गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांमधे आवाजाशी निगडित अनेक गैरसमज दिसून येतात. त्यातला एक समज असा की गाणं परिणामकारक होण्यासाठी आवाज भारदस्त असावा, किंवा, हलका आणि सहज काढलेला आवाज शास्त्रीय संगीतासाठी योग्य नसतो.
आवाजाला वजन असणं, आवाज भारदस्त असणं, आवाजाला जाडी असणं आणि आवाज परिणामकारक असणं या चार भिन्न गोष्टी आहेत परंतु गायक आणि वादाकांमधे याबाबत फारशी बौधिक स्पष्टता दिसत नाही. विचारांच्या ह्या गोंधळामुळे आवाज मुद्दाम मोठा काढणं, भारदस्त वाटावा म्हणून खर्जात गाणं किंवा तार सप्तकात जोर लावून ओरडणं, आवाजाला कडक करणं, पट्टी खाली वर ठेवण इत्यादि भ्रामक आणि चुकीच्या गोष्टी, गैरसमजूत किंवा अज्ञानातून केल्या जातात.
वर नमूद केलेले चार प्रकार आपण आधी समजून घेऊ.
१. वादकांमधे हाताला वजन असणं किंवा गाणऱ्यांमधे आवाजाला वजन असणं, ह्याचा अर्थ जाडी किंवा बोझा, किंवा अधिक ऊर्जा वापरणं असा नसतो. कलेच्या क्षेत्रात हे वजन म्हणजे कमी ऊर्जा (energy) वापरुन जास्तीत जास्त कलात्मक परिणामकारकता साधणं अशा अर्थानी आहे. अधिकाधिक रियाजाने असा कलात्मक परिणाम साधता येतो.
२. आवाजाची जाडी त्याच्या volume शी निगडीत आहे. जाडी असलेला आवाज परिणामकारक असेल असं नाही.
३. आवाजात भारदस्तपणा अनेक गोष्टींमुळे येऊ शकतो. त्यातलं एक कारण volume आहे. घुमाऱ्यामुळे आवाज भारदस्त येऊ शकतो. चुकिच्या भोंगळ उच्चारणामुळे आवाज भारदस्त वाटु शकतो. या सर्व गोष्टींच्या संयोजनामधूनही (combination) आवाज भारदस्त वाटु शकतो.
४. ऊर्जा (energy) कमी वापरून अधिक काटेकोर सुरेल आवाजाला, अधिक आसयुक्त आवाजाला, अधिक घुमारा निर्माण होऊन या सर्वातून जास्तीत जास्त कलात्मक परिणाम साधणाऱ्या आवाजाला परिणामकारक आवाज म्हणता येईल. असा गुणवान आवाज वजनदार आणि प्रभावी असतो. अशा आवाजाच्या सांगीतिक परिणामामधे आवाजाची मधुरता, ऐकणाऱ्याचे लक्ष वेधून घेण्याची आकर्षकता, नादसम्मोहन करण्याची क्षमता असते. असा वजनदार आवाज सशक्त असतो परिणामकारक असतो आणि संगीतोपयोग असतो. स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी ह्यांच्या आवाजात हा वजनदारपणा ओतप्रोत भरलेला दिसतो. हे नीट समजले नाही तर उगाच बोजड अवाज काढून, अति शक्ति लावून किंवा शीरा ताणून, चेहरे वेडे वाकडे करुन अति कष्ट करुन गाणं, हे दिसून येत.
आता आपण भोंगळ आवाजाची निर्मिती कशामुळे होते ह्याचा विचार करु.
भोंगळ आवाज मुळात अपरिणामकारक असतो. परिणाम शून्यता ही अनेक गोष्टींमुळे येते. हा आवाज सुराला चिकटत नाही कारण ह्याला अपेक्षित उंची नसते. नादाच्या अपेक्षित विशिष्ट उंचीच्या आसपास हा आवाज असतो त्यामुळे सुरेलपणाचा परिणाम अशा आवाजात निर्माण होत नाही. तो आसपास असल्यामुळे तो बेसुर आहे असे ही जाणवत नाही आणि त्याचवेळी ह्या आवाजाला पोकळपणा असतो. भरीव जाडी नसते.
खऱ्या मोठया आवाजाच्या ऐवेजी हा पोकळ वासा बड्या घराचा आभास निर्माण करायचा प्रयत्न करतो.
भोंगळ आवाजाची जी गुणवत्ता असते ती घुमाऱ्यामुळे निर्माण न होता म्हणजेच प्रत्यक्ष सहनादांच्या निर्मितीतून न होता, चुकीच्या आणि अस्पष्ट वर्णोच्चरणामुळे ( अ आ ई )होते.
आवाज भारदस्त वाटण्यासाठी अनेक गायक मंडळी विशेष करुन पुरुष गायक, असा आवाज काढायचा प्रयत्न करतात. असे करुन भारदस्तपणा येत नसून पोकळ आणि फुसका आवाज येतो. असे आवाज परिणाम साधत नाहीत. असा आवाज गोड असेलच असे नाही.
खऱ्या जाडीसाठी आवाजाला मोठा amplitude असतो. अशा ध्वनीची आंदोलन किंवा लाटा ( sound waves ) ह्या खूप जास्त उंचीच्या आणि खोलीच्या असतात. भोंगळ आवाजात तसे नसते.
असे भोगळ अावाज बहुत करुन गुरुच्या किंवा कुणाच्या तरी आवाजाचे अनुकरण करून काढले जातात. गुरुच्या भारदस्त आवाजाची नक्कल केली जाते पण तो आवाज कशामुळे भारदस्त येतो ह्याचा अभ्यास नसतो. उच्चरणात स्पष्टता आली की आवाजातला भोंगळपणा निघुन जायला मदत होते. म्हणून गायकाने स्पष्ट उच्चारणा कडे लक्ष द्यावे. Volume पेक्षा स्वच्छ उच्चार केले तर आवाजातला भोंगळपणा निघुन जाईल.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in