घरातून निघताना उशीरच झाला. धावत पळत बाहेर पडले. गाडी garage ला होती त्यामुळे रिक्शाला पर्याय नव्हता. तरातरा चालू लागले. तेवढ्यात शेजारी राहणारी मैत्रिण lift द्यायला पुढे सरसावली पण नेमक्या आमच्या वाटा वेगळ्या होत्या त्यामुळे कोपऱ्यावरच्या signal पर्यंत सोडुन ती दुसऱ्या बाजूला निघाली. रिक्शा शोधेपर्यंत एक ओळखीच्या काकू भेटल्या. खूप गप्पा मरायला लागल्या तरी माझं लक्ष रिक्शाकडेच पण एकही रिक्शा येईना. त्या ही गेल्या मी मात्र अजून तिथेच. ' वेळेला मेली रिक्शा कधीच येत नाही ' माझी उगाच चिडचिड होत होती आणि तेवढ्यात माझ्या सोईची बस समोर येऊन ठाकली..!.?.!
बसचा आणि माझा संपर्क तसा शाळेनंतरच सुटला होता. आधी सायकल मग दुचाकी आणि मग चारचाकी पर्यंतच्या प्रवासात, कधी बसची वेळ आलीच नाही. आता इतक्या वर्षांनंतर आज बस नी जावं का काय असा संभ्रम डोक्यात चालेपर्यंत मी बस मधे चढले देखील !
बसच्या शेवटच्या खिडकित बसून मला शाळेतले दिवस आठवले.
सकाळी सकाळी धावत पळत जाऊन शाळेची वेळ गाठायची आणि दुपारी परत त्याच वाटेनी बस धरून घरी. बरोबर मैत्रिणी आसायच्या त्यामुळे गप्पा, हसणं, खिदळण ह्या सगळ्यात खूपच मज्जा यायची.
आज किती दिवसांनी परत तोच अनुभव ! मलाच गम्मत वाटून गालातल्या गालात हसू येत होतं.
पण आपलं मन एक विलक्षण गोष्ट आहे. दुसऱ्याच क्षणी मला वाटलं ," आपण बस नी जातोय खरं, पण आपल्याला कुणी बघितलं नाही तर बरं. काय वाटेल लोकांना ? गाडी नव्हती तर रिक्शा नाही का परवडत ? एकदम बस धरली ? "
मग मला वाटायला लागलं " निदान बस मधे कुणी ओळखीचं तरी नको बाबा भेटायला. उगाच काय सांगत बासायचं, का बस नी जातोय ते, सरळ बाहेरच बघत बसावं."
मग वाटायला लागलं बाहेरून कुणी बाघितलं तर ? एखादी मैत्रीण AC गाडीतून जात असताना signal ला नेमकी शेजारी यायची. काय वाटेल तिला ? एकच तुच्छतेचा कटाक्ष टाकेल. मग ? एकदम कसंतरी वाटायला लागलं. आता काय करावं ?
मग Albert Ellis ची आठवण झाली. Albert माझा आदर्श होता, थोर psychologist. आपल्या भावना आपणच निर्माण करत असतो. आपला त्यावर ताबा असायला हवा. मी उलट विचार सुरु केला. मला जे वाटेल ते करायला मी मुक्त आहे. इतरांचा विचार मी कशाला करावा ?
मी एकदा सचिन तेंडुलकरची मुलाखत वाचली होती. म्हणाल ती गाडी वडिलासाठी दारात ऊभी करु शकत असताना ही त्याचे वडील बसनी फिरत असत. गाडीतून फिरायचं नव्हतं असं नाही पण रोज जायच्या यायच्या ठिकाणावर सोईची बस होती जी घराच्या दारातून निघायची आणि दारात सोडायची, मग गाडी लागते कशाला असं त्यांचं म्हणणं होतं. साधी राहणी आणि उच्च विचारसारणीचे ते होते. माझ्याही राहाणीबद्दल मनात अभिमान जागृत झाला. आता जरा बरं वाटू लागलं.
तेवढ्यात कंडक्टरनी बेल वाजली आणि मी भानावर आले. माझा स्टॉप आला होता. बसमधून उतरताना माझ्या लक्षात आलं, तेवढ्या दहा मिनिटात कित्ती विचार केला होता मी. एक बसचा प्रवास करण्यात किती गोष्टी आड येत होत्या... सवय, आर्थिक परिस्थिति, सामाजिक भान, status , कलाकारपण, माझा ' मी ' आणि देव जाणे काय काय..!?! कोण मी ? कशाचा एवढा विचार ?
तेव्हा कुसुमाग्रजांची कविता आठवली..
असीम अनंत विश्वाचे रण
त्यात पृथ्वीचा इवला कण
त्यातला आशिया, भारत त्यात
छोट्याश्या शहरी छोट्या घरात
घेऊन आडोसा कोणी मी वसे
क्षुद्रता ती अफाट असे..
कुसुमाग्रजांची ही कविता माझी मुखोद्गत होती, कारण मला ती पुरेपूर पटलेली होती. प्रत्यक्षात मात्र तसं वागता आलं नाही.
आज मात्र पक्क ठरवलं, यापुढे आपला " मी " मधे आणायचा नाही अर्थात आज कुणी ओळखीचं भेटलं नाही, ह्याचा मनातल्या मनात आनंद व्यक्त करतच !!