' तु लहान असताना मोबाईल नव्हता ?! फेसबुक नव्हतं ।!? इंस्टा नव्हतं ।? एवढच काय इंटरनेट पण नव्हतं ?? मग काय करायचा काय तुम्ही आयुष्यात ?? ‘
माझ्या १० वर्षाच्या भाचीला पडलेला हा प्रश्न फार काही चुकिचा नव्हता. गेल्या काही वर्षात आपण इतके technology च्या आहारी गेलो आहोत की technology शिवाय एक काळ होता आणि त्यातही लोकं आनंदातच होती हे जवळ जवळ खोटंच वाटतं आजकालच्या पिढीला. मी ही तो असफल प्रयत्न करायचा तुर्तास टाळलं आणि सद्य परिस्थितिशी समरस होऊन गप्पा चालू ठेवल्या. सुट्टीची मजा चर्चा करण्यात कोण घालवणार, ते ही आजच्या तरुण पिढीशी, ते ही ट्रिपच्या पाहिल्या दिवशी आणि विषय तरी काय तर म्हणे technology !! पण परतीच्या प्रवासात मात्र आपण technology शिवायही कसे छान रहायचो हे सांगायचं मनोमन ठरवलं !
ट्रिपची सुरवात छान झाली होती. Airport वर उतरता क्षणी app वर बुक केलेला cab driver हजर असेल असं फोन सांगत होता पण Cab Status बघुन लक्षात आलं Airport च्या दारातच traffic मधे तो अडकला होता. मोबाईल च्या aap वर कार पुढे सरकतीए हे बघता बघता Cab समोर येऊन ठाकली.
आता साधारण तासाभाराचा प्रवास होता. Driver ला रस्ता रोजचा असला तरी कुठे गर्दी कमी लागेल आणि किती वेळात पोहोचता येईल हे कळण्यासाठी अर्थात आमच्या मोबाईलवर map सतत चालू होताच.
साधारण रोज कुठे कुठे फिरायचं हा plan असला तरी आज कुठे जाऊ शकतो, किती वेळ लागेल, काय बघता येईल, जेवण कुठे करायचं या बाबत पुरेसा search झाल्यावरच बाहेर पडायचं असा आमचा रोजचा खाक्या असायचा कारण एकवेळ स्थानिक लोकं फसवत असतील पण google कधीच खोटेपणा करत नसतो हे नक्की.
एकत्र परिवार आणि technology ची साथ असल्याने ट्रिप छान चालली होती. उद्याचा दिवस मात्र पावसाची दाट शक्यता आहे असं फोन वरचं app दाखवत होतं त्यामुळे सगळ्यांनी छत्र्या घेऊन बाहेर पडावं असं ठरलं. बूट, छत्र्या, raincoat असा पावसाचा सगळा बंदोबस्त करुन लोकं बाहेर पडली आणि aap चा अंदाज योग्य ठरला. शत्रुचा डाव परतून लावल्याचा आनंद केवळ technology मुळे आज मिळाला होता, हे मानण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
ट्रिपमधे रोज रात्री उशिरापर्यन्त सगळे गप्पा मारत बसायचे. न संपणाऱ्या गप्पांमधे अनेक विषय व्हायचे. इकडची लोकं कशी रहात असतील, पोटापाण्यासाठी काय करत असतील, इथपासून समोर वाहणारं बर्फाचं पाणी कुठुन उगम पावत असेल पासून एवढ्या थंडीतही तग धरुन उभी असलेली ही झाडं कोणती असतील पर्यन्तच्या आमच्या चर्चा असायच्या पण आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळायचं ठिकाण मात्र एकच होतं. अर्थात google !!
जगाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन, एवढी माहीती गोळा करुन आम्ही दिवस रात्र किती मजा करत होतो ह्याची रोजची खबर आम्हालाच नाही तर आमच्या friendlist मधल्या प्रत्येकाला होती, कारण ही मजा फक्त आम्हीच नाही तर ते ही सगळे like करत होते. Damn technology !! ह्याव्यतिरिक्त फोटो काढायला फोन, काही सुचलं तर लिहायला note pad, रियाजाला तानपुरा, कंटाळा आला तर movie, हे सगळं करायला iPad होताच !
ट्रिप संपली, परतीचा प्रवास सुरू झाला. जाताना अर्धवट राहिलेला विषय येताना पूर्ण करायचा हे आधीच ठरलेलं असून, मी मात्र मौन होते. technology शिवाय आपण खरंच कसे रहायचो या विचारात !!