गाणाऱ्यांसाठी त्यांचा आवाज अत्यंत प्रिय आणि सगळ्यात महत्वाचा असूनसुद्धा त्याबाबत जागरूकता दिसत नाही. आवाज ह्या विषयाचा अभ्यास करुन त्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
आवाज गायकांचं माध्यम आहे त्यामुळे तो जास्तीत जास्त काळ उत्तम स्थितीत रहावा हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तो नैसर्गिक स्थितीत असल्यास आवाजाचे त्रास उद्भवण्याची शक्यता कमी होते आणि त्याचा दुरुपयोग न झाल्यास तो उत्तम स्थिती राहतो. ह्यासाठी त्याची निगा राखणे गरजेचं आहे.
आवाज ही गायकांनी फार गृहीत धरलेली गोष्ट आहे आणि तो तसा गृहीत धरणं स्वाभाविक आहे. आपण इतर कुठलेही स्नायु मनात आले की, हवे तेवढे वापरतो मग आवाज वापरतानाच काळजी का बरं घ्यावी ?
ह्याचं उत्तर असं की इतर कुठल्याही स्नायुंपेक्षा आवाजाचे स्नायु अत्यंत नाजुक आहेत. स्त्रियांमधे स्वर पट्टयांची लांबी १२.५ ते १७ मि. मि एवढी तर पुरूषांमधे १७ ते २५ मि.मि एवढी असते. अशा नाजूक स्नायुंचा, गायक मंडळी मुळातच खूप वापर करत असतात. अति वापरामुळे आवाज बसण्यापेक्षा चुकिच्या वापरामुळे आवाज अधिक बसतो.
आवाजाची उत्तम राहण्यासाठी त्याची निर्मिती नैसर्गिक होणं गरजेचं आहे. ती तशी न झाल्यास आवाजावर परिणाम होत असतो. ती सहज होत असेल तर त्यामधे सहजता असते आणि त्यात कुठल्याही प्रकारचे ( शारीरिक आणि मानसिक ) श्रम होत नाहीत.
स्वरपट्ट्या ह्या अति नाजूक असल्याने, काही कारणामुळे त्यांचा रंग बदलला तरी आवाज बदलतोे. गायकांनी त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ह्यासाठी गायकांनी घसा रोज physically बघावा. घसा बिघडल्यावर कितपत लाल आहे हे आपण बघतो तसा सर्वसामान्यपणे आपला घसा रोज कसा दिसतो हे बघावे. त्यात जरा देखिल काही वेगळे आढळले तर त्यावर उपाय करता येतो आणि पुढचे त्रास टाळता येतात.
जो आवाज गायक २-३ तास सलग वापरतात, त्यांनी सतर्क राहून आवाजाला विश्रांती द्यायला हवी. आवाज वापरताना काटकसरीनी वापरायला हवा. उत्तम आवाज असलेले गायक कधीच जोरात बोलताना दिसत नाहीत. लता दीदींसारख्या गायिकेशी बोलायची वेळ आली तर त्यांचं बोलणं जीवाचा कान करुन ऐकावं लागतं असा अनुभव येतो. स्वतःचा रियाज, शिकवण्या, दिवसभरातलं बोलण्याचं प्रमाण, एखाद्या घरगुती कार्याला गेल्यावर जोरात माराव्या लागणाऱ्या गप्पा, फोनवरच्या गप्पा, हाका मारणे, ओरडणे ह्या सर्व गोष्टींमधे आवाज खर्च होत असतो. हा आवाजाचा सगळा वापर डोळसपणे आणि काटकसरीने व्हायला हवा कारण कुठलीही ऊर्जा (energy) कमी नसली तरी मर्यादित असते.
पूर्वीचे गायक १२-१५ तास रियाज करत असत असं ऐकण्यात येतं पण त्यांच्या राहणीमानाचा, व्यायामाचा, आहाराचा आपण विचार करत नाही.
Acidity, जोरात बोलणे, ओरडणे, कुजबूजणे, खाकरणे, जोरात खोकणे, थंड गार पदार्थ, अति गरम पदार्थ, वेळी-अवेळी जेवणे, आंबट- तिखट पदार्थ खाणे, मद्यपान आणि धूम्रपान सारखी कुपथ्ये, गायकाने टाळायला हवीत. घराबाहेर फिरत असताना घशाला गार वारं लागणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. Pollution चा त्रास कमीत कमी होईल ह्याबाबतीत सतर्क रहायला हवं. अति गार आणि अति गरम हवा टाळायला हवी. A.C आणि non A.C चा temperature difference टाळायला हवा.
आपापल्या प्रकृतिप्रमाणे कुठलीही गोष्ट प्रमाणात केली आणि अतिरेक टाळला तर त्रास उद्भवत नाहीत.
कुठले ही खेळाडु जसे खेळापुर्वी warming up करतात तसं गाणाऱ्यांनी ही आवाज तापवणं गरजेचं आहे. शास्त्रीय संगीतात, राग गाताना मुळातच मंद्र किंवा मध्य सप्तकात, शांत विस्ताराने राग सुरु होतो आणि warming up होतं, पण इतर गान प्रकारात आवाज तापवण्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. ह्याच कारणासाठी “ आवाज सुरीली कैसी करें ” या पुस्तकात श्री. लक्ष्मी नारायण गर्ग यांनी सुरवातीला मुखबंदी चा रियाज करायला सांगीतला आहे. उस्ताद सयीदउद्दीन डागरजी देखील आवाजासाठी मुखबंदीचा रियाज सांगत. शास्त्रीय गायकांना अति जोर लावुन गायची सवय असते. मुखबंदी मधे तोंड बंद असल्याने अति जोर लावता येत नाही आणि त्यामुळे आवाज सहज येतो. सहज आवाजाची सवय झाल्यास तोंड उघडल्यावरही सहजता येते, पण गायकांमधे हा रियाज प्रचलित झालेला दिसत नाही.
शांत स्वर लावणे, एखादा पलटा तिन्ही सप्तकात सावकाश म्हणणे किंवा एखादी विलंबित बंदिश सावकाश म्हणणे हे ही आवाज तापवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.
कमीत कमी ऊर्जा वापरुन श्रम विरहीत गाता येण्यासाठी आवाज तापणं गरजेचं आहे. आवाज तापवल्याने, आवाज निर्मितीसाठी वापरत असलेल्या स्नायुंमधे पुरेसा रक्त पुरवठा होतो आणि आवाज उत्तम साथ देतो.
हवेतील कोरडेपणामुळे, A.C मुळे, तोंडानी श्वास घेतल्यामुळे, आजारपणामुळे, दमल्यामुळे आणि अशा अनेक कारणांमुळे घसा कोरडा पडतो. असे झाल्यास घशात खर येते, आवाजातली सहजता कमी होते, आणि घसा खाकरण्याची गरज भासते. घसा खाकरल्याने स्वर तंतु एकमेकांवर जोरात आपटतात आणि आवाजाला त्रास होतो. शक्यतो घसा खाकरणे टाळावे. घशात ओलावा टिकुन राहण्यासाठी कालांतरानी सारखं पाणी प्यावे. प्रवासात पाणी पिणे शक्य नसल्यास जीभेनी तोंडात सगळीकडे स्पर्श करावा त्याने लाळ निर्माण होते आणि घसा ओला राहण्यास मदत होते.
सर्व गायकांमधे आवाजाची काळजी घेणारे गायक खूप कमी प्रमाणात आहेत असं दिसून येतं. ह्याला कारण ‘ माझ्या आवाजाला काही होत नाही ’ हा समज डोक्यात पक्का असतो, पण काळजी घेतल्यास आवाज अधिक साथ देतो आणि काहीतरी झाल्यावर आवाजाची काळजी घेण्यापेक्षा आधी घेतलेली काळजी केव्हाही उत्तमच !
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in