गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
बहुतेक सर्व स्त्री पुरुषांना निसर्गत: चांगले आवाज परमेश्वरानी जन्मजात दिलेले असतात. उत्तम गायकांचे स्वरयंत्र ही सर्वसामान्य मनुष्याप्रमाणेच असते. सर्वांमधे आवाज निर्मीती ही सारखी असली तरी प्रत्याकाचा आवाज वेगळा असतो व वेगळा ऐकु येतो. गोड आवाज, भसाडा आवाज, कर्कश आवाज, किरटा आवाज, husky आवाज, नाकातला आवाज, चपटा आवाज वगेरे प्रकार आपण सहज ओळखतो. हे सर्व अवाज वेगवेगळे ऐकु येतात. आवाजाच्या तीन परिमिती ( dimensions) असतात. उंची (frequency) , जाडी( amplitude) आणि गुण विशेष (timbre) जो resonance मुळे ठरतो. या तीन गोष्टींच्या फरकामुळे आपल्याला आवाज वेगवेगळे ऐकु येतात.
आवाजाची उंची ही दर सेकंदाला होणाऱ्या कंपन संख्येवर अवलंबून असते. प्रत्येक आवाजाला कंपनंसंख्या असतात. जितकी कंपनं जास्त तितकी आवाजाची उंची जास्त आणि जितकी कंपनं कमी तितकी आवाजाची उंची कमी. उदा: सा या स्वराची एका सेकंदाची कंपनं २४० मानली, तर पंचमाची कंपनं संख्या ३६० येईल व तार षड्जाची कंपनसंख्या ४८० येईल. उंच स्वर हा लांबवर ऐकु जातो तर खालचा स्वर फार लांबवर ऐकु जात नाही. ह्याचाच अर्थ स्वराच्या उंचीवर त्याची श्रवण शक्ति अवलंबुन आहे.
Amplitude म्हणजे आवाजाचा volume म्हणजेच आवाजाची घनता किंवा जाडी. कंपनसंख्या न बदलता आवाज वेगळा ऐकु येतो तो आवाजाच्या वेगळ्या घनतेमुळेही. सा हा स्वर जोरात किंवा हळु म्हणला तर त्याची कंपनसंख्या बदलत नाही तर त्याच्या घनतेमुळे तो हळु किंवा जोरात, ऐकु येतो. मोठया घनतेचा आवाज दूर पर्यंत ऐकु जातो तर लहान घनतेचा आवाज फार लांब पर्यंत जाऊ शकत नाही.
आवाजातला तीसरा गुणधर्म म्हणजे आवाजाचा resonance म्हणजेच घुमारा. मुळ आवाज, स्वरतंतुंच्या स्पंदनांमुळे घशात उत्पन्न होतो आणि तोंडावाटे बाहेर पडतो.
तानपुऱ्याच्या तारांप्रमाणे, स्वर पट्टयांवरील विविध पातळ स्नायुंमुळे, मुळ स्वराबारोबर अनेक स्वरांश निर्माण होतात. आवाज उत्पन्न झाल्यावर शरीरातील विविध adjustable आणि non adjustible पोकळ्यांमुळे तो समृद्ध होऊन ऐकु येतो. घुमारा उत्पन्न करणाऱ्या अनेक पोकळ्या आपल्या शरीरात आहेत. तोंडाची पोकळी, जीभेच्या मागची घशाची पोकळी, टाळूची पोकळी, नाकातली पोकळी, डोळ्यांच्या भोवती sinus ची पोकळी आणि स्वर यंत्राच्या खाली श्वास नलिकांमधली पोकळी. ह्या विविध पोकळ्याचा वेगवेगळ्या वापरांमुळे आवाजाचा घुमारा बदलतो. ह्या घुमाऱ्यामुळे आवाज अधिक कर्णमधुर वाटतात.
प्रत्येक आवाजातून स्वयंभू स्वरांश निघत असतात. ह्यालाच upper partials, harmonics किंवा overtones असे म्हणतात. हे स्वरांश प्रत्येक आवाजातून समान निघत नाहीत. कुणाच्या आवाजात ते अधिक खुलून वर येतात तर कुणाच्या आवाजात ते दबले जातात. ह्यामुळे प्रत्येक व्यक्तिचा आवाज एकमेकांपासून वेगळा येतो. ह्या गुणविशेषाला timbre असे म्हणतात. ह्या सर्व पोकळ्यांचा छान वापर झाला की आवाज गोड आणि अधिक घुमारदार येतो.
ह्या तीन गोष्टींच्या फरकामुळे आवाज वेगवेगळे ऐकु येतात. आवाजाच्या विविध प्रकारांवर पुढच्या भागात सविस्तर विचार केला जाईल.
वरील सर्व आवाज निर्माण होताना आवाज निर्मितिचे इतर सर्व स्नायु योग्य कार्य करत आहेत हे गृहीत आहे, कारण कुठला ही स्नायु अकार्यक्षम असल्यास आवाज निर्मितीमधे बदल अपेक्षित आहे.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in