Sunday, 9 February 2020

बाबा आमटे....एक अनुभव


आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ..पृथ्वीवरची सगळ्यात विकसित तीन गावं..!
तिथे सुसज्ज रस्ते नाहीत, चकचकीत घरं नाहीत, गाड्या नाहीत, offices, traffic, signal, गर्दी काही नाही. एवढंच काय mobile ला नेटवर्क ही नाही, तरी पण ते आपल्यापेक्षा कितीतरी विकसीत आहेत, कारण त्यांच्यात आहे सगळ्यांसाठी प्रेम, माणुसकी, एकमेकांना मदत करायची इच्छा, कुठल्याही संकटाला तोंड देण्याची ताकद, सख्या नात्यातल्या लोकांनी दूर केल्यावरसुद्धा जगण्याची उमेद, आयुष्तातले मोठे मोठे अडसर पार करून पुढे जाण्याची शक्ती आणि शारीरिक-मानसिक विकलांगतेवर मात करून असामान्य काम करत राहण्याची जिद्द..!

अनेक वर्षांपुर्वी, बाबा आमटेंनी लावलेल्या रोपाचा आज वटवृक्ष झालाय. विकास भाऊ आणि प्रकाश भाऊ खंबीरपणे सांभाळताएत त्या वटवृक्षाचा डोलारा. असंख्य कुष्ट रोगी,  मूक बधिर, अंध, विकलांग आणि अनेक आदिवासी विसावलेत ह्या वटवृक्षाच्या छायेत. समर्थपणे तोंड देताएत प्रत्तेक संकटाला, प्रत्तेक दुखाःला, प्रत्तेक परिस्थितीला आणि आनंदानी जगताएत एकमेकांना साथ देत, आयुष्याकडे आणि देवाकडे तक्रार न करता..स्वबळावर!

9 फेब्रुवारी..बाबा आमटेंचा स्मृती दिन. त्या दिवशी गाण्यातून त्यांना मानवंदना द्यायचं भाग्य लाभलं. ९ ला अनंदवनात गायचं होतं, आणि आलोच होतो म्हणून हेमलकसाला आणि सोमनाथला ही भेट द्यायची असं ठरवलं. ह्या तिन्ही प्रकल्पांबद्दल साधारण माहिती होती आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या " मी प्रकाश बाबा आमटे ", ह्या चित्रपटामुळे बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहिती होत होती. पण चित्रपटातून १% ही अंदाज येऊ शकत नाही इतकं हे काम मोठं आहे.

दोन दिवसाच्या, आनंदवन हेमलकसा आणि सोमनाथच्या वास्तव्यातून खूप काही शिकायला मिळालं. दिवसभर लोकांना भेटून त्यांच्याशी बोलून, त्यांना जाणून घेता आलं.
कुष्ट रोगानी बोटं झिजली आहेत, काहींना दिसत नाही, ऐकू येत नाही, चालता येत नाही पण काम करायची ईच्छा, ताकद आणि हिम्मत तशीच आहे. स्वतःची कामं स्वतः करून, ते अनेक वस्तू स्वतः बनवतात. मग त्या, त्यांना लागणाऱ्या चादरी, सतरंजा, towel napkin असोत, हॉस्पिटल मध्ये लागणारं bandage असो, लोखंडी कपाटं असोत, wheel chairs असोत, handbags, purses असोत, लाकडाच्या शोभेच्या वस्तू असोत किंवा टाकाऊ वस्तूंपासून केलेल्या गोष्टी असोत !!
स्वतःच्या विकालांगतेचा कुठेही बाऊ नाही, आणि त्याचं दुखःही नाही..!

३३ वर्षाची सुजाता शरीराने वाढलीच नाही. तिच्या हातातही जोर नाही. ती पायनी उत्कृष्ट चित्र काढते. तिनी काढलेल्या शुभेच्छा पत्रांना उत्तम मागणी आहे. ती लॉ चा अभ्यास ही करते. ४२ वर्षांचा महेश दुकानाचं अकाउंट्स सांभाळतो. आई वडिल दोघं कुष्ट रोगी. तो इथेच लहानाचा मोठा झाला, सगळी दुःख कष्ट लहानपणापासुन बघतोय म्हणून स्वखुशीनी इथेच रहतोय. ६० वर्षांचे सुतार काका, कॅन्सरमधून बाहेर पडलेले, सगळ्या परिसराची देखभाल करतात, आनंदवनात येणाऱ्या बाहेरच्या लोकांना परिसर दाखवतात. अनेक किलोमीटरचा हा परिसर एकदा फिरताना दमछाक होते, पण ते दिवसातून कितीतरी वेळा हा परिसर उन्हा-तान्हात पालथा घालतात.

दिवसभर हे सगळं बघुन, संमिश्र भावना मनात घेऊन रात्री कार्यक्रमासाठी मंचावर गेले.
माझ्या कलेमुळे जर त्यांचे दोन क्षण सुखात गेले आणि ते तातपूर्त जरी त्यांचं दुःख विसरले तरी माझ्या कलेचं सार्थक होणार होतं. 

सर्वांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला आणि मला ही समाधान मिळालं. पण ह्या कार्यक्रमाचा अनुभव इतर कार्यक्रमांपेक्षा कितीतरी वेगळा होता. 
मूक असलेला एक मुलांचा घोळका हातवारे करुन मला काहीतरी फर्माईश देत होता. अंध असलेल्या मुली मला स्पर्शातून समजून घेत होत्या. Wheelchair वर बसून गाणं ऐकणाऱ्या मुली मला त्यांच्या जवळ बोलवुन माझं कौतुक करत होत्या. ह्या सगळ्यात एक अनुभव मनाला खूप स्पर्शून गेला.

कार्यक्रमाला आलेली एक मुलगी, कार्यक्रम झाल्यावर उठायला लागली आणि तिचा खोटा बसवलेला पाय निखळून पडला. आपली खांद्याला अडकवलेली purse गळून पडावी तितक्या सहजतेनी तिनी तो पाय उचलला, बसवला आणि माझ्या डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसेपर्यंत क्षणार्र्धात ती नाहीशी ही झाली..! केवढा हा आशावाद !! केवढी ही आयुष्याशी लढायची ताकद ? केवढी ही इच्छाशक्ती ?
हे सगळं बघितल्यावर वाटलं, आपल्याकडे असं काय नाही, कि ज्याचं आपण दुखः करावं ? आणि तरी आपण आपलंच दुःख मोठं मानून त्याला कुरवाळत बसतो ! 

आनंदवनाचा कार्यक्रम संपवून आम्ही हेमालाकसा गाठलं. तिथल्या आदिवासींची तऱ्हा अजूनच वेगळी. अस्वलांनी चेहरा फाडला म्हणून anaesthesia न घेता टाके घालून घेणऱ्याची सहनशक्ती जास्त ? का पोटातलं बाळ कापून काढून लगेच 19 किलोमीटर चालत जाणाऱ्या बाईची सहनशक्ती जास्त..? का तळपायाला cancer ची गाठ डोळ्यादेखत कापून घेणाऱ्याची सहन शक्ती जास्त ? का हे सगळं आपल्या हातांनी करणऱ्या प्रकाश भाऊंची सहन शक्ती सगळ्यात जास्त ?
वेदना सहन करण्याची परिसीमाच ! आपण आपल्या कुठल्या वेदनेचं कौतुक करायचं ह्यांच्यासमोर ?

नुकत्याच जन्म दिलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला फाडून खाण्याइतका अडाणीपणा असलेल्या ह्या लोकांना सुधारताना काय काय सहन केलं असेल, ह्याची कल्पनाही आपल्याला येऊ शकत नाही. संपूर्ण आयुष्य वाहून टाकलंय आमटे कुटुंबांनी, ह्यांना माणसात आणण्यासाठी ! आणि फक्त बाबा आमटेंची मुलंच नाहीत तर सुना, नातवंड, नात सुना सगळ्यांनी ध्यास घेतलाय ह्यांच्या सेवेचा...! अनेक घरात उत्तम चललेला वडीलोपार्जित व्यवसायही मुलं सांभाळत नाहीत पण आमटे कुटुंबाच्या पुढच्या पीढिनी आनंदानी वाहून घेतलय स्वतःला या कामासाठी. मुलांबरोबर सुनाही नवऱ्याच्या खाद्याला खांदा देऊन काम करत आहेत.

आज आदिवासी लोकांची मुलं शाळेत जातात. शाळेची शिस्त पाळतात. सकाळी 5 ला प्रार्थना, 5:30 ला चहा, 7 ला नाश्ता, 12 ला जेवण, 2:30 ला चहा, 5 ला नाश्ता आणि 7:30 ला जेवण. आपल्या मुलांना चिऊ काऊचे घास करत भरवावं लागतं पण ही मुलं अर्धा तास आधीच ताट घेऊन खेळत असतात, कधी वेळ होणार आणि कधी पोटात खाऊ जाणार ! 3/4 वर्षाची मुलंही स्वत:चे कपडे स्वत: धुतात. अभ्यासाची गोडी लागलीए सगळ्यांना. अनेक मुलं आज डॉक्टर, engineer होऊन तिथल्याच लोकांसाठी काम करत आहेत.

एकीकडे आपल्यासारखी लोकं, वेळ नाही म्हणून आपल्या सख्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारी आणि एकीकडे ह्यांच्यासारखी लोकं कुठलंच नातं नसणाऱ्या हजारो लोकांसाठी झटणारी !

bank balance वाढतोय कि नाही ह्याची काळजी नाही, मुलं convent मध्ये छान शिकताएत नं, ह्याची फिकीर नाही, चांगली नोकरी मिळून गलेलठ्ठ पगार मिळेल का नाही ह्याची पर्वा नाही...चिंता आहे तर फक्त ह्या लोकांचं कसं भलं होईल ह्या गोष्टीची..!
म्हणूनच त्यांना भरभरून प्रेम मिळतं असंख्य लोकांचं, फक्त माणसांचंच नाही तर प्राण्यांचं सुद्धा.
जेवणं झाल्यावर, प्रकाश भाऊंबरोबर सगळ्या प्राण्यांना बघायला आम्ही फेर फटका मारला, तेव्हा साळींदर, हरीण, चित्ता, माकडासारखे प्राणी धावून आले आणि प्रेमानी बिलगले त्यांना, बघता क्षणी ! पाऊस नसताना, भर ऊन्हातही मोर नाचायला लागला फक्त त्यांना बघुन !
त्यांनी प्रेमंच तसं केलं ह्या सगळ्यांवर ! निरपेक्ष..!

आमटे कुटुंबांनी फक्त ह्या सगळ्या लोकांना सांभाळलं नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांचे संसार थाटले. सोमनाथ च्या 1200 एकर जमिनीवर शेती करत किती तरी कुटुंब सुखानी राहताएत. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी 27 तळी खोदली आहेत श्रामादानानी. वाया गेलेल्या tyres पासून धरण तयार केलए पाणी साठवायला.
आपल्या कुठल्या कामाचा कौतुक करायचा ह्यांच्या कामासमोर ?
सगळं खूपच अविश्वसनीय आहे ! एका आयुष्यात कुणी इतकं काम कसं करू शकतं.. ? केवढी ही दूरदृष्टी ?

हे सगळं डोळ्यानी पाहून अनुभवता आलं म्हणून त्याचीच टिमकी वाजवत फिरताना असं वाटतं वर्षातून एकदा जरी तिकडे जाऊन तिथे आर्थिक, मानसिक किवा शारीरिक मदत करता आली तरी खूप पुण्य कमवायची संधी मिळेल आयुष्यात !

आमटे कुटुंब म्हणजे कलयुगातले संतच मानायला हवेत. त्यांच्या या अखंडित कामाला माझा मानाचा मुजरा !!

Saturday, 8 February 2020

Voice blog 22 आवाज बिघडण्याची कारणे भाग ४


गाणाऱ्यांना आवाजाप्रति जागरूकता निर्माण होण एक महत्वाची गोष्ट आहे. त्या विषयाचा अभ्यास प्रत्येक गायकाने करावा, आणि आपल्या आवाजाचं आरोग्य उत्तम ठेवावं ह्या हेतुने लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

आपल्या प्रत्येकाची एक ठराविक शारीरिक उंची असते. ठराविक वयात व्यायामाने किंवा इतर कुठल्या उपायाने ती थोडीफार वाढवता येऊ शकते पण त्यात अमुलाग्र बदल होत नाही. तसेच आवाजाचे असते. ठराविक वयात मेहनत केल्यास आवाजाची रेंज थोडीफार वाढू शकते पण त्या पलिकडे त्यात फार फरक पडत नाही. त्या रेंजच्या बाहेर वारंवार गायचा प्रयत्न केल्यास आवाज बिघडण्यास सुरवात होते.

३. मर्यादित रेंज

प्रत्येक आवाजातून त्याची रेंज लक्षात येते. गाणं शिकलेल्या गायकाची रेंज कायमच न शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त असते कारण त्यांचे आवाज निर्मितीचे स्नायु वापरामुळे शीथिल झालेले असतात. असे असले तरी नैसर्गिक मिळालेल्या रेंजमधे समाधानी असलेले गायक विरळाच. आहे त्या रेंजच्या बाहेर गाण्याच्या प्रयत्नात गायक हमखास जोर लावून गायचा प्रयत्न करताना दिसतात किंवा आवाज चोरून लावताना दिसतात.  जास्त आणि जोरकस उच्छ्वासाने ते स्वर गाता येतात असा मोठा गैरसमज गायकांमधे दिसून येतो. असे करताना हमखास आवाज फाटतो आणि आवाजाला हानी पोहोचते. थोड्या अवधित त्याचे परिणाम दिसत नसले तरी दिर्घ काळात त्याचे पडसाद आवाजावर उमटायला लागतात.
स्वर पट्टया जेवढ्या जाड तेवढी आवाजाची जाडी जास्त. पुरुषाच्या स्वरतंतुची जाडी १७ ते २५ मि.मि असते तर बायकांच्या स्वर तंतुंची जाडी १२.५ ते १७.५ मि.मि असते. याच कारणामुळे पुरुषांचे आवाज बायकांपेक्षा जाड असतात. पुरुष आणि बायका दोघांमधे खालचे स्वर म्हणताना स्वर पट्टया जाड होतात आणि त्यांची लांबी कमी असते. या उलटवरचे स्वर म्हणताना स्वर पट्टयांची लांबी वाढते आणि त्या बारीक होतात. खालचे स्वर म्हणताना श्वास नलिकेतून जोरात हवा बाहेर आली तरी स्वर तंतु जाड असल्यामुळे सहज विलग होत नाहीत. या उलट वरचे स्वर म्हणताना स्वर तंतु बारीक आणि लांब होतात. श्वास नलिकेतून हवेचा जोर आल्यास त्या सहज विलग होतात आणि आवाज फाटतो. याच कारणामुळे वरचे स्वर गायचे असल्यास आवाज हल्का आणि बारीक असणं गरजेचं आहे तरच वरचे स्वर सहज लावता येण्याची शक्यता निर्माण होते. असे गायल्यास आवाज फाटणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा त्रासही होणार नाही. आवाज हल्का आणि बारीक याचा अर्थ त्याचा volume कमी असतो पण नैसर्गिक असतो. कुठल्याही प्रकारे तो खोटा आवाज नसतो.

वरचे स्वर चोरून गाताना आवाज बारीक केला जातो पण आवाज निर्मीतीच्या स्नायुंमधे कडकपणा असतो. त्यांच्या नैसर्गिक स्थितीत बदल होतो आणि आवाज खोटा ऐकु येतो.

आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in

Monday, 3 February 2020

प्रिय गोविंद,


प्रिय गोविंद

लहानपणापासून आईकडून तुझ्या अनेक गोष्टी ऐकल्याअनेक वेळा देवळात तुझी मूर्ति बाघितली, TV वर बाघितलंपण तुझाआणि तुझ्या सखी द्रौपदीचा विचार केला की हमखास तुमचा हेवा वाटतोतिच्याशी मन मोकळ्या गप्पा मारायलाचेष्टामस्करी करायलावेळ प्रसंगी सल्ले द्यायलामदतीलाआधार द्यायला कायम तु होतासएकदा केलेली मैत्री तु आयुष्यमभर निभावलीसत्यात गैरसमज नव्हतेसंकोच नव्हताशंका नव्हत्याहोता फक्त एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम.

महाभाराताची ती गोष्ट बघताना असं वाटायचंतुझ्या सारखा एक तरी सखा आयुष्यात असायला हवातो आयुष्यभर सोबत करेलयोग्य अयोग्य मार्ग दाखवेलसल्ले देईलसमजून घेईलमाझं ऐकुन घेईल आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास असेल.

व्यक्तिरूपात अजून तु समोर आला नसलास तरी अप्रत्यक्षपणे तु माझ्या बरोबर असतोस हे माहिती आहे मलाकधी कुठे अडखळले तर सल्ला देतोसकधी कुठली अडचण आली तर मार्ग दाखवतोसतुझं अस्तित्व कायम जाणवतं मला आजुबाजूला पण समोर मात्र येत नाहीस.

आयुष्यात अनेक मित्र भेटलेमनासारखा जोडीदार भेटला पण त्या 'गोविंद’ ची जागा अजूनही रिकामीच आहेकधीतरीवाटतं तु माझ्या जवळपासच असशील आणि मलाच ओळखता येत नसेलकुणावर असा मोकळेपणानी विश्वास ठेवायला मला तरी कुठे जमतय..! आणि शिवाय मला जशी तुझ्या भेटीची ओढ लागली आहेतसं तु मला भेटायलामाझीपण तर पात्रता हवी..!!

तुझी वाट पाहणारी,
तुझी सखी..