गाणाऱ्यांसाठी त्यांचा आवाज अत्यंत प्रिय आणि सगळ्यात महत्वाचा असूनसुद्धा त्याबाबत जागरूकता दिसत नाही. आवाज ह्या विषयाचा अभ्यास करुन त्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
आवाज कसा असावा ह्याबद्दल बहुतेक गायकांची ढोबळ मतं असतात पण म्हणजे नक्की त्यात कोणते गुण असावेत ह्याबाबत कमी सुस्पष्टता दिसते. नैसर्गिक आवाज वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. तो आपल्याला सहज ओळखता येतो पण कशामुळे तो गोड, चांगला आणि नैसर्गिक वाटतो ह्याबद्दल मात्र अभ्यास दिसत नाही. किंबहुना अनेक वेळा चांगल्या आवाजाबद्दल काही गैरसमज दिसून येतात. उंच गाता येणं म्हणजे चांगला आवाज, आवाज कधीही न बसणं वगेरे सारख्या चुकीच्या समजुतींमुळे चांगला आवाज म्हणजे नक्की कसा आवाज ह्याबदल गोंधळ दिसून येतो.
नैसर्गिक आवाज स्वाभाविक, अकृत्रिम आणि सहज असतो. त्या आवाजात उत्तम प्रकारे उंची, खनक, प्रभावीपणा असतो व तो आकर्षक असतो. असा आवाज काढताना नैसर्गिक पोटातून श्वासोच्श्वास होत असतो. ( diaphragmatic breathing )
अशा मुळच्या नैसर्गिक आवाजावर लहानपणापासून घरातील लोकांच्या, मित्र मैत्रिणींच्या आवाजाचे परिणाम होत असतात. म्हणुनच फोन वर बोलताना आई मुलगी किंवा वडिल आणि मुलाचा आवाज, ऐकणाऱ्याला सारखा वाटतो. गाणं शिकत असल्यास ह्या आवाजवर गुरूच्या संस्काराचेही परिणाम होतात आणि नैसर्गिक आवाज बदलत जातो.
ज्या भाग्यवान लोकांचे आवाज अश्या बाह्य परिणामांमुळे न बदलता टिकुन राहतात, त्या नैसर्गिक आवाजाची सगळी लक्षणं ह्यापुढील blogs मधे आपण बघुयात.
१. आवाज ताब्यात असणं
आवाज काढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर, दुपारी, संध्याकाळी किंवा मध्यरात्री, अशा कुठल्याही वेळी आपण चालणं, बोलणं, किंवा हालचाल करण्यासारख्या क्रिया सहज करू शकतो तसेच आवाजाचे आहे. दिवसाच्या कुठल्याही वेळी आवाज सहज उमटणे हे चांगल्या आवाजाचे महत्वाचे लक्षण आहे. अर्थात सकाळी उठल्यावर जशा शारीरिक हालचाली शिथिल असतात तसेच आवाजाचे होणे स्वाभाविक आहे. ह्याच कारणासाठी सकाळी आवाज साधना करत असताना खर्जाचा रियाज, सावकाश स्वर लावणे, हलक्या आवाजात पलटे म्हणणे अपेक्षित असते. आवाज तापवण्याची क्रिया म्हणजेच warming up ह्यातुन होत असते. असे केल्याने आवाज चांगला राहण्यास मदत होते.
आवाज ताब्यात असण्याचा दुसरा अर्थ स्वरांवर ताबा मिळवणे म्हणजेच स्वरेल असणे. गायकाला मनात येईल तो स्वर लावता येणे. ह्यासाठी स्वरांचा पुरेसा रियाज होणं गरजेचं आहे. भारतीय शास्त्रीय संगीत ही कणयुक्त गायकी आहे. मुख्य स्वर लावताना त्याच्याबरोबरचे कण देखील योग्य लागणं तितकंच महत्वाचं आहे तरच गाणं सुरेल वाटते. अनेक वेळा अति जोरकस आवाज लावल्यामुळे सुर कमी लागतात. ह्याच कारणामुळे असे दिसून येते की जोरकस आवाज असलेल्या गायकांची range कमी असते आणि हल्का आवाज असलेले गायक वरच्या सप्तकात सहज गातात. आवाज हल्का लावल्यास सुर योग्य ठिकाणी लागण्यास मदत होते. आवाज नैसर्गिक असेल तर तो हल्का आणि सुरेल असतो.
आवाज ताब्यात असण्याचा अजून एक अर्थ म्हणजे आवाज एकसारखा ऐकु येणं. हा आवाज तिन्ही सप्तकात एकसारखा ऐकु येणं महत्वाचं आहेच, ह्याव्यतिरिक्त स्वरकण लावताना देखील आवाज एकसारखा राहणं महत्वाचं आहे. अनेक वेळा एका स्वरावरून दुसरा स्वर लावताना आवाजाचा ( shape ) आकर बदलतो. हा आकार बदलतो तेव्हा जीभ, गाल, ओठ वगेरे सारख्या ठिकाणी कारण नसताना हालचाल होत असते. ही हालचाल नकळत होत असते व त्यामुळे आवाज बदलतो. आकार एकसारखा ऐकु आला तर आवाज अधिक चांगला ऐकु येईल. ह्यावर उपाय म्हणुन, गात असताना चेहेऱ्यावर स्मित ( smile ) ठेवल्यास विनाकारण वापरात येत असलेले स्नायु अडथळा निर्माण करु शकणार नाहीत आणि आवाज एकसारखा यायला मदत होईल.
आवाजाचे ही लक्षणं तुमच्या आवाजात तपासुन पहा आणि आवाज अधिकाधिक उत्तम आणि नैसर्गिक करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रतिक्रिया, अडचणी आणि सल्ले कळवल्यास, सखोल अभ्यास होण्यास नक्कीच मदत होईल.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in