Tuesday, 22 January 2019

Everything has a beauty

             Everything has a beauty..!

Sunday, 20 January 2019

Voice Blog 7 आवाजाबद्दलच्या गैरसमजुती आणि अर्ध सत्य




गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

अनेक गायकांचे आवाजाबद्दल अनेक गैरसमज असतात. ते कुणाशी बोलले जात नाहीत, विचारले जात नाहीत, त्या बद्दल चर्चा होत नाही आणि त्या बद्दल सांगणारं ही कुणी भेटत नाही. अशा काही गैरसमजुती आणि त्याचं निवारण ह्याबद्दलचा हा लेख.

१. माझा आवाज चांगला नाही.

मुळात प्रत्येकालाच जन्मत: निर्दोष आणि निकोप आवाज मिळालेला असतो. चुकीच्या सवयींमुळे, चुकीच्या संस्कारांमुळे किंवा चुकीच्या वापरामुळे आवाज आपलं नैसर्गिक स्वरूप घालवुन बसतात किंवा बिघडतात.

२. सुगम संगीताला आवाज गोड असावा लागतो मात्र शास्त्रीय संगीताला कसा ही आवाज चालतो.

कुठल्याही गान प्रकारात आवाज गोडच असावा. काय गाणार हा मुद्दा दुय्यम आहे, मुळात माध्यम उत्तम असावं.

३. माझ्या आवाजाला कधीही काहीही होणार नाही.

कुठलाही आवाज, कुठल्याही कारणामुळे बिघडु शकतो. त्याकडे जागरूकता असल्यास आवाजाचे त्रास वेळीच लक्षात येतील आणि आवाज बिघडण्याचा कालावधी कमी करता येईल.

४. खर्ज साधाना केली की आवाज बिघडत नाही आणि बिघडलेला आवाज सुधारतो.

खर्ज साधनेमुळे नैसर्गिक आवाज सुधारतो पण ती केल्यास आवाजाला काही होणार नाही असे नाही. खर्ज साधनेत आवाज कसा वापरतो ह्यावर आवाजाचं बिघडणं किंवा न बिघडणं अवलंबुन आहे. 

५. खर्ज साधनेमुळे जेवढा आवाज खाली जातो तेवढाच वर जातो.

खर्ज साधना करत असताना तोंड, तोंडातला भाग, स्वर पट्टया, चेहरा आणि आवाज उत्पत्तिसाठी लागणारे सर्व स्नायु नैसर्गिक स्थितित असतात. त्या स्थितिची सवय करुन, तिच स्थिति ठेवुन गायल्यास, वरच्या पट्टीत ही सहज गाता येते आणि त्या सहजावस्थेत range वाढवण्याचा प्रयत्न केल्यास आवाज नैसर्गिक येतो.

६. गुरुचं अनुकरण केल्यास आवाज बिघडणार नाही.

आवाज बिघडण्याचं एक मुख्य कारण गुरुच्या आवाजाचं अनुकरण हे आहे. दोन आसमान गोष्टी समान करण्याच्या प्रयत्नात आवाज बिघडतो. अनुकरण शैलीचं, राग मांडणीचं किंवा घराण्यातल्या तत्वांचं करणं अपेक्षित असतं पण संगीत ही गुरुमुखी विद्या असल्याने मुख्यतः आवाजाचं अनुकरण केलं जातं. त्याबद्दल गुरु आणि शिष्य दोघांनी दक्ष असायला हवं.

७. आवाज हा तोंड, स्वरयंत्र, घसा, नाक, कान, vocal cords शी म्हणजेच केवळ अावाजाशी निगडीत अवयवांशी संबंधित आहे.

आवाज निर्मितीसाठी जवळ जवळ ३०० स्नायु कार्यरत असतात. ते सर्व नैसर्गिकरित्या कार्यरत होण आवाज निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात. त्या व्यतिरिक्त functional problems मुळेही आवाजात दोष उत्पन्न होऊ शकतो. जास्त जोर लावुन गाणं, गाताना जीभ वर येणं, rangeच्या बाहेर ओरडुन गाणं ह्यामुळे ही आवाजाला त्रास संभावतो जो लगेच शारीरिक पातळी वर दिसून येत नाही. ह्या चुकांच्या पुनरावृत्तिने आवाजासंबंधी शारीरिक दोष निर्माण होतात.

८. शारीरिक किंवा मानसिक दोषांचा आवाजाशी संबंध नसतो. 

शारीरिक आणि मानसिक दोष सर्वप्रथम आवाजावर परिणाम करतात. शारीरिक स्वास्थ्य, उत्तम आवाजासाठी महत्वाचं आहे. व्यायाम मन प्रफुल्लित करतं आणि मन निरोगी असल्यास गाण्याची उर्मी जास्त असते.
भिती, आनंद, दुःख ह्या सारखे भाव सर्वप्रथम आवाजातून दिसून येतात, त्यामुळे मानसिक दोष, आवाज बिघडण्यासाठी कारणीभूत असतात. मानसिक त्रास उद्भवणार नाहीत असे शक्य नाही पण त्या त्रासांवरची आपली प्रतिक्रिया आपलं मानसिक स्वास्थ्य ठरवत असते. त्या प्रतिक्रियांवर ताबा मिळवता येणं मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवेते.

९. ENT specialist किंवा डॉक्टर आवाजातले कोणतेही दोष काढु शकतात.

वर सांगितल्याप्रमाणे functional problems शारीरिक पातळीवर दिसत नाहीत. आवाज फाटणे, खर येणे, सारखा आवाज बसणे, हवे तसे सूर न लावता येणे वगेरे सारखे त्रास, आवाजाच्या चुकीच्या वापरामुळे उद्भवतात. हे दोष शारीरिक पातळीवर लगेच दिसत नाहीत. जे दोष शारीरिक नाहीत त्यावर डॉक्टर किंवा ENT specialist उपाय करू शकत नाहीत, पण ते वेळेत लक्षात आले तर आवाज बिघडण्याचा काळ नक्कीच कमी करता येतो. ENT specialist किंवा डॉक्टर केवळ शारीरिक पातळीवरचे दोष सुधारु शकतात. 

१०. एकदा बिघडलेला आवाज सुधारत नाहीत.

आवाज कुठल्याश्या कारणामुळे त्याची नैसर्गिकता घालवुन बसतो. चुकीचा आवाज वापारायची सवय होते आणि कालांतरानी तोच आवाज योग्य वाटायला लागतो. असा आवाज नैसर्गिक नसल्यामुळे बिघडतो. ती नैसर्गिकता परत मिळवता आली तर कुठलाही बिघडलेला आवाज सुधारता येऊ शकतो.

११. रोजचा रियाज असेल तर आवाजाला काही होत नाही.

रोजचा व्यायाम असुनसुद्धा अनेक गोष्टींमुळे शारीरिक आजार उद्भवतात, तसेच रोजचा रियाज असून सुद्धा अनेक चुकिच्या गोष्टींमुळे आवाज बिघडु शकातात.

१२. रियाजाने आवाजातला कोणताही बिघाड दुरुस्त होतो.

सर्व सामान्यतः रियाज हा form चा केला जातो माध्यमाचा नाही. माध्यम चुकीचं वापरल्यास आवाज बिघडतो. रियाजातले सातत्य, आवाजातला दोष काढु शकत नाही.

१३. वयात अाल्यावर फक्त पुरुषांचे आवाज बदलतात.

वयात आल्यावर पुरूषांच्या आवाजात मोठ्या प्रमाणात बदल होतो म्हणून तो स्पष्ट जाणवतो. स्त्रियांच्या बाबतीत ही hormonal changes मुळे आवाजात तात्पुर्ता बदल होतो आणि आवाज पुर्वव्रत होतो. तो बदल किरकोळ आणि तात्पुर्ता असल्यामुळे जाणवत नाही एवढेच.

१४. प्रत्येक आवाजाचा दोष शारीरिक स्तरावर दिसतो.

आवाजाचा चुकिचा वापर आवाजात दोष निर्माण करतो, पण प्रत्येक दोष शारीरिक पातळी वर निर्माण व्हायला त्या चुकींची पुनरावृत्ति व्हावी लागते. त्या मधल्यावेळेत आवाजाचा त्रास जाणवतो पण शारीरिक पातळीवर दिसत नाही. 

१५. फक्त पुरुषांचे आवाज बिघडतात, बायकांच्या आवाजाला काही होत नाही.

कुणाचेही आवाज बिघडु शकतात, स्त्री पुरुषांचा त्याच्याशी संबंध नाही. पुरूष मुळात जोरकस गातात आणि नैसर्गिक आवाजापेक्षा जोरात गायल्यास आवाजाला त्रास होतो. ह्या कारणामुळे पुरूष गायकांना आवाजाचे त्रास जास्त उद्भवण्याची शक्यता असू शकेल.

१६. शास्त्रीय संगीत हे जोरकस आवाजात गायला हवे.

गाणं ऐकणाऱ्यावर प्रथम परिणाम होतो तो आवाजाचा. Form कुठलाही असो माध्यम परिणामकारक असावं. तो परिणाम जोरकस गाऊन आणि परिणामी आवाजाला त्रास देऊन करायचा का गोड गाऊन हा प्रत्येकानी विचार करण्याचा मुद्दा आहे.

१७. ऊंच स्वरात गायले तरंच गाणे गोड लागते.

ऊंच स्वरात गाऊन आवाज जास्त पातळ, हल्का आणि गोड लागतो पण तोच परिणाम खालच्या आवाजाही साधता येऊ शकतो. खालच्या पट्टित गाणारे अनेक यशस्वी गायक इतिहासात होऊन गेलेले आहेत.

१८. सर्व प्रकारचे आवाजाचे बिघाड मौनाने बरे होतात.

आवाजाचा अति वापर झाल्याने आवाज बिघडतात आणि ते दोष मौनाने बरे होऊ शकतात पण आवाज चुकीचा वापरायची सवय झाल्यास मौनाचा उपयोग होत नाही. 

१९. शास्त्रीय गायकांना आवाज साधनेची गरज नाही.

आवाज साधना ही माध्यमासाठी केली जाते. ती प्रत्येक गायकासाठी गरजेची आहे.

२०. शास्त्रीय संगीताचा आवाजाशी संबंध नाही.

शास्त्रीय संगीत हे राग मांडणी, राग विस्तार ह्यावर अवलंबून असलं तरी ते उत्तम रित्या ऐकणाऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी, आणि ते जास्तीत जास्त परिणामकारक होण्यासाठी माध्यम तयार असणं गरजेचं आहे. आवाज नसलेले अनेक गायक यशस्वी असले तरी आवाज चांगला असता तर ते अधिक लोकांना आकृष्ट करु शकले असते हे लक्षात घ्यायला हवे.

२१. राग घोटले की आवाज तयार होतो.

गायकी आणि आवाज ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत, त्यात गफलत करु नये. राग मांडणीत आवाज कसा वापरला हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे.

२२. गायकीमुळे आवाज बिघडत नाहीत.

गायकी शिकत असताना, घराण्याच्या तत्वांचं चुकिचं अवलोकन केलं जातं आणि आवाज बिघडतात. अमुकच स्वरात गाणे, अमुकच पद्धतीनी आवाज काढणे, चुकीचे उच्चार करणे वगेरे सारख्या चुकिच्या गोष्टींचं अनुकरण केलं जातं आणि आवाज बिघडतो. 

२३. आवाज सुरेल करता येत नाही तो जन्मजात असतो.

रियाजातल्या सातत्याने आवाज सुरेल करता येतो आणि तो नैसर्गिकरित्या वापरल्यास सुरेल राहतो.

२४. अभ्यास राग विद्येचा करावा सुर अपोआप येतात.

राग अभ्यासाबरोबर अपेक्षित सुरेलपणा मिळवण्यासाठी सुरांची मेहनत गरजेची आहे.

२५. गायक मंडळी आवाजाची काळजी घेतात.

सर्वसामान्यपणे आवाजाला गृहीत धरलं जातं. आवाजाच्या किरकोळ तकरारींकडे दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणूनचं गायक मंडळी आवाजाच्या बाबतीत असमाधानी दिसतात.
आवाजाची जात समजून त्याला योग्य ती काळजी घेणारे गायक, कमी दिसतात.



आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in

Friday, 18 January 2019

ध्येय



संध्याकाळी ७ ची meeting ठरली होती. घड्याळ नेहमीप्रमाणे सुसाट धावत होतं... ६:१५ . मनात चक्र सुरु झाली. घरातुन निघुन पोचायला ७ होतील. त्यात traffic. खणलेले रस्ते, पाऊस..ताबडतोब निघायला हवं.
घरातली मुलींची सोय बघुन, त्यांची पोटं भरून निघायची तयारी केली. कितीही वेळेत आवरलं तरी ऐनवेळी मुलींचं काहीतरी नवीन टुमणं निघतं आणि व्हायचा तो उशिर होतोच. धावत पळत हाॅटेल गाठलं. तिथे अजून कुणी पोचलं नव्हतं. एक table धरुन बसले.

अजुन डोक्यात घरची चक्र फिरत होती. घर आणि profession साठी असं on off चं बटण असतं तर बर झालं असतं. कामात असताना मुलींचा विचार बंद आणि घरात professional काम बंद ! असं झालं असतं तर घरात आणि profession वर १००% लक्ष केंद्रित झालं असतं आणि दोन्हीकडे जरा बरं काम करता आलं असतं. असो!

शेजारच्या टेबल वर एक बाई आणि तिची दोन मुलं बसली होती. ४ वर्षाचा मुलगा आणि ८ वर्षाची मुलगी. डोक्यतला विषय समोर live घडत होता. साहजिकच माझं लक्ष तिकडे गेलं.
" काय घेणार तू रोहित ? मस्त कुरकुरीत डोसा मागावु का ? का छान गोल गोल इडली खातोस ? " , ' मला नाई भूक तूच खा ',
" अरे असं रे काय करतोस , केवढी भूक लागली होती मगाशी, आता काय झालं " , वगेरे वगेरे typical आई मुलांचं संभाषण चालू होतं.
त्या मुलाचं कारण नसताना रडणं आणि आई चा patience संपलेला असताना अतिशय शांतपणे सगळं शिताफीनी handle करणं.

मला उगाचच त्या मुलाचा राग येत होता. ह्या मुलांमुळे देव जाणे किती बयकांचं career संपुष्टात येत असेल. अनेक ध्येय धूसर होत असतील. Career बद्दलची बाघितलेली स्वप्न धुळीला मिळत असतील. मुलं वाढवण्यात आनंद निश्चित अाहे तरीसुद्धा आपल्या career ची त्यासाठी आहूती देऊन खरचं किती बायका मनापासुन समाधानी असतील ?
आणि बायकांनीच मुला बाळांसाठी career सोडायचा मक्ता घ्यायचा का ? पुरूषांचं career तेवढं महत्वाचं ?
अनेक जणी मुलं सांभाळून career करत असतील पण ही तारेवरची कसरत करताना काय होतं हे त्यांचं त्यांनांच ठाऊक ! एवढं करुन समाज नावंच ठेवणार. हिला मुलांपेक्षा carrier महत्वाचं ! काय अडलय मुलांना पाळणा घरात ठेवुन नोकरी करायची ? ५ वर्ष नाही काही केलं तर नाही का चालणार वगेरे वगेरे !
मुलांकडे बघायला घरी कुणी नसेल तर हिला थांबायला हवं. नवरा दिवसभर बाहेर असेल तर हिला घरी थांबणं अपरिहार्यच अशा अनेक adjustments बायकांनीच करायला हव्यात. असो !!

ही बाई पण अशीच एक मुलांनां सांभाळणारी आई म्हणूनच एकटी आली असणार.
मला त्या अनोळखी बाई साठी उगाचच softcorner जागृत झाला.

तेवढ्यात आमची meeting सुरु झाली. अर्ध्या पाऊण तासात कामाचं बोलणं झालं, कॅाफी झाली आणि माझं लक्ष परत एकदा शेजारच्या टेबल कडे गेलं.

आधीचं दृश्य संपुर्णत: पालटलेलं होतं. मुलगा खूप maturity नी वागत स्वतःच्या हातानी पाव भाजी खात होता आणि ताई जवाबदारीनी त्याच्यकडे लक्ष देत, काय हवं नको ते बघत होती. टेबल वर फक्त दोघांनाच बघुन मी क्षणभर अस्वस्थ झाले आणि त्यांच्या आईला आजुबाजूला शोधु लागले. जवळच आई दिसली आणि मी अवाक झाले. ती बाई ४ टेबलं सोडुन  laptop ऊघडून २ सहकार्यांबरोबर खांद्याला खांदा देऊन काम करत होती. मी स्तब्ध झाले. तिच्याबद्दल अनेक विचार डोक्यात फिरू लागले.
प्रथम तिच्याबद्दल आदर वाटला, काम असताना, परिस्थिति प्रतिकूल असताना, कुठलीही सबब न सांगता ती कामासाठी हजर राहिली. मग तिचं कौतुक वाटलं, मुलांना इतक्या लहान वयात, इतकी समज देऊन, इतकं co-operate करायला शिकवल्याबद्दल, आणि मग तिचा हेवा वाटला. आजुबाजूच्या अनेक लोकांच्या करड्या नजरांचा तिच्यावर तसुभरही परिणाम होत नव्हता, कारण ती त्या सर्वांपेक्षा वर होती. तिच्या कामानी, तिच्या ध्येयानी आणि कर्तृत्वानी.

आमची meeting संपली आणि तेवढ्यात ती ही मोकळी झाली. जाता जाता तिला भेटले, एक घटका तिचा हात हातात घेतला आणि हसून बाहेर पडले. ओळख नसली तरी मला जाणवलेली प्रत्येक गोष्ट न बोलताच तिच्यापर्यंत पोचली होती, थोडी नजरेतुन आणि थोडी स्पर्शातून !!