Thursday, 15 August 2019

Voice blog 14 नैसर्गिक आवाजाची लक्षणे भाग २


गाणाऱ्यांसाठी त्यांचा आवाज अत्यंत प्रिय आणि सगळ्यात महत्वाचा असूनसुद्धा त्याबाबत जागरूकता दिसत नाही. आवाज ह्या विषयाचा अभ्यास करुन त्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

२. आवाजाचा पोत 

नैसर्गिक आवाजाचं दुसरं लक्षण, आवाजाच उत्तम पोत ( tone ) 
थोडक्यात पोत म्हणजे आवाजाची जात, ज्याला आपण गोड, भसाडा, जाड, नाजुक, चिरका, नाकातला, जोरकस, चपटा वगेरे नावानी ओळखतो. हे आवाज वेगवेगळे ऐकु येतात ह्याचं कारण आपण blog 3 मधे बघितलं. 

आवाज ही सतत बदलत जाणारी गोष्ट आहे. आपल्या शरीराधर्माप्रमाणे आवाजातही परिपक्वता येते, ठराविक वयात तो परमोच्च बिंदु गाठतो आणि सर्वसामान्यपणे त्यानंतर त्याची घसरण सुरू होते. आपल्या Mood प्रमाणेही आपला आवाज सतत बदलत असतो. वेगवेगळे भाव आपल्या आवाजात दाखवायलाही आपण आवाजाचा पोत बदलत असतो.
थोडक्यात सांगयचं तर आवाज म्हणजे आपलं व्यक्तिमत्व आणि आवाजाचा पोत (tone) हा आपला Mood आहे

खरं पाहता, उत्तम पोत म्हणजे काय हे सांगणं अवघड आहे पण तरी उत्तम पोत, आवाज निर्मितीचं उत्तम तंत्र अवगत करुन मिळवता येतो. त्याने एकसारखा आणि नैसर्गिक आवाज मिळवायला मदत होते.

आवाजचा पोत उत्तम बनवण्यासाठी जे घटक लागतात ते खालील प्रमाणे

* तिन्ही सप्तकात एकसारखा आवाज 
आवाज एकसारखा येण्याबाबत आपण मागच्या blog मधे बघितलं. तो एकसारखा येतो आहे ह्याची खात्री करण्यासाठी कान तीक्ष्ण करणे आणि आवाज निर्मितीचं कुठलंही तंत्र न बदलता तिन्ही सप्तकात एकसारखा आवाज निर्माण करणे.

* श्वासाचा अभ्यास
श्वास उत्तम असण्याकरता गाताना diaphragmatic breathing होणे गरजेचे आहे. श्वास पोटातून घ्यायला हवा, वरच्यावर छातीतुन नाही. श्वास घेताना मान, खांदे न हालता, श्वास घेताना पोट बाहेर आणि सोडताना आत अशी हालचाल होणं अपेक्षित आहे. असे झाल्यास जास्तीत जास्त श्वास घेतला जाईल आणि आवाज उत्तम येण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त घेतलेला श्वास जास्तीत जास्त वेळ टिकेल ह्यासाठी स्वरपट्टयांचं संकुचन योग्य प्रमाणात होणं महत्वाचं आहे. 

* घुमारा उत्पन्न करण्याऱ्या स्त्रोतांचा अभ्यास
आवाज घशामधे उत्पन्न होत असला तरी आपल्या शरीरात असलेल्या विविध पोकळ्यांमुळे त्या आवाजाला घुमारा प्राप्त होतो. छाती, घसा, गाल, नाक, कपाळ अशा विविध ठिकाणी ह्या पोकळ्या असतात. आपल्या मराठी भाषेतील वेगवेगळी मुलभूत व्यंजनं म्हणुन बघितल्यास असं लक्षात येईल की,`त,थ,द,ध,न‘ हे प्रत्येक व्यंजन म्हणताना वेगवेगळ्या पोकळ्यांमधे घुमारा होत असतो.
ओंकार साधना हा घुमारा निर्माण करण्याचा एक उत्तम उपाय आहे. ओंकाराची फोड करुन 'आ, ऊ, म’ म्हणल्यास, अनुक्रमे छाती, घसा व कपाळ ह्या ठिकाणी सरावाने घुमारा निर्माण होतो.

* आवाजाच्या पट्टयांचं पुरेसं संकुचन करण्याचा अभ्यास (compression )
आवाज निर्मितीसाठी स्वर पट्टयांच्यं एकत्र येणं एक महत्वाची क्रिया आहे. ह्या स्वर पट्टया हल्केच जवळ येतात किंवा घट्ट जवळ येतात. ह्यावरून आवाजचा पोत बदलतो.
स्वर पट्टया हल्के जवळ येत असल्यास बरीच हवा निघुन जाते, श्वास कमी पडतो व आवाज अशक्त येतो. त्या उलट खूप घट्ट बंद होत असल्यास हवेचा दाब जास्त निर्माण होतो. स्वर पट्टयातून हवा निसटुन स्वर पट्टया जोरात एकमेकांवर आपटतात. 
ह्या दोन्हीचा मध्य मार्ग, स्वर पट्टया माफक प्रमाणात बंद होणं.
त्यासाठी खालील exercise करुन बघावा.
* आवाज न करता आ करणे - ह्यामधे स्वरपट्टया लांब राहतील
* हलक्या आवाजात आ’ म्हणणे - ह्यामधे स्वर पट्टया हलक्या जवळ येतील आणि आवाजाबरोबर थोडी हवा निसटेल
* आवाज माफक वाढवून आ’ म्हणणे - ह्यामधे स्वर पट्टया पुरेशा जवळ येतील
* जोरात आ’ म्हणणे - ह्यामधे स्वर पट्टया घट्ट जवळ येतील
* हीच स्थिति ठेवून आवाज बंद करणे - ह्यामधे स्वर पट्टया घट्ट जवळ आहेत पण आवाज बंद आहे. पोटातून कुठला ही पदार्थ बाहेर फेकला जात असताना ही स्थिति निर्माण होते जेणे करुन तो पदार्थ श्वास नलीकेत जात नाही.

स्वरपट्टयांच्या योग्य संकुचन होत आहे हे आवाज ऐकुन ठरवता येते. योग्य संकुचनच्या सरावासाठी प्रत्येक स्वरावर माफक आवाजात तुटक 'आ’ म्हणावा.

आवाजाची ही लक्षणं तुमच्या आवाजात तपासुन पहा आणि आवाज अधिकाधिक उत्तम आणि नैसर्गिक करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रतिक्रिया, अडचणी आणि सल्ले कळवल्यास, सखोल अभ्यास होण्यास नक्कीच मदत होईल.


आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in