Dieting
सध्या ज्याला पहावं त्याच्या डोक्यात डायटिंगचं खूळ आलय. कुणी बारीक व्हायला डायटिंग करतं, कुणी फिगर सांभाळायला तर कुणी ' आता वय वाढलं, आता डायटिंग करायलाच हवं ' असं म्हणून, तर कुणी सध्याचा trend म्हणून dieting करतं.
इच्छा आणि भूक असूनही जेवण न मिळणारा आणि घर भरलेलं असताना उपाशी राहणारा, यापैकी कोणता जीव अधिक दुर्दैवी, हे सांगणं जरा अवघडच !
गंमत म्हणजे हातात मोजके पैसे असताना, उद्याच्या जेवणाची भ्रांत असताना आजचा स्वैपाक उत्तम करणारे गरीब लोक. त्यांच्या स्वयपाकात भरपूर दाण्याचा कूट, खूप खोब्र कोथिम्बीर, रग्गड तेल आणि म्हणूनच त्यांचा प्रत्तेक पदार्थ चमचमीत, आणि त्याउलट किचनचं स्टोअर रूम तुडुंब वाहत असताना, कमीत कमी तेल कारण cholestrol ची भीती, अर्धा चमचा दाण्याचा कूट ...बापरे हाय प्रोटीन ! खोब्र .. अरेरे हाय फैट्स ! म्हणून मग सगळं टाळून केलेला त्यांचा बेचव स्वैपाक.
या दोघांमधला कुणाचा स्वैपाक अधिक रूचकर असेल हे सांगायला नकोच !
एक वेळ जेवण करून एक वेळ प्रोटीन शेक घेणं हे diet वाल्याचं आवडतं खुळ. अमाप पैसा खर्च करुन त्या मोट्ठाल्या डब्यातला एक ग्लासभर शेक घेऊनंच ह्यांची पोटं कशी काय भरतात त्यांनाच ठाऊक. त्यांची पोटं भरत असतील नसतील पण त्या शेकवाल्या कंपनीच्या मालकांचे खिसे मात्र भरभरून वाहत असणार.
ह्या शेक घेणाऱ्या लोकांची बाहेर जेवायची वेळ आली, की मग मात्र हे डाएट पार कोलमडतं !
एक तर ही लोक डाएट विसरून मनसोक्त चापतात. कार्यालयातले तेलकट बटाटे वडे, पुऱ्या, चमचमीत भाजी, मसालेभात किंवा कुठलंही पक्वान्न, मनसोक्त हाणतात किंवा दूसरं टोक म्हणजे, कार्यालयाचे 300-350 रुपयाचं ताट...यांचं डाएटिंग म्हणून हे फक्त उष्टावण करतात आणि बुर्दंड पडतो यजमानांना ! खर्चापरी खर्च आणि परत तोरा ह्यांचाच ! " मला हे असलं काही चालतच नाही मुळी ! "
ह्यांचं कौतुक, पण यजमानांची होते पंचाईत. ' हे असलं ' नको तर नक्की काय हवं ह्याचा मात्र सुगावा त्यांना कधीच लागत नाही.
कुणाच्या घरी गेलं की ह्यांच्यामुळे फजीती. पटकन चहा कॉफी करावी, तर ह्यांना नाही चालत. घरात असलेले तयार पदार्थ यांना वर्ज. गोड धोड समोर ठेवणं तर पापंच. आपण काहीच केलं नाही तर आपण वाईट आणि फार आग्रहानी प्रेमानी केलंच तर ह्यांचं डाएट कोलमडलं, म्हणून परत वाईट आपणंच.
बर स्वतः एकट्यानी हे कार्य पार पाडत राहावं तर तसं नाही. स्वतःपुर्त हे थांबत नाहीत. हे सगळं एका डायरीत, त्या जीम इंस्ट्रक्टरला लिहून द्यायचं. त्यावर तो चर्चा करणार आणि परत त्यात बदल सांगणार.
अमकं खायचं, ढमकं खायचं नाही. अमकं इतक्या वाजताच खायचं. तमकं त्याच्या बरोबर मुळीच खायचं नाही. इतक्या वाजता फळ खाच, दिवसात इतकी अंडी हवीच ! ....बापरे!!
शहाणी माणसं दोन वेळा जेवून कामाला लागतात पण ही diet वाली लोकं दिवसभर खाण्याच्याच विश्वात. दर दोन तासानी मोजकं खायचं, तसा नियमच असतो मुळी. हे लोक जगण्यासाठी खातात , का खाण्यासाठी जगतात त्याचं त्यांनाच ठाऊक..!
इतकं सगळं करून वजनात फार फरक पडत तर नाहीच, पण त्यासाठी खाण्यावर ताबा ठेवून, खाण्याचा आनंद गमावणं, हे मात्र त्यांचं दुर्दैव.!
मला नेहमी वाटतं जिभेपेक्षा मनावर ताबा ठेवता आला तर नक्की वजन कमी होत असेल.
न खाण्यापेक्षा नियंत्रित खाण्यावर जोर द्यायला हवा. सगळं थोडं थोडं खाऊन तब्बेत जपायला हवी. तुमचं सुन्दर दिसणं हेच फक्त महत्वाचं नसून, तुमचं निरोगी असणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रोटीन पावडर, शेक्स, जूसेस, अशा अकृत्रिम खाण्यापेक्षा, ताजं घरचं गरम जेवण जास्त पौष्टिक आहे, हे यांना कोण बरं पटवणार..?
उत्तम तब्बेतीचं रहस्य सकस जेवण आहे, म्हणूनच diet विसरून मस्त खा आणि मस्त जगा..