Monday, 24 June 2019

वारी


वारी..प्रत्येकानी एकदा तरी अनुभवी !

वेगवेगळ्या गावातून निघुन, १५-२० दिवस एकत्र चालत, विठ्ठलाचा जयघोष करत आषाढी एकादशीच्या दिवशी, पंढरपुरच्या विठोबाचं दर्शन घेणं म्हणजे वारी !
तिथे सगळ्या वयाचे वारकरी आहेत. कडेवर बसून गंमत बघणारी छोटी बाळं आहेत, आई वडिलांचा हात धरून, ते सांगतील तिथे उड्या मारत चालणारी छोटी मुलं आहेत, धनी जातात म्हणून वृंदावन डोक्यावर घेऊन निघालेली धनीण आहे, बायकोची काळजी म्हणून सोबत करणारे पती आहेत, ' घराण्यात वारी आहे म्हणुन आम्ही ही श्रद्धेनी करतो ', असं सांगणारी लोकं आहेत, गंमत बघायला येणारे तरूण लोक आहेत, आपला fitness किती ते बघायचं, म्हणून चालणारी लोकं आहेत, वारकऱ्यांची मदत व्हावी म्हणून रस्त्याची स्वच्छता ठेवणारे लोक आहेत, 15/20 दिवस जेवणा-खाण्याची फुकट सोय होते म्हणून येणारे आहेत, वारीच्या नावाखाली चोऱ्यामाऱ्या करणारे देखिल आहेत.
सगळे लोक तहान, भूक, ऊन, पाऊस कशाचीही पर्वा न करता दिवस दिवस एकत्र चालत राहतात फक्त.

कुणाच्या हातात टाळ, कुणाच्या गळ्यात मृदुंग, कुणाच्या हातात एकतारी, कुणाच्या डोक्यावर वृंदावन आणि सगळ्यांच्या जोडीला मुखात हरिनाम. सगळं वातावरण पांडुरंगमय होऊन जातं. कितीही वय असलं, तरी पांडुरंगाच्या नामात तल्लीन होऊन वारकऱ्यांना अखंड गाताना नाचताना बघणं म्हणजे पर्वणीच ! विशी-पंचविशीतल्या तरुणाला लाजवतील एवढा उत्साह आणि एवढी ताकद, तो पांडुरंगंच देत असावा बहुधा सगळ्या वारकऱ्यांना !

मला ही वारी बरोबर चालायला अत्यंत आवडतं आणि त्याहीपेक्षा आवडतं त्यांच्या बरोबर चालत असताना सगळ्या वारकऱ्यांना अनुभवणं. प्रत्येकाचा वारीला यायचा उद्देश वेगळा त्यामुळे प्रत्येकाचा दृष्टिकोनही वेगळा. 
कुणी अखंड नामस्मरण करतं, कुणी नामाचा जयघोष करतं, कुणी अभंग गात असतं, कुणी अखंड मोबाईल वर, कुणी त्या माहोलची मजा घेत असतं, कुणाचं लक्ष फक्त मिळणाऱ्या शिध्याकडे तर कुणाला चालायचीच झिंग !
चालत असताना कुणीतरी वाट करून देतं तर कुणी ढकलून पुढे जातं. कुणी हसून ' चला माऊली ' म्हणत वातावरण उल्हसित करतं, तर कुणी 'सुशिक्षित समाज', म्हणजे जरा अति शहाणा समाज असं समजून तुच्छतेचा कटाक्ष टाकतं.

दमून 2 मिनीटं बसलं तर कुणी ' चला माऊली ' म्हणत दखल घेतं, कुणी प्रेमानी चौकशी करतं, कुणी ' आता थोडंच राहिलं माऊली ' म्हणत धीर देतं, तर कुणी ' एका दिवसात काय दमता ? आम्ही 15 दिवस चालतो, झेपत नाही तर यायचं कशाला ? ', म्हणून टोमणा मारतं.

सर्व वारकरी एका दिंडी अंतर्गत चालत असतात. ते एक परिवार बनून एकत्र राहतात. दिंडीची जेवणं उरकली कि कुणी तिथेच कचरा करत पुढे जातं, कुणी कचऱ्याचा डबा शोधतं तर कुणी असेल नसेल तो सगळा कचरा बरोबर नेतं.
वारकऱ्यांना कुठे शिधा मिळाला तर कुणी स्वतः पुरतं घेतं, कुणी स्वतः पुरतं घेवून वर पिशवीत भरून नेतं तर कुणी स्वतः घेवून दुसर्‍यांना वाटतं.
दिंडीतले लोक एकत्र चालतात, एकत्र जेवतात, एकत्र राहतात. त्यांच्या दिंडीबरोबर चालल्यास कुणी सहज सामावून घेतं कुणी रागराग करतं तर कुणी स्पष्ट दिंडी बाहेर चालायला सांगतं.

तिथे चालणारी प्रत्येक व्यक्ति वेग-वेगळी वागते कारण खऱ्या वारीचा उद्देश सगळ्यांना माहित असतो असं नाही आणि माहित असला म्हणून त्या प्रमाणे वागता येत असंही नाही. वारीतला मुख्य उद्देश म्हणजे, ' देव ठेवील तैसे रहावे.' आपल्या वाटे आलेल्या उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून गरजेपुरतं अन्नपाण्याचं सेवन करायचं. परस्त्रीला मातेसमान मानायचं. कोणत्याही जीवाचा मत्सर करायचा नाही. त्याच्या कल्याणची प्रार्थना करायची, संत वचनांचं पालन करायचं. गीता भागवताचं वाचन करायचं. सर्व चराचरात ' तो ' सामावलेला आहे ह्याची जाण ठेवायची आणि आपल्या सर्व कार्यांच्या केंद्र स्थानी भगवंताला ठेवून कार्य करत रहायचं. 

वारीतच काय प्रत्यक्ष आयुष्यात ही अनेक स्वभावाची लोकं आपल्याला भेटत असतात. कधी कुणाबद्दल आपुलकी वाटते, कधी कुणाचा राग येतो, कधी चिडचिड होते कधी संकोच वाटतो. आपण सगळ्यांशीच सारखं वागवू शकत नाही.

मला वाटतं सगळ्यांशी एकसारखं प्रेमानी वागणं म्हणजेच अध्यात्म खऱ्या अर्थानं जगणं असावं, कारण वर पाहता वेगवेगळ्या प्रकृतीची लोकं असली तरी त्यांच्यातला परमात्म्याचा अंश तोच आहे. आपण फक्त तो न बघता समोर दिसणारी व्यक्ति आणि तिचा स्वभाव बघत असतो. असं वागणं ज्या दिवशी जमेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं अध्यात्म जगलो असं म्हणता येईल.

वारी म्हणजे थोडक्यात असंच वागण्याचा प्रयत्न ...निदान एक दिवस तरी !

Wednesday, 19 June 2019

Voice blog 12 आवाज आणि मानसिक अडथळे



गाणाऱ्यांसाठी त्यांचा आवाज अत्यंत प्रिय आणि सगळ्यात महत्वाचा असूनसुद्धा त्याबाबत जागरूकता दिसत नाही. आवाज ह्या विषयाचा अभ्यास करुन त्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

मनासारखं न गाता येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातलं एक कारण म्हणजे Mental blocks. मनासारखं गाता येत असलं तरी मनात एखाद्या गोष्टीची भिती बसते आणि कायमच गाताना, डोक्यावर भूत असल्यासारखी ती भिती समोर येऊन ठाकते.
गायकांच्या मनात अशी भिती अनेक प्रकारे असू शकते. 

सूर लागायची भिती
गायला सुरवात करताना पहिल्या पाच मिनीटांची भिती
खर्जाची किंवा तार सप्तकाची भिती
विशिष्ट स्वराची भिती
मांडणीची भिती
विशिष्ट रागाची भिती
ऐकणाऱ्यांची भिती
Image ची भिती
सहगायकांची भिती वगेरे..

अशा प्रत्येक भितीची सुरवात कुठल्यातरी प्रतिकूल अनुभवातून होते व अज्ञानामुळे ही चूक वारंवार घोटली जाते. एखाद्या मैफिलित कधीतरी एखादी गोष्ट जमत नाही. पुढच्यावेळी तीच गोष्ट परत करताना मनात एक भिती निर्माण होते. स्वतःकडे पूर्णपणे त्रयस्थपणे पहायला जोपर्यंत तो गायक शिकत नाही तोपर्यंत ह्या प्रतिकूल प्रतिक्रियेचं त्याच्या मनात एक प्रकारे दडपण तयार होऊन ह्याच दडपणाचं न्युनगंडामधे रूपांतर होतं. अशा न्यूनगंडामुळे उर्मीचा नाश होतो व हा न्यूनगंड त्याच्या गाण्याचा एक घटक होऊन बसतो. स्वतःला एखाद्या गोष्टीची वाटणारी अशी भिती नको वाटते आणि तरी टाळता येत नाही, आणि ह्या केविलवाण्या अवस्थेवर उपायही सापडत नाही.

घराण्याच्या तत्वांचं चुकीचं केलेलं अनुकलन, श्रोत्यांच्या चुकीच्या समजुती, गुरुचे अनुकरण, वस्तुसापेक्ष दृष्टिकोनाचा अभाव आणि अशा अनेक कारणांमुळे गवयाच्या मनात न्युनगंड तयार होऊ शकतो आणि तो तयार झाला की त्या प्रत्येक वेळेला त्याला अडखळायला होतं. 
प्रत्येक गायकाचा अनुभव लक्षात घेऊन, त्याची कारणमिमांसा केल्यावर, त्यावर उपाय शोधता येतो. उदाहरणार्थ 
- खर्जाची भिती असेल तर मध्यम ग्रामात खर्जाचा रियाज करुन ती भिती घालवता येते.
- एखाद्या विशिष्ट स्वराची भिती असेल तर पट्टी बदलुन गायल्यास त्या स्वराचं स्थान बदलतं. पूर्वीचा असलेला षडजं, धैवत किंवा निषाद म्हणुन सहज गाता येतो आणि त्या स्वरामागची मानसिक अवस्था कालांतराने बदलता येते.
थोडक्यात एखाद्या गोष्टीची भिती असल्यास त्याची वस्तुनिष्टतेने शास्त्रीय चौकशी करुन, किंवा मुळ गोष्टीला वेगळं स्वरूप देऊन सुधारणा करता येते.

असे होऊ नये म्हणुन स्वतःचे गाणे त्रयस्थपणे ऐकण्याची सवय करायला हवी व तसे न जमल्यास आवाज तज्ञाचे मत विचारात घेऊन आवाजात सुधारणा करायला हवी.
मनावर झालेले आघात सहज पुसता येत नाहीत व त्यांची जाणीव, तर्कशुद्ध रीतीने सुधारता येत नाही आणि म्हणुनच जाणीव असूनही अनेक गोष्टींमुळे आवाजतले दोष निघत नाहीत. असे न्युनगंड अनेक प्रकारानी तयार होतात. त्यातील काही अनाकलनिय असतात व काही समजून ही सुधारता येत नाहीत. पण हे काल्पनिक नसून अनुभवावर आधारित असतात आणि हे गायकाला वस्तुस्थितिपासून दूर नेतात हे मात्र नक्की. असे न्युनगंड तयार होतानाच सुधारणा केल्यास कमीत कमी वेळेत हे मानसिक अडथळे दूर होण्यास मदत होईल.

आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in