Monday, 17 December 2018

Voice blog 6 आवाजाचे प्रकार ... भाग चार.. भसाडा आवाज




गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

आवाजाच्या प्रकारांमधे भसाडा आवाज हा एक प्रकार आहे. मुळात आवाज भसाडा करणं,ही एक क्रिया आहे. अनेक गैरसमजूतींमुळे ही क्रिया घडते. या आवाजात खूप जडत्व असते. बोलताना किंवा गाताना त्रास होत आहे असं ऐकणाऱ्याला वाटतं. ह्या आवाजात गोडी नसते, त्याचा volume किंवा amplitude गरजेपेक्षा खूप जास्त असतो, त्यात जोर दिसतो. गाणाऱ्याचे श्रम दिसतात. आवाज रूंद आणि बोजड असतो आणि तो तसा मुद्दाम केलेला दिसतो. ह्या आवाजात फिरत निर्माण करणं अवघड असतं. भसाडा आवाज ही एक progressive क्रिया आहे.

आवाज भारदस्त असावा, जाड असावा, जोरकस असावा, आवाजात गांभीर्य असावे, अशा अनेक गैरसमजुतीं मधून आवाज भसाडा काढला जातो. कुणाचे चुकीचे अनुकरण करुन ही आवाज जाड आणि परिणामी भसाडा होत असतो. ह्या आवाजात अति जास्त ताकद लावल्यामुळे आवाजातला मुळातला गोडवा निघून जातो पण हा आवाज जोरकस असल्यामुळे ऐकणाऱ्यांवर प्रभाव निर्माण करतो. मुळातली नैसर्गिक पट्टी उतरते आणि resonance निघून जातो. ह्या आवाजामधे स्वर पट्टायांची स्पंदन क्षमता कमी होते .भसाड्या आवाजात, आवाज निर्मितीच्या वेळी अति जास्त जोर देऊन उच्छवास होत असतो, त्यामुळे आवाज असांगितिक होतो, त्यातला गोडवा नष्ट होऊन नाद संकल्पनेच्या बाहेर जातो. आवाजाची range कमी होते. अशा भसाड्या आवाजात जडत्व असते, सहज गाण्याची क्रिया मंदावलेली असते आणि सूक्षमता निघून गेलेली असते. सहज गाता येत नाही म्हणून अधिक जोर दिला जातो आणि परिणामी आवाज अधिक भसाडा होतो. गेलेल्या आवाजाचा tone, compensate करण्यासाठी अधिक श्वास घेऊन जोर वाढवला जातो आणि गायक त्याने स्वतः तयार केलेल्या एका viscious cycle मधे अडकून जातो.
ह्या लोकांना गाताना त्रास होताना सहज दिसून येतो पण सवयीमुळे स्वतः गायकाला तो जाणवत नाही.

ह्या आवाज निर्मितीची शारीरिक क्रिया आता आपण समजून घेऊ.

आपला मेंदू आणि स्वर पट्टया ह्यांना जोडणाऱ्या nerve ला Vegas nerve असे म्हणतात. आपल्या स्वर पट्टयांमधे स्पंदन उत्पन्न करायचं काम, आणि स्वर पट्टयांना ताणून धरायचं काम Vegas nerve करत असते. ही निर्माण झालेली स्पंदनं, आधी तोंडातल्या हवेमधे हस्तांतरित (transfer ) होतात आणि हवे मार्फत बाहेर पडून कानापर्यंत पोचतात. आपला उच्छवास म्हणजे, ही निर्माण झालेली स्पंदनं कानापर्यंत पोचवायचं एक माध्यम आहे.

नैसर्गिक श्वासोच्छास चालू असताना स्वर पट्टया एकमेकांपासून लांब स्थित असतात आणि आवाज निर्मितीची क्रिया घडण्याच्या वेळेला स्वर पट्टया Vegas nerve मुळे एकमेकांजवळ आणल्या जातात. आवाज निर्मितीमधे स्वर पट्टयांचं जवळ येणं ही एक महत्वाची क्रिया आहे. ह्या स्वर पट्टयांचं स्पंदन होताना हवेचा जोर (controlled) मर्यादित असायला हवा. हा हवेचा जोर जास्त असल्यास स्वर पट्टया विलग ( लांब ) व्हायचा प्रयत्न करतात. भसाडा आवाज असणाऱ्या गायकांमधे हवेचा जोर मर्यादेपेक्षा खूप जास्त असतो. ह्यामुळे स्वर पट्टया लांब जायचा प्रयत्न करतात आणि आवाज निर्मिती होत असल्यामुळे त्याच वेळी जवळ यायच्या प्रयत्नात असतात. ह्या परस्पर विरुद्ध क्रियेमुळे स्वर पट्टयांच्या कडा अनियमित घासल्या जातात आणि त्यावर घट्टे पडतात. आवाज भसाडा ऐकु येतो. हे असेच चालू राहिल्यास आवाजाला त्रास होऊन पुढे singer’s nodule होतो आणि आवाज पूर्णत: खराब होतो.

गाताना श्वास ही energy सुद्धा फार जवाबदारीने आणि आवश्यक तेवढीच वापरली पाहिजे अन्यथा आवाजातली आणि पर्यायाने गाण्यातली गोडी निघून जायला वेळ लागत नाही. साधना करत असताना कधीही टोकाला जाण्याची भूमिका टाळून मध्य मार्ग स्वीकारला पाहिजे. श्वास भरपूर घेतला तरी उच्छवास मर्यादित व्हायला पाहिजे ज्यानी आवाजाची जाडी आवश्यकतेपेक्षा वाढणार नाही. आवाज जाड नसून परिणामकारक असायला हवा ह्याकडे गायकाचं लक्ष असायला हवं.

आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in