Tuesday, 19 February 2019

Voice blog 8 बिघडणारा आवाज




गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

प्रत्येक गायकाला सर्व साधारणत: आपल्या सांगीतिक कारकिर्दीत कधीतरी आवाजाचा त्रास उद्भवतो. तो त्रास कधी किरकोळ स्वरूपाचा असतो जो थोड्या काळात बरा होतो तर कधीतरी तो गंभीर स्वरूप घेतो जो बरा व्हायला काही वर्ष सुद्धा जातात.
प्रत्येक आवाजाचा त्रास आधी किरकोळच वाटतो आणि असतो ही. वेळेत लक्ष दिल्यास तो लगेच बरा होऊ शकतो, पण दुर्दैवानी आवाज बिघडत असताना लक्षात येत नाही. आला तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं कारण लक्ष गायकीकडे असतं आणि लक्षात आलं तरी काय करायचं ह्याचा अभ्यास नसतो. 
आवाजातील बिघाड हा बहुधा आवाज चुकीचा वापरण्यातुन निर्माण होत असतो. क्वचित शारीरिक अस्वास्थ्यामुळेही आवाज बिघडु शकतात.

प्रत्येक बिघडलेला आवाज शारीरिक स्तरावर लगेच दिसतोच असे नाही. तो एकदा बिघडला की हा शारीरिक बिघाड आहे असं समजुन डॉक्टर, ENT specialists, Voice Therapists वगेरेंकडे धाव घेतली जाते. वैद्यकिय शास्त्रातला तज्ञ हा संगीताचा अभ्यासक नसतो आणि संगीतातला तज्ञ हा आवाजातला तज्ञ असतोच असं नाही. ह्या कारणामुळे आवाजाला नक्की काय होतए हे कुणीच नीट समजू शकत नाही आणि योग्य तो उपाय सापडत नाही. तिन्ही विषयांचा अभ्यास असणारे तज्ञही सापडत नाहीत.
अशी एखादी आवाजाची समस्या उत्पन्न झाल्यास कुणी काही काळ गाणं बंद ठेवतं, कुणी आपआपल्या परीने उपाय शोधत राहतं, कुणाची कालांतरानी ह्यातुन सुटका होते, कुणी आयुष्यभर आवाजाची ती समस्या किंवा मर्यादा सांभाळुन गाणं चालु ठेवतं, आणि कुणाचं गाणं कायमचं बंद होऊन संगीतिक कारकिर्द संपुष्टात येते. 
आवाजातले निश्चित उपाय त्याच्या निर्मितितिल दोष सुधारुन काढून टाकल्या शिवाय सफल होत नाहीत. आवाज निर्मिती नैसर्गिक झाली की आवाज मुळ पदावर येण्यास मदत होते पण नैसर्गिक आवाज कसा असावा ह्याचा अभ्यास नसतो. 

चांगला आवाज कसा असावा, चांगल्या आवाजाची लक्षणं, आवाज चांगला होण्यासाठी काय करावं वगेरे बद्दल अनेकांनी अभ्यास केलेला आहे पण आवाज बिघडु नये म्हणुन काय करावं किंवा आवाज बिघडतो आहे हे वेळीच कसे ओळखावे याबद्दल सर्वत्र अज्ञान दिसतं. त्याचा अभ्यास आवश्यक आहे. सर्व गायकांना ह्याबद्दल माहिती असायला हवी आणि पुढच्या पिढीला आवाजाबद्दल जागरुकता निर्माण करुन त्यांना तसे शिकवायला हवे. 

उस्ताद अल्लादिया खान साहेबांचा आवाज एकदा अति वापरामुळे बिघडला. आवाज आज सुधारेल उद्या सुधारेल या आशेत तो सलग दोन वर्ष जागेवर आला नाही. ‘ देवा! माझा आवाज मला परत दे, नाहीतर मरण दे’ , अशी दर नमाजाच्या वेळी ते हृदय फोडुन प्रार्थना करत. शेवटी दोन वर्षांनी आवाज किंचित काम देऊ लागला. 
‘त्या दोन वर्षात मनाच्या कसल्या अवस्थेत मी काळ कंठला, त्याचे वर्णन करता येत नाही. जीवंत असून जगात नाही अशी स्थिति झाली होती’ असे खाँ साहेब म्हणत. पण त्यांनी धीर सोडला नाही. बिघडलेल्या गळ्याला एक स्वतंत्र वळण द्यायच्या उद्योगाला ते लागले आणि बिघाडातून त्यांनी अजब बनाव निर्माण केला.

आपला ही आवाज उत्तम असावा, तो जास्त काळ टिकावा आणि तो बिघडत असल्यास वेळीच लक्षात यावं ह्यासाठी आवाजाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे त्यासाठी तो पूर्ण बिघडण्याची वाट पाहु नये..!


आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in

2 comments: