गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
शास्त्रीय संगीताला अनेक वर्षांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. गायकी, तंत्र, विद्या, शास्त्र, कला, घराणी या अनेक स्तरांवर तज्ञांनी सखोल अभ्यास केलेला आहे, पण काही अपवाद वगळता गाणाऱ्यांचं माध्यम, आवाज ह्या विषयाकडे मात्र दुर्लक्ष झालेलं दिसतं.
कुठलं ही वाद्य शिकणाऱ्याला त्या वाद्याची सखोल माहिती असावी लागते. त्याच्या tone चं, sound चं, बिघाडाचं, दुरुस्तीचं ज्ञान असावं लागतं तसंच गाणाऱ्यांना ही अापल्या माध्यमाचा अभ्यास असणं अत्यंत महत्वाचं आहे. खूप वर्ष ज्ञान घेऊन, रियाज करुन, मेहनत घेऊन आवाजानी साथ दिली नाही तर सगळं वाया गेल्यासारखंच आहे ह्याची जागरुकता गाणाऱ्यांमधे येणं गरजेचं आहे.
बहुतेक गायकांना या विषयावर कुणी शिकवलेले नाहीत. स्वानुभवावर त्यांनी स्वतःचे आवाज सांभाळले पण त्यांच्या अनुभवावर आपल्या आवाजाचा दर्जा टिकु शकत नाही हे प्रत्येक गायकानी लक्षात घ्यायला हवं कारण प्रत्येकाच्या आवाजाचा गुणधर्म, प्रत्येकाच्या प्रेरणा आणि प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी आहे. एवढेच नव्हे तर बिघडलेले आवाज सुधारण्याची प्रक्रियाही प्रत्येकाची वेगळी असते.
परदेशात या विषयावर खूप अभ्यास केलेला दिसतो पण आपल्याकडे आजही नवीन गाणं शिकणाऱ्याला पहिल्या दिवसापासून राग संगीत शिकवले जाते. शिकवण्याचा भर केवळ स्वर रचना, चिजा, ख्याल, रागातील मांडणी यावर असतो, आवाजावर नाही.
प्राध्यापक बी॰आर० देवधर, या विषयावर अभ्यास करणारे पहिले भारतीय होते पण त्याचं महत्व आणि त्यांचा अभ्यास दुर्दैवाने गाणाऱ्यांपर्यंत पोचलेला दिसत नाही. या उलट त्या काळात त्यांची थट्टा झाली.
Voice culture या विषयावर पाश्चात्य लोकांनी खूप अभ्यास केला आणि त्याच्या सखोल अभ्यास आपल्या काही मंडळींनी केला पण तो आहे तसा शास्त्रीय संगीताला लागू होऊ शकत नाही कारण आपल्या आणि पाश्चात्य संगीतात खूप फरक आहे. त्यांची भाषा, उच्चार, आवाज लावायची पद्धत, त्यांचा आकार, त्यांचा ठहराव आपल्या संगीतापेक्षा वेगळा आहे हे विसरुन चालणार नाही.
सोन्याचा अलंकार घडवताना दागिन्याच्या कलाकुसरीवर भर असावा पण तेवढेच लक्ष त्याच्या शुद्धतेकडे असावे. आपलं गाणं सर्व बाजुनी परिपक्व होण्यासाठी आपल्या माध्यमाचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. आपला आवाज अनेक वर्ष आपल्या मनाप्रमाणे वापरता यावा, तो बिघडत असल्यास वेळीच समजावे आणि त्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी आवाजाचा अभ्यास अपरिहार्य आहे. हा अभ्यास आपल्या मार्फत पुढच्या पिढीपर्यंत पोचावा ही आपली जवाबदारी आहे. प्रत्येक गायकाचा संगीताबरोबर माध्यमाचा अभ्यास झाल्यास सांगीतिक वाटचाल अधिक यशस्वी होईल हे गायकांनी लक्षात घ्ययला हवे !
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in