जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल .... हे इंग्रजी महीने मनात आणि डोक्यात इतके पक्के बसलेत, की चैत्र वैशाख ज्येष्ठ....हे महीने कधी सुरु होतात आणि संपतात कळत ही नाहीत आमच्या पिढीला. लहानपणी आईनी मराठी महीने पाठ करुन घेतले तेवढाच काय तो संबंध. असं असताना तो श्रावण कधी येऊन जातो ह्याचा पत्ता तरी कसा लागणार ? आणि ज्या महिन्याचा येण्याचाच पत्ता लागत नाही त्या महिन्याचं कोड कौतुक तरी आम्ही कसे करणार ?
लहानपणी आईकडून श्रावणाचं खूप महत्व ऐकलं होतं. तिला पूजा-अर्चा करताना बघितलं होतं. दान धर्म करताना पाहिलं होतं. श्रावाणात आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा हमखास व्हायची. एखाद्या शुक्रवारी मावशी जेवायला यायची आणि एका शुक्रवारी, आम्ही सगळे आजीकडे जायचो जेवायला. मेनू मात्र ठरलेला..पुरण पोळी.. धमाल असायची. श्रावाणातल्या अशा अनेक आठवणी मनात घर करुन आहेत.
आता श्रावण म्हणला की स्वैपाकाच्या बाईंच्या हातची पुरण पोळी होते, सगळ्यांच्या वेळा जमल्याच तर सत्यनारायण पूजाही होते, पण पूर्वीचा धार्मिक भाव मात्र निश्चित कमी झाला. अजून १०- १५ वर्ष हे असंच चालेल ही बहुधा पण त्यानंतर कोण पाळणार श्रावण, कोण जपणार परंपरा ..?
जुन्या रुढी, पूर्वी पासून चालत आलेल्या परंपरा, बुरसटलेल्या आहेत आणि सध्याच्या काळात त्या जपणं निव्वळ अशक्य आहे, असं मानणारी आमची पीढी या पुढे श्रावणातले सण, चाली रीती सांभाळेल ही अपेक्षा जरा जास्त होते..नाही का?
जुन्या परंपरा जपत त्याचा कोडकौतुक करायला आम्हाला वेळ ही नाही आणि इच्छाही. ह्या पद्धति आम्हाला बांधून किंवा अडकवून ठेऊ शकत नाहीत. घर सांभाळून व्यवसाय-नोकरी संभाळणाऱ्या आम्ही मुली ह्या चाली रीतींसाठी वेळ ही देऊ शकत नाही.
न सुट्टी घेऊन नागोबाची पूजा करायला किंवा दूध द्यायला आम्हाला वेळ आहे, न झोके खेळत बसायची आम्हाला इच्छा आहे, न मेंदी काढत जागत बसण्याची आम्हाला क्रेज !
वर्षानुवर्षे आपल्या आया सासवा करताएत म्हणून ह्यात अडकण, प्रैक्टिकली शक्य नाही आम्हा मुलींना....
अगदी काल परवा पर्यंत ह्याच मताशी मी ही सहमत होते. पण सहज विचार केला आणि लक्षात आलं की ह्या सगळ्या पद्धति बायकांना बांधून ठेवण्यासाठी नसून त्यांना मोकळं करण्यासाठीच असाव्यात. रोजचं कंटाळवाणं, धकाधकीचा रूटीन, बाजूला सारून मोकळा श्वास घेण्याची संधी देणाऱ्याच असाव्यात..! त्या दृष्टिनी आपण कधी बघतच नाही ..एवढंच!!
पूर्वी फक्त चूल आणि मुल करत घरात बसणारी बाई श्रावणात घराबाहेर पडत असेल, निसंकोचपणे. जंगलातून रानातून फिरुन, विहार करत असेल, मोकळेपणाने. मैत्रिणींमधे मिसळून झोके खेळत असेल, स्वैरपणे. सासरचा सगळा व्याप विसरून, सगळी बंधनं झुगारून, सगळा जाच सोडून माहेरपणासाठी जात असेल, स्वच्छंदपणे..
रात्री सगळ्या मैत्रिणी जागून मेंदी काढत असतील, गप्पांची मैफल रंगत असेल रात्रभर, चेष्टा मस्करीने पहाट उजाडत असेल. नागाची पूजा करायची म्हणून सगळ्या जणी ठेवणीतल्या साड्या काढत असतील. लग्नातले दागिने परत एकदा घालून मिरवत असतील. नटुन थटून ,सगळ्याजणी मिळून, नागराजाचं दर्शन होतए का, हे बघायला शेतात माळ रानात मनसोक्त फिरत असतील. जंगलातल्या रानमेव्याचा आनंद लुटत असतील. घरी जाऊन आईच्या हातच्या स्वैपाकाचा मनमुराद आनंद घेऊन मनसोक्त झोपत असतील.
आज सगळं बदललं असलं तरी, सततच्या ताणावाखाली जगणाऱ्या बायकांची, मोकळं होण्याची गरज अजुनही तशीच आहे. केवळ ह्या सगळ्या परंपरा जुन्या, बुरसटलेल्या म्हणून त्याच्याकडे बघु नका.
मोकळं होण्याची संधी समजून ह्या सगळ्या गोष्टी गंमत म्हणून एकदा करून बघा.
खरच घरासमोर एखादा झोका बांधून मैत्रिणींबरोबर खेळून बघा, बाजारातून अावर्जुन सगळा रानमेवा आणून, जाणीवपूर्वक त्याची गोडी चाखून बघा, ऑफिसला चक्क सुट्टी टाकून रात्रभर गप्पा मारत बसा, एकमेकांच्या सुख दुःखाची चौकशी करत प्रेमाचा आधार देऊन बघा, पार्लरमधे न जाता स्वतः एकमेकींना मेंदी काढत बसा, खरंच एखादा साप दिसतोय का हे बघायला, मैत्रिणी मिळून लांब डोंगरावर पिकनिक ला जा, सगळ्या बहिणी ठरवून, भावाकडे दिवसभर माहेरपणाला जा आणि मग तुम्हाला जाणवेल ह्या सगळ्या सणांमागचा खरा उद्देश, त्यातून मिळणारा आनंद, समाधान इतक्या वर्षांनंतर अजूनही तसंच टिकून आहे ..!