याला.
तुझ्यामुळे अमेरिकेतली आत्या, परगावची मावशी, गावातली काकू आणि गल्लीतली मैत्रिण सगळ्याच कशा जवळ असल्यासारख्या वाटायच्या. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला तरी तशी जवळीक काही वाटत नाही.
कधी तरी तू बंद पडलास की इतकं चुकल्या सारखं वाटायचं माहितीए ? तुला दुरुस्त करुन देणारा माणुस येईपर्यंत सगळं कसं सामसुम असायचं. सारखं तुला कानाला लावून तू बरा झालास का हे बघत बसायचो आम्ही. तु ही मान पाडुन निपचित पडल्यासारखा भासायचास.
तुला आठवतय ? तुला छान वाटावं म्हणुन repairing करणारा माणुस तुझ्यावर एक पट्टी चिकटवायचा. ती पट्टी असली की कसला छान वास यायचा तुला उचलल्यावर.
त्या काळात काही श्रिमंत लोकांकडे cordless फोन असायचे. तुला घेऊन घरात कुठ्ठेही फिरता यायचं. मला त्या लोकांचा कसला हेवा वाटायचा ठाऊके ?
एक वेळ येईल की 'फोन घेऊन जग फिरता येईल’ असं मला तेव्हा कुणी सांगितलं असतं तर मी नक्की त्याला वेड्यात काढलं असतं !
पण तुला ऐकुन गम्मत वाटेल, तुझी सवय अजूनही गेलेली नाही बरका ! लोकं अजून ही मोबाईल ला तुच समजतात. बोलणं झालं की म्हणतात, 'ठेऊ का ?’ कुठे काय ठेवणार असतात ते, कुणाला माहित !?😄
असो, तुझ्या अनेक गमतीशीर आठवणी आहेत. एकदा तुलाच फोन करुन सांगीन कधीतरी.
Miss you
तुझी मैत्रिण..