आपल्या घरी आता बाळ येणार ही बातमी आली आणि सगळ्या घरात चैतन्य आलं. सगळ्यांच गोष्टींचा आनंद, उत्साह आणि काळजी दुप्पट होती कारण घरात एक नाही तर एकदम दोन बाळं येणार होती.
जुळ्यांचा पहिलाच अनुभव, त्यामुळे सगळ्यानाच कुतूहल !
एकवीसावं शतक सुरु झालं, आपण कुठल्याही क्षेत्रात कितीही प्रगती केली, स्वतःला आपण कितीही सुशिक्षित मानत असलो आणि मुलगा मुलगी समानतेचे कितीही झेंडे रोवत असलो तरी मुल व्हायच्या वेळी आपल्या घरी पहिला मुलगाच व्हावा अशी बहुतांशी लोकांची इच्छा असते. त्याला आमचं घरही अपवाद नव्हतं.
" आता देवाच्या कृपेनी जुळंच होणार आहे तर त्यात एक तरी मुलगा पाहीजेच " असं आजींना उगाचच वाटत होतं, मुलगा म्हणलं की कॉलर ताठ, शिवाय मुलगा मुलगी दोघांना वाढवायचा अनुभव हवाच की !! " वगेरे वगेरे गप्पा नऊ महीने कानावर पडत होत्या.
ह्या सगळ्या गप्पांचा माझ्यावर नकळत इतका परिणाम झाला होता की प्रत्यक्ष डिलीवरीच्या वेळी मला काय झालं ह्यापेक्षा दोन मुली झाल्या तर आजींना काय वाटेल ह्याचीच काळजी जास्त वाटत होती.
अात्ताच्या काळात सहज मारलेल्या गप्पांचा माझ्यावर इतका परिणाम होत असेल तर पुर्वीच्या बायकांना मुलगाच हवा ह्या अपेक्षेचा किती त्रास होत असेल देव जाणे...
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तो दिवस उजाडला आणि लक्ष्मीच्या रूपात घरात दोन मुली आल्या. पुढल्या काही दिवसात आनंद, दु:ख, सहानुभूति आशा प्रकारचे अनेक अनुभव आम्ही घेत होतो..
' अग्गं बाई दोन मुलीच का..? एका खेपेत मोकळी झाली असतीस, आता परत मुलासाठी हेच सगळं रामायण. ' ,
' दोन मुली ? ..अरेरे, जाऊदे ! ' , 'एक व्हायची तर तिथे दोन ? काय बोलावं ? '
'' जाऊदे तू काही वाइट वाटून घेऊ नकोस "
" ह्यांच्या पाठीवर आता एक मुलगा झाला की बास! "
अशा एक न एक लाखो प्रतिक्रिया ऐकून आम्ही रोज नव्यानी थक्क होत होतो, आणि अशा मागासलेल्या आणि कोत्या मनोवृत्तींच्या लोकांपेक्षा आपण किती बरे आहोत ह्याचं समाधान ही वाटत होतं.
ह्या अनुभवाला काही महीने लोटले आणि एकदा कार्यक्रमानिमित्त जळगावला जायची वेळ आली. कार्यक्रम संपवून आम्ही परतीच्या मार्गासाठी पुण्याला निघत होतो. रात्री 12:30 ची ट्रेन होती. मध्यरात्रीची वेळ, त्यात डिसेंबरची थंडी. झोपेनी घेरलं होतं. दाराला लागून असलेल्या माझ्या बर्थचा मी ताबा घेतला आणि झोपेची तयारी केली.
बरोबरचे सगळे स्थिरावले होते, आता झोपणारच, एवढ्यात दारात लक्ष गेलं. एक चांगल्या घरातली बाई अगदी तान्ह मूल घेऊन दारापाशी बसली होती. तिच्या शेजारी एक 4/5 वर्षाची मुलगी होती आणि तिच्या नवऱ्याची बर्थ मिळण्यासाठी धावपळ चालू होती. 2 टायर ऐसी मधे पण लोकं दरात बसतात हे बघून जरा आश्चर्यच वाटलं. नक्कीच काहीतरी अडचण असणार. इकडे तिकडे येर-झाऱ्या घालणाऱ्या तिच्या नवऱ्याला गाठलं.
चौकशी केल्यावर लक्षात आलं की त्यांना अचानक हा प्रवास करावा लागत होता आणि गाडी फुल होती. आता ऐनवेळी TC तरी कुठे जागा देणार ?
मी त्यांना मदत करायची तयारी दर्शविली. जागा मिळेपर्यंत बाळ माझ्या शेजारी आरामात झोपू शेकेल असं त्यांना सुचवलं. पण त्यांना तो पर्याय फार योग्य वाटला नसावा.
आजकालच्या जगात अनोळखी व्यक्तिवर विश्वास ठेवणं तसं अवघडंच झालय आणि त्यातुन तो प्रश्न आपल्या मुलाबाळांसंदर्भात असेल तर मग अाणखीनच कठिण. कदाचित मी पण त्यांच्या जागी असते तर लगेच विश्वास ठेवला नसता. असो !
खूप वेळाच्या धावपळीनंतर त्यांना एक बर्थ मिळाला. आई आणि दोन बाळांना तिकडे सुखरूप बसवून ते गृहस्थ माझ्या जवळ आले. मला ही झोप लागत नव्हती. त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल ते ही कळत नव्हतं. त्यांना एक बर्थ मिळाला हे सांगायला ते अावर्जुन आले.
मी दाखवलेल्या सहकार्याबद्दल माझे आभार मानू लागले आणि सांगायला लागले.." आम्ही मुळात जळगावचे. दोन वर्षांपूर्वी आम्ही एक मुलगी दत्तक घेण्यासाठी इथे नाव नोंदवले होते. पण नोकरी निमित्त पुण्याला transfer झाली. सगळा संसार अावरून पुणं गाठलं. अत्ताशी पुण्यात स्थिरस्थावर होतंय तेवढ्यात दोन दिवसांपूर्वी अचानक संस्थेतुन फोन आला की या आठवड्यात येऊन बाळ घेऊन जा. सुट्टीच्या या दिवसात अचानक रिजर्वेशन मिळणार कसं ? इतक्या लहान बाळाला नेणार तरी कसं ? सगळेच प्रश्न उभे राहिले. तिकटाशिवाय गाडीत चढण्याला पर्याय राहिला नाही. तुम्ही म्हणालात बाळाला इथे झोपवा म्हणून, पण ज्या बाळाला आम्हीच ओळखत नाही त्याला निर्धास्तपणे तुमच्याकडे तरी कसं देऊ ?
मला आश्चर्य वाटलं, एक मुलगी असून दुसरी परत मुलगीच दत्तक घेतली ? खरंतर मुलगा हवा म्हणुन किती अट्टाहास असतो लोकांचा.
त्यावर त्यांनी खुलासा दिला. तुम्हीच सांगा ताई , " कोण जास्त माया लावतं ? म्हातारपणी कोण काळजी घेईल ? लग्न करुन सासरी जाऊन सुद्धा आइवड़िलांची जास्त चौकशी मुलगी करेल का मुलगा ? मला विचाराल तर फक्त पुण्यवान लोकांच्याच पोटी मुलगी जन्माला येते. मग संधी मिळाल्यावर मी तरी हे पुण्य कसं सोडावं ?"
मी अवाक होते.. निशब्द होते..!
त्यांच्या पाठमोऱ्या आकृतिकडे बघताना लक्षात आलं, साध्या शुभेच्छा देण्याचंही भान मला राहिलं नव्हतं.
आधी एक मुलगीच असताना, दुसरी परत मुलगीच दत्तक घेणाऱ्या ह्या आई वडिलांचं मला खूप कौतुक वाटत होतं आणि ह्या जगात किती भिन्न मतांची लोकं राहतात ह्याचा आश्चर्यही !!