` ए सांग नं ! कसं करायचं बाबाचं April fool ? ‘ दिवसभर मुलींनी डोक्याला भुणभूण लावली होती. मी सुचवत असलेले कुठलेच plans त्यांना पटत नव्हते. शेवटी कंटाळून 'जाऊदे बाबा ! तुम्हीच ठरवा’, असं म्हणून मी त्यातून काढता पाय घेतला आणि मोकळी झाले. विचार करायचं एक काम वाचलं पण विचार थांबेनात. अशी प्रथा का बरं चालू झाली असावी ? सत्यानी आणि खरेपणानी वागणाऱ्यांना एक दिवस मुभा म्हणून ? पण आता ती प्रथा चालू ठेवण्यात किती अर्थ राहिलाए ? रोज पदोपदी फसवणूक करणाऱ्या आपल्या सारख्यांना त्या एका दिवसाचं काय मेलं कौतुक असावं ?
सकाळ उजाडते तीच मोबाईलच्या दर्शनानी आणि तिथेच होते फसवणुकीची सुरवात. खोटे smiley आणि खोट्या शुभेच्छांचा वर्षाव ! खोटी फुलं, खोटे केक, खोट्या मिठ्या आणि खोटं प्रेम. समोर भेटल्यावर तोंड फिरवणारे, social media वर मात्र over emotional असतात. मग दिवसभर सुरु होतात Insta आणि Facebook चे likes. प्रत्यक्ष भेटल्यावर कौतुकाची थाप मिळणं अवघड पण social media वर मात्र कौतुकाचा पाऊसच जणु ! ' कित्ती गोड, कित्ती मस्त ‘ असं reply देणारे किती लोक पुर्ण post वाचतात, ऐकतात किंवा बघतात देव जाणे. फसवणुक media वर होते का प्रत्यक्षात हेच मला अजून कळलेलं नाही.
Whatspp group चा एक किस्सा तर या सगळ्याचा कहरच !
खूप वर्षांनी शाळेतल्या मित्र मैत्रीणींचं एकदा reunion ठरलं. मैत्रीच्या तारा जुळायच्या आधी, whatsapp group आजकाल आधी जमतात. तसा group जमला. ठरलेल्या दिवशी भेटी झाल्या आणि group active झाला. मग सुरु झाले good morning, good night चे मेसेजेस, आणि एक दिवस एकानी भल्या पहाटेच मेसेज टाकला.. ` happybirthday योगिनी !! ‘ झालं !! कळपात पुढच्या मेंढराच्या मागे मान खाली घालून जाणाऱ्या मेढरांप्रमाणे प्रत्येकानी योगिनीला डोक्यावर घेतलं पण योगिनीचा काही reply येईना. दुपारी फोन बघितल्यावर, पहिला मेसेज पाठवणाऱ्या मित्राच्या लक्षात आलं..अरेच्चा आपला group चुकला ! आणि मग sorry wrong group म्हणून त्यानी post delete केली.
अशा ह्या बिनबुडाच्या शुभेच्छा !!
Social media वरच्या posts म्हणजे तर निव्वळ फसवणुकच. फोटो मधे सगळं सुंदर सुंदर पण delicious thai curry ला कशी चव नव्हती..., डोंगराची निसर्ग रम्यता अनुभवण्यात कशी वाट लागली..., weekend outing ला जेवणाचे कसे हाल झाले.. हे कोण लिहीणार ? प्रत्यक्षात कशी का परिस्थिति असेना पण social media वर प्रत्येकाचं आयुष्य हेवा वाटावा असंच.
त्या whatsapp वर येणाऱ्या forwards ची तर गम्मतच वाटते. त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाच्या १०% जरी आपल्याला अमलात आणता आलं असतं तरी सगळीकडे रामराज्यच झालं असतं. अमलात आणायचं सोडुन केवळ ते forward करण्यातच आनंद मिळवत बसलोय आपण.
नक्की कुणाची फसवणुक करतो आपण, जगाची का स्वतःची ?..! हेच कळत नाही कधीतरी.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळ मिळालाच आणि मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक भेटले, तरी खोटेपणा आहेच. मनमोकळ्या गप्पा, हसणं खिदळणं, चेष्टा मस्करी सगळं हरवुन बसलए कुठेतरी. न गप्पांमधे मन रमतं, न भेटुन समाधान वाटतं कारण, आम्ही मस्त...तुम्ही मस्तच्या पुढे गप्पा जातच नाहीत. कुणाला तरी आपला हेवा वाटेल म्हणुन आपले आनंद ही आपल्या कुशीत आणि दुःखाचा बाऊ कशाला म्हणुन ती ही आपल्यालाच कवटाळलेली. ही आपल्या जवळच्या लोकांची फसवणुक नाही तर काय ?
सगळ्यात मोठी फसवणुक आपण करतो ती म्हणजे आपली.. कारण, काहीही करत असताना, आपल्या mobiles मुळे त्यातला आत्माच हरवुन बसलोय आपण आणि तरी आपल्याला वाटतए आपण खूप मजा करतोय. स्वतःची फसवणुकच नाही का ही ?
आजकाल ते fitbit घड्याळ्यांचं fad आहे. सकाळी व्यायाम करताना BP किती ?, heart rate किती ?, किती calories burn झाल्या, steps किती झाल्या ह्याकडेच सगळं लक्ष. व्यायाम झाला असं म्हणणं फसवणुकच ! आपल्या मुलांना so called " quality time “ देत असताना एकीकडे office चं काम करणं मुलांची फसवणुकच. बायकोशी गप्पा मारत असताना इतर कुणाशी general chat करणं किंवा आलेले खंडीभर forwards बघणं, फसवणुकच. गावाला गेलेलं असताना त्या क्षणांचा आनंद घ्यायचा सोडुन सेल्फी काढत बसणं स्वतःची फसवणुकच, एखादी कलाकृति अनुभवत असताना call घेणं त्या कलाकाराची फसवणुकच, भेटायला येतो असं सांगुन, आता जमत नाही, म्हणुन आई वडिलांना video call करणं ही त्यांची फसवणुकच !!
फसवण्यात इतके तरबेज झालो आहोत आपण, आपल्याला लागतो कशाला fools day ? Fool आपण रोजच्या रोज बनतोए आणि वाईट म्हणजे आपल्या लक्षातही येत नाही ते ! हे थांबणं शक्य नाही पण निदान वागण्यात खरेपणाचा प्रयत्न करणं तरी शक्य आहे. तो आधी करु आणि मग खुशाल साजरे करु असले Aprilfools day...!